आपला या ना त्या कारणाने सतत संवाद सुरूच असतो. मग तो कधी प्रत्यक्ष बोलून होतो किंवा मग आजकालच्या जगातला वॉट्स अप संवाद असतो. एकूणात काय तर सतत बोलणं होत असतं, पण या लिखित आणि वाचिक संवादाच्या पलीकडेही एक संवाद असतो- जो मूक असतो. तो जेव्हा अनुभवता येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने मन शांत होतं. कारण बोलण्यालासुद्धा उर्मी लागते. उर्मी असली म्हणजे तिथे ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो आणि संवाद क्रिया घडते. हा सगळा ऊर्जेचा खेळच तर आहे. ऊर्जा खर्च झाली की श्रम होतात. फोनवर खूप वेळ बोलल्यावर एक मोठं काम पार पाडल्या सारखं वाटतं ते त्यामुळेच. पण निसर्गाच्या सान्निध्यात अवचित घडणारा संवाद हा आत्मसंवादाच्या जवळपास जाणारा असतो. जो विलक्षण प्रगल्भतेची जाणीव जागृत करतो. शांत वाटण्या पलीकडच्या अवस्थेला पोहोचल्यासारखं होतं आणि त्या एका संवादाने कित्येक वर्षांचे, महिन्यांचे, दिवसांचे श्रम नाहीसे होतात.
त्यादिवशीही असंच घडलं…
मडिकेरीहून थोडं पुढे गेल्यावर एक छान कॉफी इस्टेट होती. आजूबाजूला कॉफीच्या झाडांची दाटी. नुकताच पडून गेलेला पाऊस. त्या शिडकाव्याने झाडं तरारून, मोहरून गेलेली. कॉफीच्या झाडांची मोठी गंमत असते. मार्च -एप्रिलमध्ये जिथे आणि जसा पाऊस पडले तिथली झाडं फुलू लागतात. त्या शुभ्र फुलांचा मंद वास दरवळू लागतो आणि तो सगळा भाग विलक्षण सुंदर दिसतो. तो परिसर मागे सोडून आत शिरले तर एक जुनं ब्रिटिशकालीन घर नजरेला पडलं. इथेच आमची राहण्याची व्यवस्था होती. कमालीचा निसर्गरम्य परिसर होता तो. मुद्दामहून लावलेली बाग किंवा फुलं… झाडांची गर्दी नव्हती तिथे. कलात्कमकता होती, पण तरीही झाडांना मन:पूत वागण्याचं स्वातंत्र्य होतं. फुललेल्या बोगनवेलीपासून लिलीच्या सुंदर फुलांपर्यंत सगळंच मोहमयी होतं. सक्युलंट्सचे अनेक प्रकार होतेच, पण मिरी, दालचिनीसुद्धा होती. विलोच्या मोठ्या झाडांवर असंख्य चिमण्या चिवचिवत होत्या. सभोवार पसरलेली पंचवीस एकराची इस्टेट, त्यात वाढलेली बुटकी कॉफीची झाडं आणि उंचसे सिल्वर ओकचे वृक्ष.
खरं तर बंगल्यात जाऊन सामान ठेवायचं होतं, पण माझा पाय काही तिथून निघेना. तिथेच एका ओबडधोबड दगडावर टेकून मी पक्ष्यांचा आवाज ऐकत राहिले, पानांची सळसळ अनुभवत राहिले. कॉफीच्या फुलांचा मंद वास माझ्यापर्यंत येत होताच. सभोवती एक नाद भरून राहिला होता… निःशब्द नाद. शब्दांची गरजच नव्हती. आणि का असावी? निसर्ग जेव्हा बोलतो तेव्हा तो इतका जिव्हाळ्याने बोलतो की स्तिमित व्हायला होतं. किती काही सांगतो तो. ते ही अगदी मूकपणे!
तिथली वनस्पती सृष्टी, तिथलं पक्षी जीवन, किटकांच जग, वाऱ्याची लय सगळं सगळं व्यक्त होत होतं. माझा माझ्याशी होणारा संवाद थांबला होता. आतलं सतत बडबड करणारं मन जणू सुटी घेऊन दूर गेलं होतं. विचारांचे तरंग कमालीचे मंदावले होते. एक आगळावेगळा निसर्गसंवाद घडत होता. जगण्याला समृद्ध करणारा… स्वतः चीच स्वतः ला ओळख पटवणारा.
असाच एक संवाद अनुभवला होता तो भरदुपारी… उष्ण वातावरणात.
कुट्टा ते मैसूर असा नागरहोळे जंगलातून जाणारा रस्ता. भर दुपारचं तापलेलं ऊन. अशावेळी दोन-चार हरणांव्यतिरिक्त प्राणी दिसण्याची शक्यता नव्हतीच. पण सभोवताली वसंताने बहरून गेलेला निसर्ग. दुतर्फा जंगल आणि मधून जाणारी पायवाटसदृश गाडीवाट. गाडीचा वेग मंद. अधून मधून येणारे लहान स्पीड ब्रेकर सोडले तर गाडीला, विचाराला आणि भोवतालाला एक मंद लय लागलेली.
बहरलेला बहावा. झुंबरांसारखे खाली झुकलेले त्यांचे गुच्छ, तजेलदार पिवळ्या रंगाचे.
नाजूकसर, मुलायम, पोपटी पानं झाडाच्या सौंदर्यात भर घालणारी. खोडाच्या हलक्या पिवळट रंगाला ते सगळं अगदी शोभून दिसत होतं. व्हिन्सेंट व्हॅन गॉगची पिवळी सूर्यफुलं त्याच्या चित्रांतून पाहिली होती. त्या पिवळ्या रंगापेक्षाही हा बहाव्याचा रंग अधिक मखमली आणि उजळ वाटला. एक जिवंत चित्र समोर उभं असल्यासारखा.
झाडाच्या पायतळी असंख्य, इवलाली रोपं उगवलेली. प्रत्येक झाडातळीची रोपांची दाटी म्हणजे सृजनाचा उत्सवच जणू.जु नं विरून जायच्या आधी नव्याचा होणारा उगम. तो सगळा जंगल भाग बहावामय झालेला.
पुढे काही अंतरावर झाडी बदलली, कंटोळ, पांगारा, पळस, सावरी, तामण, करंज, अर्जुन अशा वृक्षांची दाटी झाली. जमिनीवर पसरलेल्या वाळक्या पानांतून चालणारी हरण शावक, तर कुठे जंगली कोंबड्यांची हलकी करकर, एवढीच काय ती जाग.
काळसर तोंडाची, अगदी झाडाच्या खोडासारखा रंग ल्यालेली माकडांची टोळी झाडाखाली विसावलेली. जवळ गेल्यावरही ओळखू न यावीत अशी स्तब्ध बसलेली ती प्रजा. पुढे सरता सरता समोर येणारं एक एक दृश्य हे जसं एखादं जिवंत चित्र वाटावं असं. फरक एवढाच की इथला चित्रकार कोणी व्यक्ती नव्हता. जातिवंत निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेली ती चित्रं डोळे तृप्त करत होती.
पंचेंद्रियांनी तो समोर चाललेला सोहळा अनुभवताना मन कापरासारखं हवेत विरून गेलं होतं. शांतता विसाव्याला आली होती- जी आतून बाहेरून व्यापून होती. कितीएक तास मी हे सगळं अनुभवलं असेल…
तो प्रवास यथावकाश संपला, पण ती जाणीव कित्येक दिवस पुरणारी ठरली.
mythreye.kjkelkar@ gmail.com
