अपर्णा देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आई, प्रॉब्लेम झाला गं. सासरी गेलेल्या नेहलचा नाराजीचा स्वर आईच्या ताबडतोब लक्षात आला.”
“काय झालं? मला सांग, आपण त्यावर उपाय काढू.”
“आई, बघ ना! सुयोगचा जॉब बंगळूरुला आहे. इथं फक्त आम्ही दोघंच राहणार म्हणून किती खूश होते मी. खटपट करून माझीसुद्धा ट्रान्स्फर मी इथं करून घेतली.” फोनवरून नेहलची नाराजी तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होती.

“हे सगळं खरंय, पण झालं काय? तू इतकी रडवेली का झाली आहेस?” आई.
“अगं, सुयोगचे मॉम-डॅडसुद्धा इथंच राहायला येणार आहेत आणि तेही किमान सहा महिने तरी इथंच राहायचं म्हणताहेत… आणि आई, ते कायमचे राहिले तर?”
“अच्छा! हा ‘प्रॉब्लेम’ आहे तर!” आई हसून म्हणाली.
“आमचं इथं सगळं सेट झालंय गं आता. अचानक दुसऱ्या कुणाला ॲडजस्ट करून घ्यायचं म्हणजे सोपं आहे का?”
आणखी वाचा : नवरात्रोत्सव ‘नऊ दिवस’च साजरा का होतो?

“नेहल, खरं सांगायचं तर ही समस्या नाहीच! सुयोगचे आई-वडील आहेत ते. मुलाकडे कौतुकाने त्याचा संसार बघायला येणार नाहीत का? खूप प्रेमळ माणसं आहेत गं ती. तूही प्रेम लाव त्यांना, बघ किती आनंद मिळतो ते. नात्यातील गोडवा वाढवण्याचा आणि नवीन नाती प्रेमानं सामावून घेण्याचा विषय आहे. ते नेहमी तुमच्या भल्याचा, उत्कर्षाचा आणि आनंदाचाच विचार करणार. तुमची प्रगती बघून सुखावणार. कायम जरी तिथं राहिले तरी तुम्हाला त्रास होईल असं वागणार नाहीत ते. समजूतदार माणसं आहेत ती. आपण तुझ्या लग्नाआधी किती बोललो होतो यावर. ”
“मी फक्त सुयोगशी लग्न केलं आहे आई! बाकी मंडळी आणि त्यांचे नखरे झेलणं मला तरी नाही जमणार. मी इथं कशी राहाते, घर कसं ठेवते, काय करते, काय नाही करत, आम्ही दोघं एकमेकांशी कसं वागतो… या सगळ्यावर कुणाची तरी (सासूची) बारीक नजर आहे हे किती मोठं दडपण आहे. आपला संसार कुणासोबत विभागला जातोय ही भावनाच फार डिस्टरबिंग आहे गं!”

आईने एक क्षण विराम घेतला आणि म्हणाली, “तुला आठवतं नेहू, तू लहान असताना चांगली दोन वर्षं मला रात्रपाळी होती. त्या वेळी तुला दोन वर्षं कुणी सांभाळलं? आजी-आजोबांमुळे तुला पाळणाघरात ठेवण्याची वेळच आली नाही. प्रेम पेरलं की प्रेम उगवतं बरोबर. त्यांनी आपल्याला इतका जीव लावला की त्यांच्या आजारपणात त्यांचं करताना मला जराही त्रास वाटला नाही. आम्ही एकमेकांना आपलंसं केलं होतं.”

आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?

“हो, आठवतं नं. आणि शेवटी त्यांचं करता करता तू आजारी पडली होतीस. तेही आठवतं.” नेहल खोचकपणे म्हणाली.
“बरं नहू, मी किंवा बाबा खूप आजारी पडलो किंवा आम्हाला आधाराची गरज पडली तर आम्ही कुणाची मदत घ्यायची सांग. ”
“कमालच करते तू आई! कुणाची म्हणजे? मी आणि सुयोग आहोत की! आम्ही घेऊन येऊ तुम्हाला इथं! माझं कर्तव्यच आहे ते!”

“एक्झॅक्टली! मग आत्ता तुला जे वाटलं तेच सुयोगला त्याच्या आई-वडिलांबद्दल वाटणारच ना? ते चुकीचं आहे का? ते कुणी परके हा दृष्टिकोनच चुकीचा आहे. माणसाला जगायला पैसा लागतोच, पण वेळेला माणसंही लागतात. ही आपली माणसं आहेत, आपण एकमेकांसाठी आहोत, एक कुटुंब म्हणून पाठीशी उभे राहणार आहोत. ही भावना ठेव मनात. म्हणजे आज तुझ्या मनात असलेली टोकाची भावना बोथट होईल आणि त्यांचं तिथलं थोडंफार वास्तव्य तुला जड जाणार नाही. एकदा तुमची ‘वेव्हलेंथ’ जुळली की मग हळूहळू तुला खटकणाऱ्या गोष्टी बोलून सोप्या करता येतील गं. तुम्ही सगळ्या तरुण मुलींनी सासू-सासरे अजिबातच नकोत गं बाई… अशी भूमिका ठेवली तर तुम्ही आणि तुमचे नवरे म्हणजे सगळे पुरुष वडीलधाऱ्या मंडळींच्या मायेला कायमचे मुकाल. आणि तुमची मुलंही मोठेपणी तुम्हाला अजिबात जीव लावणार नाहीत. हे दुष्टचक्र आहे बेटा. त्यात नका जाऊ.”

“तू अशी छान छान बोलतेस नं, मग मन एकदम मोकळं होऊन जातं बघ.” नेहल हसून म्हणाली. आणि सासू-सासऱ्यांच्या आगमनाच्या तयारीला लागली.

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New married women dont want to stay with mother in law nrp
First published on: 27-09-2022 at 13:04 IST