-विजया जांगळे

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्रावणकोर संस्थानात निम्नवर्गीयांना आपले धड झाकण्याची परवानगी नव्हती. या वर्गातील व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वा उच्चवर्णीयांसमोर कमरेच्या वर कोणतेही वस्त्र परिधान करून गेल्यास, तो उच्चवर्णीयांचा अपमान आणि नियमभंग मानला जात असे. त्याबद्दल त्रावणकोर संस्थान त्यांच्याकडून कर वसूल करत असे. हा कर मुलक्करम म्हणजेच मूळ कर म्हणून संबोधला जात असे. याव्यतिरिक्त मुलं जेव्हा १४ वर्षांची म्हणजेच रोजगारास योग्य वयाची होत, तेव्हा देखील हा कर वसूल केला जात असे. एवढेच नव्हे, तर निम्न वर्गातील एखाद्या व्यक्तीला मिशी वाढवायची असेल, तर त्यासाठी देखील तलकरम हा कर भरावा लागत असे.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

या जाचक अटींना कंटाळून नाडर समाजातील काही कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. धर्मांतर केलेल्या नाडर महिला उच्चवर्णीयांप्रमाणे शिवलेले ब्लाऊज परिधान करू लागल्या. त्यांचे अनुकरण करत हिंदू नाडर महिलांनीही ब्लाऊज घालण्यास सुरुवात केली. मात्र यातून उच्चवर्णीय नायर समाजात असंतोष निर्माण झाला. आपली गुलामी करणारा हा समाज अचानक आपल्याशी बरोबरी करू पाहत आहे आणि त्यामुळे आपले वर्चस्व नाहीसे होईल, या भीतीतून नायरांनी नाडर महिलांवर भररस्त्यात हल्ले करण्यास सुरुवात केली.

ख्रिश्चन मिशनरीजने याविरोधात न्यायालयात दाद मागितली. त्यावर ख्रिश्चन नाडर महिलांना त्यांच्या धर्माने दिलेल्या अधिकारांनुसार धड झाकता येईल, असा निकाल देण्यात आला, मात्र त्यांचे वरचे वस्त्र जॅकेटसारखे असावे, ते उच्चवर्णीय महिलांच्या ब्लाऊजसारखे नसावे, अशी अटही घालण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतरही ख्रिश्चन नाडर महिलांवर तुरळक प्रमाणात हल्ले होत राहिले, मात्र १९३०पर्यंत ते पूर्णपणे शमले.

पुढे १९५०नंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. तोवर नाडर महिला नायर महिलांप्रमाणेच ब्लाऊज आणि त्यावरील वस्त्र परिधान करू लागल्या होत्या. साधारण याच सुमारास निम्नवर्गीयांनी उच्चवर्णीयांची मोफत सेवा करण्यास नकार देण्यास सुरुवात केली. १८५५मध्ये दास प्रथेचे निर्मूलन झाले. नायर समाजात आधीच असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. या सर्व परिवर्तनांमुळे ती अधिक तीव्र होत गेली. समाजावरचं आपलं नियंत्रण सुटू लागलं आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि पुन्हा दंगली उसळू लागल्या. यावेळी त्यांचे स्वरूप अधिक हिंसक झाले. शाळा, चर्च, घरे पेटवून दिली जाऊ लागली. लूटमार सुरू झाली. मद्रास प्रांताच्या ब्रिटीश गव्हर्नरांनी दबाव आणल्यानंतर त्रावणकोर संस्थानाने नाडर महिलांना त्यांच्या पसंतीचे कपडे घालण्याची परवानगी देणारा आदेश काढला आणि अखेर नाडर महिलांना त्यांचे स्तन झाकण्याचा अधिकार मिळाला. वस्त्र परिधान करण्याच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना तब्बल चार दशकं संघर्ष करावा लागला.

नांगेलीची आख्यायिका
नांगेली नामक निम्नवर्गीय महिलेच्या बलिदानाची कथाही या आंदोलनाशी जोडली गेली आहे. सुरुवातीला मूलक्करम हा धान्य, विशेषतः तांदळाच्या स्वरूपात वसूल केला जात असे. मुळातच गरीब असलेल्या या वर्गाकडे वारंवार कर भरण्यासाठी पुरेसे धान्य उरत नसे. कुटुंबियांची उपासमार होत असताना केवळ स्तन झाकल्याबद्दल तांदूळ द्यावे लागत. हे तांदूळ केळीच्या पानांतून दिले जात. नांगेली नामक महिलेने या जाचाला कंटाळून आवाज उठविण्याचे ठरविले, एकेदिवशी कर वसूल करणारे अधिकारी आले असता, तिने स्वतःचे स्तन कापून ते केळीच्या पानांतून त्यांना दिले. अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. यामुळे व्यथित झालेल्या तिच्या पतीनेही तिच्या चितेवर आत्मदहन केले. त्यानंतर या आंदोलनाला अधिक बळ मिळाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. अभ्यासकांच्या मते, नांगेली ही या आंदोलनाच्या आघाडीवर असलेली एखादी महिला असू शकेल, मात्र तिने स्तन कापून दिल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. असे असले, तरीही अनेक कलाकृतींत नांगेलीची आख्यायिका प्रतिबिंबित झालेली दिसते.

शबरीमला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी उठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तेव्हा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या आंदोलनाचा उल्लेख केला होता- कर्मठ प्रथा हा नेहमीच सामाजिक सुधारणांतील अडथळा ठरत आल्या आहेत. महिलांनी जेव्हा, त्यांचे स्तन झाकण्याचा हक्क मागितला, तेव्हाही त्यांना अशाच कर्मठ व्यवस्थेचा सामना करावा लागला होता, असे विजयन म्हणाले होते.

संस्थानं विलीन झाली, ब्रिटीश निघून गेले, देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षं झाली… त्रावणकोरमधील या लढ्यानंतर दीड शतक उलटून गेलं आहे, तरी आजही त्या कर्मठतेचे अवशेष शिल्लक आहेतच. समाधानाची बाब एवढीच की या खोलवर रुजलेल्या कर्मठतेविरोधात ठामपणे उभे ठाकणारे आवाज आजही शाबूत आहेत. नाडर महिलांचा हा लढा केवळ पेहरावाच्या स्वातंत्र्याचा नव्हता. आर्थिक हक्कांचाही होता. समाजात खोलवर रुजलेल्या आणि वारंवार उफाळून येणाऱ्या जातीय अभिमानाविरोधातला होता. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मूलभूत गरजेसाठीचा होता!