scorecardresearch

Premium

मुलींच्या ‘कौतुक-दिवसा’ची अशीही एक कथा!

मुलीला ओझं समजलं जाऊ नये, यासाठी पूरक मानसिकता तयार करणं असा या दिनाचा उद्देश आहे.

national daughters day 2023 reason behind national daughters day celebration in india
(संग्रहित छायाचित्र)

सुधीर करंदीकर

‘विशिष्ट दिवसांमागे एखादी पौराणिक गोष्ट जोडली गेली असेल, तर त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवसा’चा विचार करता मलाही अशी एक काल्पनिक गोष्ट सुचली!’

mindset behind charity
Money Mantra: दानधर्मामागची मानसिकता
mahatma gandhi jayanti 2023 lifestyle 7 habits of mahatma gandhi ji that can change your life
सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी महात्मा गांधींच्या ‘या’ सात सवयी ठरतील फायदेशीर; आजपासून करा फॉलो!
lokmanas
लोकमानस : ५० टक्क्यांची अट मोडणे योग्य आहे का?
Office Boss And Home Duties Make You Angry Causing High Blood Pressure Ladies Check If You Have PCOS Signs Who is at Risk
ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

नुकताच- म्हणजे २४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ झाला. दिवसभर समाजमाध्यमं या दिवसाच्या ‘साजरीकरणा’नं भरून गेली होती. दर सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार जगभर ‘international daughter’s day’ म्हणून साजरा होतो. हा दिवस पाळण्याची सुरूवात भारतातच झाली असं सांगितलं जातं. स्त्रीभ्रूणहत्या होऊ नयेत, मुलींना मुलांप्रमाणेच चांगली वागणूक आणि उत्तम शिक्षण मिळावं, मुलीला ओझं समजलं जाऊ नये, यासाठी पूरक मानसिकता तयार करणं असा या दिनाचा उद्देश आहे.

समाजमाध्यमावरील एकेक पोस्ट वाचता वाचता माझ्या मनात सहज विचार आला, की या दिवसाच्या बाबतीत एखादी पौराणिक कथा असती तर?… आणि माझ्या मनानं त्यावर एक कथा रचलीही! ती अशी- एक आटपाट नगर होतं. तिथली राजे मंडळी, श्रीमंत मंडळी आपली गादी/ वारसा पुढे चालवण्याकरता देवाला मुलगा देण्याची प्रार्थना करायचे. इतर लोकही आपल्याला कामकाजात मदत करण्याकरता/ अर्थार्जन करण्याकरता मुलगा होवो, अशीच देवाला प्रार्थना करत. सगळे आजी-आजोबा नातवाला-नातसुनेला आशीर्वाद देताना ‘पुत्रं भवतू’ असाच आशीर्वाद देत! ही सर्व मंडळी शंकराची प्रार्थना करत, कारण शंकर भगवान लगेच प्रसन्न होतात हे सगळ्यांना माहित होतं. मग शंकर भगवान ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद देत. त्यामुळे सगळ्यांनाच मुलं व्हायला लागली! मुलींची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली आणि बहुतेक घरात मुलंच दिसायला लागली…

हेही वाचा >>> बेकायदेशीर पत्नीस देखभाल खर्च मिळणार नाही!

हे चित्र बघून सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव चिंतीत झाले. कारण अशा रीतीनं प्रत्येक आटपाट नगरानं मुलगे होण्याचा वर मागितला आणि सृष्टीमधल्या सगळ्या मुली संपल्या, तर पुढे मुलं-मुली होणार कसे?… पुढे सगळंच ठप्प होणार. यावर काहीतरी उपाय काढावा, याकरिता ब्रह्मदेव श्री विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी विष्णूंना हा सगळा प्रकार सांगितला. आपणच काहीतरी उपाय शोधावा अशी प्रार्थना केली. सृष्टीचे चालक श्री विष्णू यांनी लगेच एक उपाय काढला आणि तो अमलात आणला.

नगरातील एका विचारवंताच्या डोक्यात त्यांनी ‘पहिली बेटी धन की पेटी’ ही कल्पना उतरवली आणि आता याचा प्रत्यय बऱ्याच जणांना येतोय, अशी उदाहरणं त्याच्यामार्फत सर्वांना सांगणं सुरू केलं. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपला विचार बदलून पहिली मुलगी पाहिजे, अशीच प्रार्थना शंकराला करायला सुरुवात केली! शंकर देवाच्या आशीर्वादानं अशी प्रार्थना करणाऱ्यांना मुलीचं वरदान मिळायला सुरुवात झाली.

विष्णू देवतेनं मग काही विचारवंतांच्या डोक्यात ‘मुलगी ही म्हातारपणची काठी,’ अशी कल्पना रुजवली. बऱ्याच वयस्कर मंडळींची म्हातारपणी मनापासून सेवा करणारी मुलगीच असते, अशी उदाहरणं समाजामध्यमांमधून लोकांच्या समोर येतील अशी व्यवस्था केली. त्यामुळे नवीन लग्न झालेल्यांकडून शंकराकडे ‘मुलगीच पाहिजे’ अशा प्रार्थना सुरू झाल्या.

हेही वाचा >>> उचकीने हैराण

पूर्वी मुलींना शिक्षण देणं, नोकरी करू देणं, हा प्रकार जवळजवळ नव्हता. विष्णू देवतेनं मग आणखी एक उपाय काढला आणि मुलींना शिक्षण द्या अशी कल्पना बऱ्याच जणांच्या मनात रूजवली. तशा प्रकारची सगळीकडे ‘बॅकग्राऊंड’ तयार करायला सुरूवात केली. मग खूप लोकांनी मुलींना शाळा-कॉलेजमध्ये पाठवायला सुरुवात केली. मुली मुलांच्या बरोबरीनं शिक्षण घ्यायला लागल्या. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, वैज्ञानिका होऊ लागल्या. सरकारी ऑफिसेसमध्ये मोठ्या पदांवर पोहोचल्या, राजकारणातही हळूहळू मोठी पदं मिळवू लागल्या. मुलींची प्रगती बघून, सगळे नवीन वर-वधू ‘आम्हाला पहिली तरी मुलगीच दे’ अशी प्रार्थना शंकराकडे करायला लागले. शंकर देवाच्या ‘तथास्तु’मुळे मुलींची संख्या हळूहळू वाढायला लागली. आपल्याला मुलगी आहे याचा अभिमान सगळ्यांनाच वाटायला सुरुवात झाली.

मग एका कल्पक व्यक्तीच्या डोक्यात विष्णू देवतेनं मुलींचं कौतुक करण्याकरताही वर्षामध्ये एखादा दिवस ठरव, असाही विचार पेरला. तो महिना होता सप्टेंबर! त्या कल्पक व्यक्तीनं दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला चौथा रविवार हा सगळ्यांनी आपल्या मुलींचं कौतुक करण्याकरता आणि इतरांच्या मुलींचं कौतुक करण्याकरता ‘आंतरराष्ट्रीय कन्या दिवस’ म्हणून पाळावा, याकरता पाठपुरावा केला आणि त्यात त्याला यश मिळालं. तेव्हापासून सगळेजण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मुलींचं कौतुक करण्याकरता शुभेच्छांची देवाणघेवाण करू लागले…

हेही वाचा >>> समुपदेशन : माझं नशीबच फुटकं – तुम्हीही देता स्वत:ला दोष?

ही अगदी काल्पनिक गोष्ट आहे बरं! जुन्या वळणाच्या कथांमध्ये नवीन ‘डे’ बसवण्याचा केवळ छोटासा प्रयत्न! मात्र यातली भावना तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अशी आशा आहे. मुलं आणि मुलींना समान मानावं, होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी, याची चिकित्सा करण्याच्या वाटेस जाऊ नये आणि जे बाळ जन्मास येईल त्याचं मनापासून स्वागत करावं, असा संदेश या काल्पनिक कथेतून आधुनिक काळात घेता येईल. एक मात्र आहे, की मुलींचे लाड, त्यांचं कौतुक करण्यासाठी स्वतंत्र ‘डे’ असणं चांगलीच गोष्ट आहे. या निमित्तानं हा विषय समाजाच्या डोळ्यांसमोर राहील आणि मुलं आणि मुलींसाठी एक समान वातावरण भविष्यात तयार व्हावं यासाठी आपण समाज म्हणून काम करत राहू…

lokwomen.online@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National daughters day 2023 reason behind national daughters day celebration in india zws

First published on: 25-09-2023 at 20:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×