निकहत झरीन
भारताची विश्वविजेती महिला बॉक्सर निकहत झरीनने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ४८-५० किलो फ्लायवेट या प्रकारात दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले. बॉक्सिंगसारखा खेळ एखाद्या मुलीने आपली आवड म्हणून निवडणे तसे कमीच पाहायला मिळते. परंतु निकहतचे आजपर्यंतचे सर्व विक्रम पाहता ती सध्या अनेक युवतींची आदर्श ठरते आहे. तिचा हा इथवरचा प्रवास सुखकर नव्हता, हे मात्र तेवढेच खरे.

तेलंगणातील निजामाबाद या छोट्याशा गावी १४ जून १९९६ रोजी निकहतचा जन्म झाला. निकहतचे वडील मोहम्मद जमील आणि आई परवीन सुल्ताना यांना एकूण चार मुली. त्यातील निकहत ही त्यांचे तिसरे अपत्य. निकहतचे वडील हे स्वतः एक खेळाडू होते. ते फुटबॉल आणि क्रिकेट खेळत. तसेच तिच्या घरात तिचे काकादेखील बॉक्सर व त्यांची दोन्ही मुलेसुद्धा बॉक्सर होती. त्यामुळे खेळाचं बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळाले होते.

निकहतच्या वडिलांनासुद्धा वाटायचे आपल्या मुलींनी खेळावं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवावे. परंतु निजामाबाद सारख्या लहान गावामध्ये मुलींना खेळ खेळायची इतकी मुभा नव्हती. बॉक्सिंग म्हटलं की छोटे कपडे आणि मुलीच्या चेहऱ्यावर लागणारा मार, व्रण या सर्व कारणामुळे निकहतची आई देखील तिच्या खेळाच्या विरोधामध्ये होती. कारण मुलीला चेहऱ्यावर कुठे मार लागला तर… तिच्या सोबत कोण लग्न करणार?

परंतु निकहतचे वडील कायम तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळेच निकहतचा हा खडतर प्रवास नंतर सुखकर झाला आणि ती यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचू शकली.

तिच्या आई-वडिलांनी मुलींना आपल्या पायावर उभे करण्यासाठी अनेक कष्ट केले. आज तिच्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत. निकहतने वयाच्या १३व्या वर्षी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि वयाच्या १४व्या वर्षी ती जागतिक युवा विजेती झाली. तोकडे कपडे घालून सराव करण्यासाठी घराबाहेर पडते म्हणून अनेकांच्या वाईट नजरांबरोबरच शेरेबाजीलाही तिला सामोरे जावे लागले. परंतु तिने कधीच या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. कारण तिने तिचे ध्येय निश्चित केले होते.

२००९साली विशाखापट्टणममधील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त चतुर्थ राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी निकहत दाखल झाली. २०१० मध्ये म्हणजेच एका वर्षामध्येच तिला इरोड नॅशनलमध्ये सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून घोषित केले गेले आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. निकहतने २०१०मध्ये राष्ट्रीय उप-कनिष्ठांच्या स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर २०११मध्ये तुर्कीमधील कनिष्ठ आणि युवा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिने पराक्रम गाजवत फ्लायवेट विभागात पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले आणि निकहतचा सुवर्णकाळ सुरु झाला. २०१३ मधील बल्गेरियातील महिला कनिष्ठ आणि युवा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक मिळवून आपल्या खेळामध्ये सुधारणा करत २०१४ मध्ये सर्बियाच्या नोवी सॅड येथे आयोजित तिसऱ्या नेशन्स कप आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत यश संपादन करून पुन्हा एकदा तिने सुवर्णपदक मिळवले.

२०१५ मध्ये हैदराबाद, तेलंगणाच्या एव्ही कॉलेजमध्ये कला शाखेतील पदवीसाठी निकहत शिकत असताना तिने जालंधर येथील अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ हा पुरस्कार प्राप्त केला. त्याच वर्षी तीने आसाममधील १६६व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. काही काळाच्या अंतरांनंतर पुन्हा एकदा निकहतने जोमाने सुरुवात करत २०१९ मध्ये आणखी  एका आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची भर यादीत घातली. बँकॉकमध्ये झालेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुद्धा तिने रौप्यपदक पटकावले.

बल्गेरियातील सोफिया येथे आयोजित २०१९ स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत झरीनने ५१ किलो वजनी गटात फिलिपिनो आयरिश मॅग्नोला हरवून सुवर्णपदक मिळवले. त्याच वर्षी झरीनने ‘कनिष्ठ नागरिकां’ गटातही देखील सुवर्णपदक जिंकले आणि तेव्हा तिला ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ घोषित करण्यात आले. मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये वयोगटातील चाचण्या पूर्ण केल्यानंतर संधी देण्यात आली तेव्हा निकहतने वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमबरोबर लढतीची मागणी केली त्यावेळी खूप मोठी खळबळ उडाली होती. त्या लढतीतमध्ये निकहतला अपयश आले परंतु सर्वत्र तिच्या धैर्याचे कौतुक झाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये बल्गेरियातील सोफिया येथे आयोजित स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत निखातने ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून आपला सुवर्णाध्याय चालूच ठेवला.