प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न. मात्र, स्पर्धेच्या काही दिवस आधी आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ. पाच दिवस अन्नाचा घास नाही. साडेतीन आठवडे नेमबाजीचा सराव जवळपास बंद. शरीर साथ देत नव्हते, तयारीही अपुरी. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही नेमबाज नीरू धांडाने पावसाने भिजलेल्या शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्यभेद केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली.
जपान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत २६ वर्षीय नीरूने २९ सप्टेंबरला महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत तिने ३० पैकी २८ लक्ष्ये भेदत नवा आशियाई क्रीडा विक्रम प्रस्थापित केला. चीनच्या सुन यूनॉन्गने २६ लक्ष्यांसह रौप्य, तर कुवेतच्या हाजर अब्दुलमलिकने २१ लक्ष्यांसह कांस्यपदक जिंकले.
हे सुवर्ण अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी नीरू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. भारताला ट्रॅपच्या वैयक्तिक प्रकारात याआधीचे सुवर्णपदक १९७८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रणधीर सिंग यांनी मिळवून दिले होते. तब्बल ४८ वर्षांनंतर भारताच्या ट्रॅप नेमबाजीत पुन्हा सुवर्ण आले. यावेळी ते एका भारतीय महिलेच्या नावावर होते. नीरूची सुवर्णकथा इथेच थांबली नाही. पुढच्याच दिवशी तिने कायनान चेनाई याच्या साथीने मिश्र सांघिक ट्रॅपमध्येही सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत त्यांनी ३४ लक्ष्ये भेदत नवा आशियाई क्रीडा विक्रम नोंदवला.
चुलत भावाकडून प्रेरणा
नीरूच्या या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात हरियाणातील शेतकरी घरातून झाली. सुरुवातीला नेमबाज होण्याचे वैगरे तिचे स्वप्न नव्हते. मात्र, २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिचा चुलत भाऊ लक्षय श्योरण याने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले. लक्षयच्या त्या कामगिरीमुळे आणि त्यानंतर त्याला मिळालेला मान पाहून नीरू भारावून गेली. तिनेही नेमबाजीकडे वळण्याचे ठरवले. सुरुवातीला हा केवळ एक प्रयोग आणि छंद होता. घराजवळील तलावाच्या परिसरात तिच्या कुटुंबीयांनी तिला टिनच्या पत्र्यावर नेम साधायला सांगितला. स्वतःची महागडी स्पोर्टिंग गन घेण्याची परिस्थिती तेव्हा नव्हती. लक्षयने तिला स्वतःची बंदूक वापरायला दिली. भावाची बंदूक आणि उसने घेतलेल्या साधनांपासून सुरू झालेला हा प्रवास काही वर्षांत आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंजपर्यंत पोहोचेल, याची कदाचित तेव्हा कल्पनाही नव्हती.
कुटुंबाचे पाठबळ
नीरूचे कुटुंब हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील. पुढे ते मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे स्थायिक झाले. वडील शेतकरी, आई गृहिणी. अशा कुटुंबातून आलेल्या नीरूसाठी नेमबाजीसारखा खर्चिक खेळ निवडणे सोपे नव्हते. बंदूक, काडतुसे, प्रशिक्षण, प्रवास आणि स्पर्धांचा खर्च मोठा होता. मात्र, कुटुंबाने तिच्यातील क्षमता ओळखली आणि तिच्या स्वप्नाला पाठिंबा दिला. २०१९ मध्ये नीरूला मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत प्रशिक्षणाची संधी मिळाली. भोपाळमध्ये तिला योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन मिळू लागले. याच टप्प्यावर छंदाचे रूपांतर गंभीर क्रीडा कारकीर्दीत होऊ लागले.
लष्कराच्या शिस्तीने नवी दिशा
पुढे नीरू भारतीय लष्कराच्या आर्मी मार्क्समनशिप युनिटशी जोडली गेली. ती नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. लष्करातील शिस्तबद्ध वातावरण आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे तिच्या खेळाला आणखी व्यावसायिक दिशा मिळाली. तिच्या प्रशिक्षणात परदेशी प्रशिक्षक पीटर विल्सन यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ट्रॅपचे सुवर्णपदक जिंकलेले विल्सन पुढे भारतीय शॉटगन संघाच्या प्रशिक्षण चमूशी जोडले गेले. नीरूच्या तांत्रिक आणि मानसिक तयारीत त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा राहिला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नीरूचा प्रवास संघर्षमय ठरला. २०२२ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर नीरूने हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. अंतिम फेरी गाठण्यात आलेली काही अपयशही या प्रवासाचा भाग होती. मात्र, प्रत्येक स्पर्धेतून शिकत तिने आपली कामगिरी सुधारत नेली. २०२५ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या कामगिरीला आणखी मोठी झळाळी मिळाली. २०२६ हे वर्ष तिच्यासाठी निर्णायक ठरले.
विश्वचषकात इतिहास
जुलै २०२६ मध्ये इटलीतील लोनेटो येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ शॉटगन विश्वचषकात नीरूने महिलांच्या ट्रॅपमध्ये सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, विश्वचषकातील महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पात्रता फेरीत नीरूने १२५ पैकी १२१ गुण मिळवले. पहिल्या तीन मालिकांमध्ये तिने ७५ पैकी ७५ लक्ष्ये भेदली. अंतिम फेरीत तिने २७ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. यावेळी तिने फ्रान्सच्या माजी विश्वविजेत्या कॅरोल कॉर्मेनिएरला (रौप्य) मागे टाकण्याचीही किमया साधली.
आशियाई स्पर्धेपूर्वीच आव्हान…
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आइची-नागोयाला जाण्याच्या काही दिवस आधी नीरूसमोर मोठे आव्हान उभे राहिले. स्पर्धेच्या साधारण दहा दिवस आधी ती गंभीर आजारामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल झाली. तिचा तब्बल साडेतीन आठवड्यांचा सराव जवळपास विस्कळीत झाला. राष्ट्रीय शिबिरादरम्यान ती बहुतांश वेळ खोलीतच होती. तिच्या अवस्था इतकी खराब होती की सलग पाच दिवस तिने काही खाल्ले नव्हते, ती केवळ पाण्यावर होती, असे तिने नंतर सांगितले.
नागोयाला पोहोचून स्पर्धेत सहभागी होणेही एकेकाळी अनिश्चित वाटत होते. अशा परिस्थितीत नीरूचे वैयक्तिक प्रशिक्षक मन्शेर सिंग यांनी तिच्या मानसिक तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली. आजारपणाच्या काळात ते तिच्याशी नियमित फोनवर बोलत राहिले. जपानमध्ये पोहोचल्यानंतरही तिचे लक्ष स्पर्धेवर केंद्रित राहावे, यासाठी त्यांनी तिचा आत्मविश्वास टिकवून ठेवला.
सांघिकसह वैयक्तिक यश
आइची-नागोयाच्या शूटिंग रेंजवर पोहोचल्यानंतर नीरूने मर्यादित तयारी असूनही आपली लय पुन्हा पकडली. महिलांच्या सांघिक ट्रॅपमध्ये नीरू, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर या भारतीय त्रिकुटाने रौप्यपदक जिंकले. यानंतर तिच्यासमोर वैयक्तिक अंतिम फेरीचे आव्हान होते. अंतिम फेरीच्या दिवशी शूटिंग रेंजवर पावसाचे सावट होते. पावसामुळे हात, उपकरणे आणि दृश्य एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीशी नीरू पूर्णपणे अनोळखी नव्हती. भोपाळमधील प्रशिक्षण आणि चाचण्यांदरम्यानही तिला बदलत्या हवामानात नेमबाजी करण्याचा अनुभव मिळाला होता. परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीचा दबाव वेगळाच होता. समोर आशियाई पदक होते, मागे आजारपणाची सावली.
नीरूने मात्र परिस्थितीऐवजी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले. अंतिम फेरीत नीरूने ३० पैकी २८ लक्ष्ये भेदली. हा नवा आशियाई क्रीडा विक्रम ठरला. याआधीचा विक्रम २४ लक्ष्यांचा होता. पुढच्याच दिवशी नीरू आणि कायनान चेनाई यांनी मिश्र सांघिक ट्रॅपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. गेल्या काही वर्षांत नीरूने घेतलेली मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा, लष्कराची शिस्त आणि आजारपणापुढे हतबल न होण्याची तिची जिद्द याचेच हे फळ होते. आता तिच्याकडून अपेक्षा वाढल्या असून भविष्यात हे ‘सुवर्ण’सातत्य राखणे, हेच तिच्यासमोरील मुख्य आव्हान असेल, हे निश्चित.
