तन्मयी तुळशीदास बेहेरे

दरवर्षी पाऊस ओसरला की ट्रेकिंगचे वेध लागतात. लोणावळा हा तर ट्रेकर्ससाठी स्वर्गच. अनेक छोटे -मोठे ट्रेक इथूनच सुरु होतात. लोहगड, विसापूर, कोरीगड, ड्युक्स नोज, ढाक भैरी, तुंग, उल्हास दरी… त्यामुळे पुण्याच्या आणि मुंबईच्या ट्रेकर्ससाठी भेटायला कॉमन पॉईंट म्हणजे लोणावळा. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शेवटच्या ट्रेन मध्ये बसलं, की भेंड्या सुरु व्हायच्या आणि लोणावळ्याचा ट्रेक म्हटलं की पहिलं गाणं असायचं एकवीरेचं. ते म्हणजे ‘एकवीरा आई तू डोंगरावर नजर हाय तुझी कोळ्यावरी’ नकळत हात आणि पाय ठेका धरायचे आणि आम्ही मनापासून गायला लागायचो, अनेक वर्षांपासूनचा हा प्रघातच होता.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

आणखी वाचा : Navratri 2022 : हीच खरी दुर्गालक्ष्मी !

नंतर कधीतरी आम्हाला इतिहास शिकवणारे प्राध्यापक जोशी सर आमच्या ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि त्यांनी आम्हाला एकवीरेची आख्यायिका सांगितली. जमदग्नी ऋषींनी स्वतःची पत्नी रेणुका हिच्यावर कोपिष्ट होऊन तिचा शिरच्छेद करण्याचा आदेश त्यांचाच पुत्र परशुराम याला दिला. परशुरामाने आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून रेणुका मातेचे धड आणि शीर वेगळे केले. त्यातील शिरांची उपासना ‘यल्लम्मा’ म्हणून तर धडाची उपासना भूदेवी, रेणुका, एकवीरा म्हणून केली जाते. ही देवी सुफलनाची आहे. गर्भधारणा आणि जीवनसर्जनाची अपार क्षमता असल्यामुळे एकवीरेला आदिमाता म्हणतात, एकवीरा ही पार्वती, यमाई, रेणुका या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. ही देवी कोळी, आगरी, कुणबी, दैवज्ञ ब्राह्मण, सीकेपी या समाजांची कुलदेवता आहे. दरवर्षी चैत्र आणि अश्विन महिन्यात देवीची जत्रा भरते हे सर्व त्यांच्याकडून आम्हाला पहिल्यांदाच समजले.

आणखी वाचा : Navratri 2022 :  उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास?

पण ही तर आगरी- कोळ्यांची देवता मग ती तर समुद्रकिनारी असायला हवी ती कार्ल्याच्या डोंगरावर कशी असा प्रश्न विचारल्यावर प्राध्यापक जोशी म्हणाले की अशी आख्यायिका आहे की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते कार्ल्याच्या डोंगरावर आले. तिथे एकवीरा मातेने दृष्टांत दिला आणि ‘एका रात्रीत याच जागी माझे मंदिर बांधा’ असा आदेश दिला जेणेकरून ‘माझ्या भक्तगणांना माझ्या दर्शनाचा लाभ घेता येईल’. त्या प्रमाणे पांडवानी एका रात्रीत हे मंदिर बांधले त्यावर देवीने प्रसन्न होऊन त्यांना ‘अज्ञातवासाच्या काळात तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही’ असा वर दिला.

आणखी वाचा : Navratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद!

आणखी एक विचारप्रवाह असा आहे की कार्ला हे ठिकाण उंचावर आणि कोकण आणि पठाराच्या मध्यभागी आहे त्यामुळे सोपारा बंदरावरून कापडाच्या व्यापारासाठी पैठणला जाताना आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यावे, तिचा आशीर्वाद घेऊनच पुढच्या प्रवासाला निघावे म्हणून व्यापाऱ्यांनीच एकविरा देवीचे देऊळ इथे बांधले असावे. लहानपणी रामाच्या- कृष्णाच्या गोष्टी आजी- आजोबांकडून ऐकून आपल्याला ते आपले वाटायला लागतात एक जवळीक निर्माण होते तसेच ही आख्यायिका ऐकल्यावर एकवीरा आई मला अजून जवळची वाटायला लागली. एकवीरा आईला भेटण्यासाठी डोंगर चढावा लागतो म्हणून मला ती ट्रेकर्सचीसुद्धा देवता असल्यासारखं वाटतं. तिच्या दर्शनाला जाताना दोन्ही बाजूला धबधबे, लोणावळ्याची गार हवा, हिरवी गार झाडं, रिमझिम पाऊस आणि त्या पावसात सचैल न्हाणारी इसवी सन पहिल्या शतकातील बौद्ध लेणी मनाला प्रफुल्लित करतात. अतिशय प्रसन्न मनाने मी मंदिरात प्रवेश करते, काळ्या कातळातून कोरलेल मंदिर, महिरपी, दिवे ठेवायला स्तंभ पाहात मी गाभाऱ्यात पोहोचते. काळ्या कुट्ट अंधारात मंद तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात जेव्हा शांत, तेजस्वी अशी एकवीरा आईचे दर्शन घेते तेव्हा नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. वाटत हिचा आणि आपला ऋणानुबंध तरी नक्की कधी पासून? ही देवी आपली कुलदेवता नाही ना, इथे कुठे आपला गाव आहे की गावी येताना आपण भक्तीभावाने दर्शनाला येऊ. मग असं काय आहे ज्यामुळे दरवर्षी आपण ओढल्याप्रमाणे तिच्या दर्शनाला येतो? की तीच बोलावते आपल्याला?

आणखी वाचा : नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व का दिले जाते?

खर तर एकवीरेशी नाळ जोडली गेली ती प्रचलीत कोळीगीतांमुळे. लहानपणी पहिल्यांदा पाय थिरकले ते कोळी गीतांवरच. मग लग्न समारंभ असो, ट्रेकिंग असो की सणावार, ही कोळीगीतं म्हणजेच सेलिब्रेशन आणि त्यात एकवीरा आईची गाणी हमखास वाजणारच. म्हणूनच लहानपणापासूनच मला आवडणार गाण होत ‘एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी’ जगाच्या पाठीवर कुठेही हे गाण गात असताना किंवा ऐकत असताना डोळ्यासमोर अंजिरी रंगाची साडी नेसलेली, लांब बाह्यांचा पिवळा धम्मक पोलका घातलेली, कलाबूत घातलेली शेवंतीची वेणी केसात माळलेली, भलं मोठं कुंकू भाळावर रेखलेली, कान भाराने तुटून पडतील की काय एवढ्या मोठ्या रिंगा १०/१२ तोळ्यांचे मंगळसूत्र आणि जाड जाड पाटल्या घातलेली कोळीणच बेफाम नृत्य करताना मला दिसू लागते.

आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

हल्ली सगळीच कोळी गीतं डीजे वर वाजत असली तरी मला मात्र पारंपरिक चाल आणि सोबत ढोलकी, कोंबडी बाज, पिपाणी, झांज, टिमकी असं पारंपरिक वाद्यांचा वापर केलेलं मूळ गाणंच आवडतं. असंही वाटत की कोळी गीत हे एक प्रकारच भक्ती गीतच आहे. कारण या गीतामध्ये देवीला आर्तपणे विनवणी केली जाते, देवीची भक्ती आणि देवीवरची श्रद्धा या गीतांतून व्यक्त होत असते. या गाण्यात एकवीरा एवढ्या उंचावर कार्ल्याला डोंगरावर बसलेली आहे की तिला तिथून दर्या दिसतो. म्हणून माझा धनी दर्यावर गेलाय आणि अचानक वादळ वारा सुटलाय तर त्याचा रक्षण कर, तो सुखरूप परत आला तर मी दसऱ्याला तुझी खणानारळाने ओटी भरीन आणि तुला कोंबडाबोकडाचा नैवेद्यसुद्धा देईन. हे गाणं कुणी रचलंय हे माहीत नाही पण या गाण्यातून देवीबद्दलचा जिव्हाळा आणि होडी पाण्यात घालताना आई एकवीरा संकटात पाठीशी उभी आहे हा विश्वास मला फार भावतो.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

‘चांदणं चांदणं झाली रात एकवीरेची पाहत होते वाट’ हे गाणंही खूपच गाजलं. एकवीरा जरी देवी असली तरी ती देखील एक स्त्रीच आहे, तिलाही माहेरवाशीण बनून कोड कौतुक करून घ्यायला आवडतं. म्हणूनच या गाण्यात देवीला बांगड्या भरा, नथनी करा, त्रिशूल करा असे लाड पुरवले जातात. एक स्त्री म्हणून एकवीरेच हे कोडकौतुक करणारं कोळीगीतही मला आवडतं. मनातल्या मनात मी कल्पना करते की ही एकवीरा आई अशा नव्या बांगड्या, नवी नथनी आणि नवा त्रिशूल घेऊन कशी मिरवली असेल आणि स्वतःच खुश होते. ‘एकवीरा आई तुझी पालखीं ग पालखीं चंदनाची’ हे गाणं ऐकल्यावर तर मला असं वाटल की चंदनाच्या पालखीतून जाताना एकवीरेला किती छान शीतल वाटलं असेल. जी स्वप्न पूर्ण करणं सर्वसाधारण माणसाला शक्य नसतं ती स्वप्न अशा या गाण्यातूनच पूर्ण केली जातात की काय, असंच प्रत्येकवेळी ही गाणी ऐकताना वाटतं मला.

आणखी वाचा : नवरात्री उत्सव: आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व

या सर्व कोळीगीतांमध्ये एकवीरेचा उल्लेख एकेरी असतो. जसा आपण आपल्या आईला ‘ए आई’ म्हणतो अगदी तसंच. कोळी समाजही एकवीरा देवीला हक्कानं एकेरी हाकंच आळवतो, आपली सुख दुःख तिला सांगतो. ती त्यांच्या गावी वसलेली नसली तरी उंच उडणाऱ्या घारीचं लक्ष जसं तिच्या पिल्लांपाशी असत तसच उंच डोंगरावर बसून ही एकवीरा आईचं लक्ष तिच्या लेकांवर म्हणजे कोळ्यांवर ठेवत असते आणि तीच आपलं रक्षण करेल हा विश्वास त्यांना असतो.

आणखी वाचा : स्नायू व पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणारे आसन

संत साहित्यातून आपण शिकतो की देव देव्हाऱ्यात नाही तर तो माणसातच आहे. तसंच मलाही वाटत की एकवीरा मातासुद्धा कार्ल्याच्या डोंगरावर बसून राहत नसेल, तीही आपल्या भक्तगणांसमवेत… अंजिरी रंगाची साडी नेसून, अंगभर दागिने लेवून, शेवंतीची वेणी माळून… दर्यावर होडीत बसून वादळवाऱ्यात लेकरांचं म्हणजे कोळ्यांचं रक्षण करत असेल, अडीअडचणींवर मात करायची शक्ती देत असेल… माहेरवाशिणीमध्ये वसून स्वतः च कौतुक करून घेत असेल. कारण ती कोळ्यांची आई आहे… आई सारखीच ती सर्वांत वावरणार ना? आणि आई तिच्यावर जीव ओवाळणाऱ्यांना पावणाराच ना?