– अपर्णा पिरामल राजे
हे जग सोडून जाताना अहंकार, मीपणा, सगळं मागेच सोडावं लागतं. हे सगळं जिवंतपणीच उतरवून ठेवायचं शहाणपण काही लोकांकडेच असतं. त्यापैकीच एक होते आमचे बाबा- माझे सासरे अविनाश राजे. बाबा सर्वसाधारण कुटुंबातले, पण त्यांनी आपल्या वागण्याने सगळ्यांसमोर असाधारण आदर्श निर्माण केला, ठरवलं तर असंही जगता येतं हे त्यांनी दाखवून दिलं, म्हणूनच त्यांच्या या आठवणी सांगाव्याशा वाटतात.
मला माझ्या गंभीर मानसिक अस्वास्थ्याशी गेली पंचवीस वर्षं जुळवून घेताना, या विषयावर हजारो लोकांशी बोलताना आणि लोकांना अशा मानसिक- वैद्यकीय परिस्थितीशी झगडताना पाहून, माणसाच्या दु:खाचं एकच कारण दिसलं, ते म्हणजे माणसाचा अहंकार. पण बाबांच्या मनाचा ताबा त्याने कधीही घेतला नाही. कठीण परिस्थिती, आर्थिक आणि शारीरिक आव्हानांचा सामना करूनसुद्धा बाबा कायम शांत आणि समाधानी होते. त्यांना अडचणींचं कधी ओझं वाटलं नाही. त्यांना तंत्रज्ञानाची आणि अभियांत्रिकीची खास आवड होती. शिकायची उत्सुकता होती. ते कधी कॉलेजमध्ये गेले नाहीत. ते स्वशिक्षित इंजिनीयर होते आणि अगदी शेवटपर्यंत, रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचं त्यांच्या कंपन्यांबरोबर काम चालू होतं. हा वारसा त्यांनी माझ्या तेरा वर्षांच्या मुलाला, अगस्त्यला दिला आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही स्वावलंबी असणारे बाबा, त्यांची कार्यपद्धती अविश्वसनीय होती. ते थकायचे नाही. सतत आणि जास्तीत जास्त काम करत राहायचे. कुटुंबासाठी मेहनत करणं हा एक भाग; पण त्यांची कामावर निष्ठा होती. त्यांना नवीन प्रोजेक्ट्स, नवीन उत्पादन पद्धती यांत खूप रस होता. त्यासाठी ते सकाळी साडेपाचला उठायचे. तो वारसा त्यांच्या मुलामध्ये, माझे पती अमितमध्ये उतरला आहे. बाबांचा आणखी एक विशेष म्हणजे यंत्राबरोबर जगणारे बाबा खूप मृदू स्वभावाचे होते. त्यांचं बोलणं, वागणं एकदम स्नेहार्द्र असायचं. मॉर्निंग वॉक करताना खाली पडलेली नाजूक फुलं ते हळुवारपणे उचलून घरी घेऊन यायचे. त्यांचं सकाळचं हे चालणं आमच्या येथील रहिवाशांना व्यायामाची स्फूर्ती द्यायचं. ते कधीच कोणाबद्दलही वाईट बोललेले मला आठवत नाहीत. त्यांच्या बोलण्यातून समाधान, अदब आणि नर्मविनोद पसरायचा.
हेही वाचा – भावा बहिणीचं नातंही ताणलं जातंय?
त्यांच्या इतर आवडी-निवडीतही ते वेगळे होते. त्यांना क्रिकेटपेक्षा टेनिस (आणि जोकोविच) जास्त आवडायचं. त्यांच्या पिढीपेक्षा हे वेगळच होतं. ते सगळ्या खेळांच्या स्पर्धा टी.व्ही.वर बघायचे. रुग्णालयात असतानासुद्धा त्यांनी ऑलिम्पिक सोडलं नाही. त्यांची खेळांबद्दलची आस्था माझ्या मोठ्या मुलात अमर्त्यमध्ये दिसते आहे. त्यांना नेहमी नवनवीन स्थळं आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दल उत्सुकता असे. गेल्या वीस वर्षांत आम्ही जवळजवळ पंधरा देशांचा प्रवास केला. त्यांनी नवीन पदार्थ चाखण्यात कधी मागेपुढे पाहिले नाही; मग ती मध्य समुद्रातली बोटीची सफर असो किंवा जपानी सुशीचे हॉटेल असो. त्याचं कुटुंब- पत्नी आशा, दोन मुली पल्लवी, सोनाली, मुलगा अमित आणि पाच नातवंडं यांच्यासमोर आता याच आठवणींचा आदर्श आहे.
बाबा मला एकदा म्हणाले होते, ‘मला घरातलं ‘डस्टबीन’ व्हायचं नाहीए.’ आणि हेच त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत डॉक्टरांना सांगितलं होतं, ‘मी जगणार नसेन तर माझा शेवट रुग्णालयामध्येच व्हावा. व्हेंटिलेटरच्या साहाय्याने घरातल्या पलंगावर मला दिवस घालवायचे नाहीत. मला आनंदी राहायचं आहे.’ आणि खरंच त्यांच्या मनासारखंच घडलं. ती परिस्थिती येण्याआधीच ते गेले.
हेही वाचा – संसाराची कसरत आणि स्वप्नांचा पाठलाग, IPS तनुश्रीने केलं लग्नानंतर स्वप्न साकार
बाबा म्हणजे जिज्ञासू, स्वावलंबी, कामसू आणि अहंकार नसलेले मृदू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनाबद्दलचा, कामाचा, खेळांचा, कुटुंबाविषयीचा दृष्टिकोन आम्हाला खूप श्रीमंत करून गेला. प्रिय बाबा, तुम्हाला शांती लाभो. तुमची खूप उणीव सतत जाणवत राहील. तुमचं जगणं आम्हाला कायम प्रेरणा देत राहील.
aparnapiramal@gmail.com