National Girl Child Day 2023 : Importance, Significance of Girl Child तुमच्या मुलीला या गोष्टी शिकवाच | let learn your daughter girls these things must educate self care and social and body image vp-70 | Loksatta

National Girl Child Day 2023 : तुमच्या मुलीला ‘या’ गोष्टी शिकवाच!

National Girl Child Day 2023 प्रतिवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेकविध क्षेत्रांत आता महिलांनी आघाडी घेतलेली असली तरी आजही समाजात भ्रूणहत्या होतातच हे वास्तव आहे. सद्यस्थितीतील कठोर वास्तवाला सामोरे जाण्यासाठी आपणच आपल्या मुलींना तयार करायला हवे… हे अधोरेखित करणारे हे टिपण!

National Girl Child Day 2023, women education, women rights
राष्ट्रीय बालिका दिवस २०२३

Importance of Girl Child २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजेच म्हणून साजरा केला जातो.‘मुलगी नकोच’ पासून एक तरी मुलगी हवी किंवा आता एक मुलगीच हवी असा टप्पा काही प्रमाणात का होईना समाजाने गाठला आहे. पण आजही अनेक मुलींचा जन्माला येण्याआधीच आईच्या पोटातच जीव घेतला जातोय, हेही वास्तवच आहे. आता उच्चशिक्षण घेऊन खूप मोठ्या जबाबदारीच्या पदांवर अनेक मुली सहजतेने वावरतात. इतकंच नाही तर अनेक अवघड किंवा वेगळ्या वाटा चोखाळतानाही दिसतात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांमध्येही आता स्त्रियांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. निर्णय घेण्याची क्षमता, स्वत:चं कर्तृत्व, घर आणि करियरमधला समतोल सगळंकाही मुली करु शकत असल्या तरी आजही अनेकदा मुलगी म्हणून तिला डावललं जातं. कारण नसताना तिच्या मनात कमीपणाची भावना निर्माण केली जाते. यासाठी लहानपणापासूनच शिक्षणाबरोबरच आपल्या मुलीला अन्य काही गोष्टी शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या जमान्यात ठामपणे उभं राहायचं असेल तर मुलींचं पालनपोषण करतानाच काही गोष्टी तिच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. शिक्षणाबरोबरच तिला स्वयंपूर्ण,आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर करायचं असेल तर लहानपणापासूनच या गोष्टींबद्दल तुमच्या मुलीशी आवर्जून बोलत राहा-

आणखी वाचा : मैत्रिणींनो, ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करताय?

१) स्वत:ची काळजी स्वतः घेणे

आपल्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे हे मुलींना लहानपणापासून शिकवलं जातं. पण त्याचबरोबर स्वत:ची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे; हे मात्र त्यांना सांगितलं जात नाही. घरातल्या मुली सुदृढ आणि आनंदी असतील तरच त्या घरातल्या लोकांची, आपल्या जीवलगांची काळजी घेऊ शकतील हे त्यांना समजावून सांगा.
२) ‘नाही’ म्हणायला शिका
कितीही शिकल्या, स्वयंपूर्ण झाल्या तरी अनेक स्त्रियांना दबावाखाली खूप गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला जी गोष्ट मनापासून पटत नाही, ती करण्यासाठी तयार होऊ नका. त्यासाठी स्पष्टपणे नकार द्यायला मुलींना लहानपणापासूनच शिकवा. ज्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे आपली प्रगती खुंटते आहे असं वाटत असेल अशा गोष्टी कुणाच्याही दबावाखाली करु नका, हे त्यांना समजवा. थोडक्यात जे त्यांना करायचं नाही त्यासाठी ‘नाही’ म्हणायला त्यांना शिकवा.

आणखी वाचा : घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!

३) त्यांच्या अधिकारांबद्दल सांगा
मुलीचा जन्म म्हणजे फक्त कर्तव्य करत राहणं इतकंच नसतं. तर तुमचेही काही अधिकार असतात याबद्दल मुलींच्या मनात जागरुकता निर्माण करत राहा. आपल्या अधिकारांबद्दल त्यांना माहिती असणे अत्यावश्यक आहे. अनेक घरांमध्ये सुनांचे, मुलींचे अधिकार हिसकावून घेतले जातात. अगदी शिक्षणापासून ते नोकरी करण्यापर्यंत आणि आर्थिक अधिकारापर्यंत अनेकदा तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळेस अन्यायाविरोधात आणि न घाबरता आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे हे प्रत्येक मुलीला समजावून दिलंच पाहिजे.
४) तुमचा निर्णय, तुमच्या हाती
प्रेम करणं म्हणजे आपलं आयुष्य पूर्णपणे दुसऱ्या हाती सोपवणं नसतं, हे मुलींना सांगितलं गेलं पाहिजे. तुमचे निर्णय तुम्ही स्वत: घ्या, अन्य कोणालाही तुमच्या निर्णयात ढवळाढवळ करु देऊ नका किंवा त्यांच्या प्रभावाखाली तुम्ही तुमचे निर्णय घेऊ नका हेही त्यांना शिकवा. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची सवय लावा. म्हणजे आयुष्यातले अगदी महत्त्वाचे निर्णय घेतानाही तुमची मुलगी कधीही घाबरणार नाही.

आणखी वाचा : शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था)

५) भावना व्यक्त करायला शिकवा
अनेकदा स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मनात असूनही कित्येकदा बायकांना ते प्रत्यक्ष बोलता येत नाही. पण आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला तुमच्या मुलीला अगदी लहानपणापासूनच शिकवा. आपल्याला काय वाटतं हे बोलणं स्वत:साठी महत्त्वाचं असतं हे तिला सांगा, याची सुरुवात अगदी घरापासून झाली पाहिजे. तुमची मुलगी बोलत असताना तिला मध्ये अडवू नका. भले ती अगदी साधी गोष्टही सांगत असेल पण पालकांनी ते लक्ष देऊन ऐकलंच पाहिजे. याचा मुलींच्या मनावार सकारात्मक परिणाम होतो आणि त्या बोलायला लागतील.
६) विश्वास ठेवायला शिकवा
स्वत:वर विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे मुलींना आवर्जून सांगा. काहीही झालं तरी स्वत: वरचा विश्वास डळमळू देऊ नका. म्हणजे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला, तरी निर्णय घेताना तुमच्या मुलीचा आत्मविश्वास कमी पडणार नाही.

आणखी वाचा : ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले! ( भाग २ )

७) वेळेची किंमत शिकवा
वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायला तुमच्या मुलीला आवर्जून शिकवा. प्रत्येक गोष्ट वेळेवर करणे, एखाद्याला दिलेली वेळ पाळणे हे तुम्ही तुमच्या कृतींमधून तुमच्या मुलीला शिकवत राहा.
८) बॉडी इमेज आणि सोशल इमेजप्रति जागरुकता
सुंदर चेहरा, सुंदर शरीर, ब्युटीफुल गर्ल यापलीकडेही मुलींची ओळख असते, अस्तित्व असतं हे मुलींना लहानपणापासूनच सांगितलं पाहिजे. आकर्षक चेहऱ्याबरोबरच निरोगी शरीरही महत्त्वाचं असतं. खेळ, नृत्य, कराटे, गिर्यारोहण, कुस्ती, चित्रकला, हस्तकला यापैकी तुमच्या मुलीला ज्यात रस असेल ते शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या. विविध प्रकारचे मैदानी तसेच साहसी खेळा यांचा अनुभवही तिला घेऊ द्या. सौंदर्याची व्याख्या फक्त चेहऱ्यापुरतीच मर्यादित नसते; तर तुमचं वागणं, बोलणं, कर्तृत्व यामध्येही ती असते हे तिला लहानपणापासून सांगा. त्याबद्दलची विविध उदाहरणे तिच्यासमोर ठेवा.
मुलीला मुलीप्रमाणे नैसर्गिकरित्या फुलू द्या. मुलगी असल्याचा सार्थ अभिमान बाळगायला तिला शिकवा. पण त्याचबरोबर तिला कणखर, आत्मनिर्भरही होऊ द्या.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 14:19 IST
Next Story
मैत्रिणींनो, ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करताय?