साप… आपण रस्त्यावरून चालत जात आहोत आणि आपल्यापासून काही अंतरावरून साप सरपटत गेला तरी आपल्याला धडकी भरते. कारण चुकून जरी साप येऊन आपल्याला चावला तर मृत्यू अटळ. इतकी भीती या सापांविषयी बऱ्याच जणांच्या मनात असते. त्यामुळे साप दिसला की त्याला काठीने मारा किंवा आसपास जी काही साधने उपलब्ध असतील दगड-धोंडे त्यांनी पहिले सापाला मारा, हीच भावना आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या मनात असते.
नायजेरियातदेखील सापाविषयी आपल्यासारखीच परिस्थिती आहे. किंबहुना तिथे तर सापाशी निगडीत अनेक अंधश्रद्धा आहेत. शिवाय आजच्या आधुनिक युगातदेखील त्या तितक्याच प्रभावी आहेत. पण या गैरसमजांना छेद देत सापांशी मैत्री करणाऱ्या ताईवो ओकिकिओलाची कहाणी मोठी रंजक आहे. नायजेरियाची ‘सर्पकन्या’ म्हणून ती ओळखली जाते.
तर कोण आहे ही ताईवो ओकिकिओला? ही एक नायजेरियन तरुणी आहे जी हर्पिटोलॉजिस्ट आहे म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणारी तज्ज्ञ आहे. लहानपणांपासून ताईवोला सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी एक प्रकारचे आकर्षण होते. शिवाय ती ज्या परिसरात राहत होती, तिथे बरेच साप फिरायचे. इतर लोकांच्या मनात सापांविषयी फार भीती असायची, परंतु ताईवो मात्र सापाचा दंश आपल्याला होणार नाही याची काळजी घेत, ती सहजपणे त्यांना हाताळायची. त्यांची गुंडाळी करून आपल्या अंगा-खांदयावर फिरवायची, तर कधी गुंडाळलेल्या सापांची गुंडाळी सोडून एका हाताने त्यांना पकडून झुलवायची.
तिच्या या सापांबरोबर असलेल्या मैत्रीमुळे शेजार-पाजारचे लोक तिला चेटकीण समजत. तर तिच्या अंगात एखादे भूत शिरले आहे, असे ताईवोच्या आईला वाटे. त्यामुळे बरीच वर्षे शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी त्यांच्या घरी येणे सोडून दिले होते. परंतु साप म्हणजे जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाचे साधन किंवा एखाद्यावर वाईट शक्तीचा उपयोग करण्यासाठी सापांचा अवलंब केला जातो, या कल्पनांना तिने छेद देण्यास सुरुवात केली. करोना काळात ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तिने सर्पविज्ञान आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे शास्त्र शिकून घेतले.
सगळेच साप हे विषारी नसतात, पर्यावरणदृष्ट्या सापांचे असलेले महत्त्व, त्यांच्या विविध प्रजाती, त्या कशा ओळखाव्यात, सर्पदंश झाल्यास त्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत या सर्व गोष्टींबाबत तिने जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली. यासाठी तिने ऑनलाईन माध्यमाचादेखील उपयोग केला. लोकांच्या मनात सापांविषयी असलेल्या शंका आणि गैरसमज यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट ती टाकत असे. त्यामुळे ती फक्त तिच्या परिसरापुरती नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांबरोबर जोडली गेली.
याचा असा परिणाम झाला की, तिच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये सापांविषयी असलेली भीती हळूहळू कमी होऊ लागली. परिसरात कुठेही साप आढळल्यास लोक स्वत:हून तिला बोलावू लागले. आणि ती ज्या हिमतीने सापांना पकडत त्यामुळे तिच्या विषयी आता कौतुक आणि आदर वाटू लागला. जे लोक तिची चेटकीण म्हणून हेटाळणी करीत होते, तेच लोक आता तिला ‘सर्पकन्या’ म्हणून बोलवित असत. तिच्या या पदवीनं तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.
फक्त साप पकडल्यानंतर त्यांना जंगलात सोडून देणे, इतकेच तिचे ध्येय नसून सर्पदंश प्रतिबंध आणि त्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय साधने मोठ्या प्रमाणावर निर्माण करून ती शहरांबरोबर गावागावांत उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्राथमिक उपचार केंद्रात या गोष्टी आवश्यक असल्या पाहिजेत, यासाठी ती जोरदार प्रचार करीत आहे. आणि त्यासंदर्भात ती कामदेही करीत आहे. हे काम माझ्या एकटीचं नसून त्यासाठी सरकार, वैद्यक विभाग यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचं ती सांगते.
आज नायजेरिया प्रगत देश असला तरी इथे दरवर्षी सुमारे दोन हजार लोक सर्पदंशाने मरतात. कारण सर्पदंश प्रतिबंध औषधे ही फक्त काही खासगी रुग्णालयातच उपलब्ध असतात. जर वाजवी किमतीत आणि पुरेशा प्रमाणात ही औषधे सर्वत्र उपलब्ध झाली तर हे मृत्यू टाळता येतील असे ताईवोला वाटते. विविध प्राण्यांवर भरपूर प्रेम करणारी माणसे जगभरात अनेक असतील, पण सापांवर मनापासून प्रेम करणारी, त्यांच्या रक्षणासाठी धडपडणारी, त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर व्हावे म्हणून जनजागृती करणारी ताईवो आज सर्प प्रेमामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
