मैत्रेयी किशोर केळकर
मागच्या लेखात काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा आपण प्रयत्न केला. आज अजून काही प्रश्नांबाबत चर्चा करू. एखाद्या व्यक्तीला हिरव्या वनस्पती लावाव्या असं वाटणं हाच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण एखादं रोप लावणार आहोत, त्याची काळजी घेणार आहोत हे सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यासंबंधी असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मला फार आवडतं. हे जरी खरं असलं तरी एखादं रोपं लावणं हे जितकं सोपं असतं तितकीच त्याची निगुतीने काळजी घेऊन त्याला वाढवणं अवघड असतं.

मला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘‘मी कोणतं असं झाडं लावू ज्याची फारशी काळजी घ्यावी लागणार नाही, पण ते आनंद देत राहील.’’ तर अशावेळी मनी प्लांट लावणं योग्य. मनीप्लांट निव्वळ पाण्यातसुद्धा छान वाढतो. थोडासा स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला तरी त्याला पुरतो. तो वेलवर्गीय गटात मोडत असल्यामुळे आपण आधाराचा उपयोग करून हवा तसा वळवू शकतो. त्याला कमानीवर चढवता येतो किंवा मग कोकोडेमा पद्धतीने मातीच्या गोळ्यात लावून छताला, बाल्कनीत हुकला टांगताही येतो. अशाच पद्धतीने खायच्या पानाचा वेल आपल्याला लावता येईल. हिरव्यागार मघई पानाची वेल एकाबाजूला शोभिवंत ठरेल आणि दुसरीकडे त्याचा आहारातही उपयोग होईल.

आता यावरून आठवलं काहींना फक्त औषधी वनस्पती आपल्या छोट्याशा जागेत लावायच्या असतात. मग त्या कोणत्या लावाव्यात? हा प्रश्न असतो. आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून किंवा मग जागा आहे, पण औषधी वनस्पतींचा एक विभाग करायचा आहे म्हणून औषधी वनस्पतींची माहिती हवी असते. अशावेळी पहिल्यांदा मी सुचवेन की हळद लावावी. आंबे हळद, पिवळी हळद, काळी हळद अशी कोणतीही हळद लावली तरी ती बहुगुणीच असते. आंबे हळदीचं लोणचं करता येतं, पिवळी हळद कच्ची किसून त्यात आवळ्याचा कीस घातला, चवीपुरतं मीठ घातलं की सलाड सारखं मजेने खाता येतं.

पिवळ्या हळदीचे ओले कंद सुकवून घरच्या पुरती हळद पावडरसुद्धा करता येते. हा प्रयोग मी करून पाहिला होता. हळदीच्या छोट्या तुकड्यापासून काहीच दिवसांत भरपूर कंद तयार होतात. पावसाळ्यात तर हळद जोमाने वाढते. श्रावणात हळदीच्या पानावर पानगी, पातोळे, मोदक उकडवता येतात. जितकी कापावी तेवढी हळद अधिक जोमाने वाढते. सरत्या हिवाळ्यात हळदीची पानं पिवळी पडायला लागतात अशावेळी कुंडीत एक दोन कंद राखून बाकी सगळे कंद आपण सोडवून उपयोगात आणू शकतो.

काळ्या हळदीच्या हिरव्या पानांवर मधोमध एक काळी रेघ असते, त्यामुळे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण दिसते. तिचा वापर आपण शोभेच्या झाडासारखा करू शकतो. आंबे हळदीचा उपयोग तर सर्वज्ञात आहेच. हळदी बरोबरच आपण कढिपत्त्याचं किंवा कढीलिंबाचं झाडंही लावू शकतो. पावसाळ्यात एखादी चांगली वाढ झालेली फांदी आणून लावली तरी पुरते. सहा एक महिन्यात ती चांगला जोर धरते. तुळस तर आपण लावतोच, पण सोबत बेलाचं झाडंही असलं तर उत्तम. प्राजक्ताचं छोटं रोपं ही लावता येईल. प्राजक्ताची पानं खोकल्यावरच्या काढ्यात उपयोगी पडतात.

एखादं रोपं गुळवेलीच लावावं. वेलवर्गीय गुळवेल फार झटकन वाढते, शोभिवंत तर असतेच, पण औषधी ही असते. करोना काळात गिलोए किंवा अमृता या नावाने तिचा वापर आवर्जून केलेला आठवत असेल. गुळवेलीची पानं आणि वाळलेल्या काड्या यांचा उपयोग तापावरच्या औषधात होतो.
बडीशेप, मोहरी, लसूण हीसुद्धा औषधी वनस्पतींमधेच मोडतात. मंडुकपर्णी नावाची पाण्यात आणि जमिनीवर वाढणारी वनस्पतीसुद्धा आपण लावू शकतो.

इंडियन पेनीवर्ट किंवा मराठीत ब्राम्ही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतींच्या पानांची उत्तम चटणी करता येते जी अतिशय पौष्टिक असते. जोडीला आलं, पुदीना मात्र लावायला हवा, म्हणजे ताज्या चटणीची मजाच काही न्यारी असेल. ही मंडूकपर्णी एखाद्या खोलगट काचेच्या भांड्यात लावली तर ती शोभेसाठी आपण घरात सेंटर टेबलवर ही ठेवू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला अजून एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे, जास्वंदीचं रोपं लावलं, छान वाढलं, बरीच फुलंही आली, पण काही दिवसांनी त्याला कीड लागली आणि पूर्ण झाडच मेलं. जास्वंद, भेंडी, अंबाडी, पीस लिली या सगळ्या झाडांवर पावडरी मालड्यु किंवा मावा हा रोग हमखास पडतोच. हिरव्या रंगाच्या किटकाची टिंबासारखी दिसणारी प्रजा झाडाच्या फांद्यांवर वाढू लागते. त्यांच्या अंगातून एक चिकट स्राव पाझरत असतो. त्या स्रावामुळे मुंग्या यांच्याकडे आकर्षित होतात आणि मग बघता बघता हा रोग झाडाला व्यापून टाकतो. जागोजागी पांढरे पुंजके दिसू लागतात. खूप पसरण्याआधीच जर हा लक्षात आला तर तेवढी फांदी कापून टाकून, दूरवर फेकून दिली किंवा जाळली तरी काम भागतं, पण जर हा रोग खूप पसरला तर मात्र तंबाखू उकळून त्याच्या पाण्याचा फवारा किंवा कडुलिंबाच्या तेलाचा फवारा करावा. अगदीच नाही जमलं तर संपूर्ण झाडाला चक्क चुलीच्या राखेने आंघोळ घालावी म्हणजे अगदी माखून टाकावं. एक दोन दिवस मुळीच ती राख झटकायची नाही. असं केलं तर झाडाच्या फांद्या कोरड्या झाल्यामुळे मावा वाढत नाही व सुकून जातो. या अशा छोट्या, पण परिणामकारक उपायांनी आपण आपली बाग चांगली सांभाळू शकतो.
mythreye.kjkelar@gmail .com