अरुणाचल प्रदेश म्हटलं की, ‘सेव्हन सिस्टर्स’पैकी एक इतकंच आपल्याला माहीत असतं. परंतु याकु तामे या शिक्षिकेच्या गौरवास्पद कामगिरीमुळे हे नाव आता राष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. कारण नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यात अरुणाचलप्रदेशमधील याकु टेम या शिक्षिकेचे नाव आहे. अरुणाचलप्रदेशमधून यावर्षी या पुरस्कारासाठी  एकमेव नावाची शिफारस झाली होती. शिकविण्याबरोबरच तेथील स्थानिक भाषा- न्याशी  जतन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. शिवाय या भाषेत समजेल अशी पुस्तकेदेखील तयार केली. त्यांच्या या विशेष कामगिरीमुळे त्यांच्या नावावर पुरस्काराची मोहोर उमटली.

शासकीय शाळा, जी-सेक्टर नाहरलागून येथे मुख्याध्यापक म्हणून याकु तामे कार्यरत आहेत. १९८५ साली एका छोट्याशा शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज जिल्ह्याच्या नावाजलेल्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. गेल्या ४२ वर्षांचा हा प्रवास वाटतो तितका सहज सोपा नव्हता.

१९८५ साली नाहरलागून येथील पाचीन गावातील शाळेत त्या सहाय्यक शिशिका म्हणून रूजू झाल्या, त्यावेळी त्यांना सगळे विषय शिकवावे लागत असे. पुढे जेव्हा काही वर्षांनी सरकारी शाळेत नोकरी मिळाली, तेव्हा कामाच्या निमित्ताने अनेक खेड्या-पाड्यातील शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गाव विकास आणि समाजशास्त्र (रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड सोशिओलॉजी) या विषयात त्यांनी एम.ए. केले होते. त्यामुळे ठिकठिकाणच्या गावी शिकविताना आनंदच होत होता.

पुरेशी साधने नाहीत म्हणून त्या कधीच अडून बसल्या नाहीत. उलट आहे त्या गोष्टींचा वापर करून, मुलांना शिकविण्यासाठी कसे प्रेरित करता येईल यावर त्यांचा अधिक भर असे. कित्येक गावात तर रोजंदारीवर काम करणारी तर कधी आर्थिकदृष्ट्या मागास असलेली कुटुंबे असत. जे आपल्या मुलांना खास करून मुलींना शाळेत पाठवायला तयार नसत. अशावेळी त्या स्वत: घरोघरी जाऊन लोकांची समजूत काढत. शिक्षण किती महत्त्वाचे आहे ते पटवून देत असत. त्यांच्या या मेहनतीस चांगली फळे लाभली. मुलींसह मुलगेदेखील शाळेत येऊ लागले. शाळेतील वातावरण त्यांनी नेहमीच खेळकर परंतु शिस्तबद्ध ठेवले.

फक्त पुस्तकी शिक्षणावर भर न देता, प्रत्यक्ष जीवन जगताना उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मुलांना शिकविल्या. मुलांना स्वत:च्या संस्कृतीची नीट ओळख व्हावी या उद्देशाने त्यांनी शाळेतील दोन दिवस ठरवून त्यादिवशी मुलांना गणवेश न घालता त्यांचे पारंपारिक पोशाख घालण्याची मुभा ठेवली.

शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना पोषक जेवण मिळावे, या हेतूने ‘मध्यान्ह भोजना’ ची व्यवस्था सुरू केली. शिकविण्याची त्यांची तळमळ लक्षात घेऊन अनेकदा प्रौढ स्त्री-पुरुष आम्हालादेखील शिकवा, असा त्यांच्या मागे तगादा लावत असत. तेव्हा त्यांनी आपल्या काही शाळांमध्ये प्रौढ शिक्षण वर्गाचीदेखील सोय केली.

विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शाळेत त्यांनी अनेकविध प्रयोग केले. त्यांना समुपदेशन देणे. एकदा तर एका चांगल्या कुटुंबातील मुलगा ड्रग्सच्या व्यसनात सापडला होता. अशावेळी मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबाच्या पाठींब्याची कशी गरज आहे,हे समजावून तर सांगितलेच. शिवाय त्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रातदेखील दाखल करून घेतले. याच बरोबर स्वत:ची सुरक्षितता कशी राखणे खास करून मुलींना याबाबतीत प्रोत्साहित केले.

त्यांच्या या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, तो  प्रजास्ताक दिनाच्या निमित्ताने. यावेळी सादर होणाऱ्या परेडसाठी अरुणाचलप्रदेश मधून दिडशे मुलांचा दल दिल्ली येथे पाठविण्यात आला होता. रिखम पाडा हा नृत्य प्रकार त्यांना सादर करावयाचा होता. या संपूर्ण दलाचे नेतृत्व याकु तामे यांनी केले. विशेष म्हणजे त्या परेडमध्ये हे नृत्य विशेष लक्षणीय ठरले. हा क्षण फक्त याकु यांच्यासाठी नाही तर सहभागी झालेले विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय आणि अरुणाचलप्रदेश राज्यासाठी अभिमानाचा क्षण होता.

आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत याकु यांनी विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनाही वेळोवेळी सहभागी करून घेतले आहे. मग ती शाळेची व्यवस्थापन समिती अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी असो वा प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आलेख मोजमाप करण्यासाठी असो. जिथे जिथे पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे तिथे तिथे त्यांनी पालकांकडून सहकार्य घेतले आहे. यामुळेच शाळा ही फक्त मुलांची न राहता आपली शाळा असा सहज उल्लेख पालकांच्या तोंडून होतो.