ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेला प्रत्येक खेळाडू अद्वितीय असाच आहे. अत्यंत खडतर प्रवास करून तिथपर्यंत पोहोचलेले अनेकजण आहेत. असाच एक अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे इजिप्तची तलवारपटू नदा हाफेझ हिचा. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेली नदा सात महिन्यांची गर्भवती आहे. आपल्या पोटातल्या बाळासह तिनं ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये विजयी सलामीही दिली आणि अंतिम १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. विशेष म्हणजे तिची मॅच झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमधून आपण गर्भवती असल्याचं सांगितलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी तिनं अमेरिकच्या एलिझाबेथ तार्ताकोव्हस्कीला १५-१३ असं पराभूत केलं. गर्भारपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हटलं जातं. त्यादृष्टीने काळजीही घेतली जाते. नदा ज्या खेळात प्रतिनिधित्व करत होती, त्यासाठी प्रचंड मेहनत, अविश्रांत परिश्रम याची तर गरज आहेच, पण एकाग्रता, अतोनात संयमाचीही ती परीक्षा आहे. या सगळ्या परीक्षा नदा उत्तीर्ण झाली आहे, कारण तिचं तिच्या खेळावर मनापासून प्रेम आहे. स्पर्धेतून ती जरी बाहेर पडली असली तरी तिनं फक्त पॅरीसवासियांचीच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या खेळावर तिची प्रचंड निष्ठा आहे हे तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या संदेशातूनच समजतं. ती लिहिते, “माझ्या गर्भात भविष्यातला एक छोटा ऑलिम्पिक खेळाडू वाढतोय. या स्पर्धेत माझ्याबरोबरच माझ्या बाळानंही आपापल्या आव्हानांना तोंड दिलं. मग ती आव्हानं शारीरिक असोत की मानसिक. प्रेग्नन्सी हा एक अत्यंत खडतर प्रवास आहे. आयुष्य आणि खेळ यांच्यात समतोल राखणं हे प्रचंड आव्हानात्मक होतं. मी हे सगळं यासाठी लिहीत आहे, कारण स्पर्धेच्या दरम्यान राऊंड १६मध्ये स्थान मिळवणं ही माझ्यासाठी सगळ्यांत मोठी भाग्याची गोष्ट आहे. ” नदा हाफेज ही इजिप्तची राजधानी कैरोमधली आहे. ही तिची तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. तलवारबाजी करण्याआधी ती एक जिम्नॅस्टीकपटू होती. त्याशिवाय तिनं वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षणही घेतलं आहे. हेही वाचा - Sexual Violence : “जोडीदाराकडूनच महिलांवर सर्वाधिक लैंगिक हिंसाचार”, जागतिक स्तरावरील गंभीर स्थिती उजेडात! ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्येक खेळाडूचा कस बघणारी असते. फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही प्रचंड थकवणारी असते. आव्हानं, स्पर्धा जिंकण्याचा दबाव असा मानसिक तणाव असतोच. त्यात तलवारबाजीला तर प्रचंड शारीरिक क्षमता लागते. त्यामध्ये वेग, रणनीती, ताकद असं सगळंच आवश्यक आहे. जरी पुरुषांच्या बरोबरीने महिला खेळाडू या क्षेत्रात दिसत असले तरी अजूनही महिलांसाठी तलवारबाजी आव्हानात्मकच आहे. गरोदरपणात महिलांना प्रचंड मानसिक अस्थिरतेला सामोरं जावं लागतं. शरीरातही अनेक बदल होत असतात. तरीही नदानं स्पर्धेत भाग घेतला आणि ठामपणे या स्पर्धेसाठी विचार केला ही खूप मोठी गोष्ट असल्याचं नदाचं म्हणणं आहे. २०१४ सालापासून ती तलवारबाजी शिकत आहे. तिच्या मैत्रिणीला तलवारबाजी करताना पाहून तिलाही खेळात काहीतरी करावंसं वाटलं. ती आधी स्विमिंग करत होती. त्यानंतर ती जिम्नॅस्टिकही शिकली. एकदा तिनं गंमत म्हणून तलवारबाजी करून पाहिली आणि मग ते तिला मनापासून आवडलं. मग तिनं तलवारबाजीतच करिअर करायचं ठरवलं. गर्भावस्था म्हणजे रोलरकोस्टर असते. विविध आंदोलनांना सामोरं जात प्रत्येक बाई एका जिवाला जगात आणते. नदालाही प्रचंड नाजूक मानसिक अवस्थेतून जावं लागलं. पण या कठीण प्रसंगात तिच्यासोबत तिचा नवरा इब्राहिम इनाब आणि तिचे कुटुंबीय होते. त्यामुळेच आपण या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालो असं नदा सांगते. हेही वाचा - बांबू, शतावरीच्या पौष्टीक भाज्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तिनं लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत आली. तिची ही पोस्ट केवळ भावनिक नव्हती तर त्यात तिचा कणखरपणाही दिसत होता. “तुम्हाला पोडियमवर दोन खेळाडू दिसत होते, पण प्रत्यक्षात तिथे ३ जण होते. मी, माझी स्पर्धक आणि भविष्यात येणारं माझं छोटं बाळ.” माझ्या पोटात ऑलिम्पिकवीर वाढतोय, असं म्हणणाऱ्या नदानं यापूर्वी रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये इजिप्तचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण ही स्पर्धा तिच्यासाठी अगदी वेगळी आणि संस्मरणीय होती. नदाचा प्रवास तर काल्पनिक गोष्टींचा बागुलबुवा करून हजारो कारणं देत प्रवास मध्येच थांबवणाऱ्या किंवा सुरूही न करणाऱ्या अनेकजणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरेल यात शंका नाही.