कुमुदिनीमध्ये हार्डी आणि ट्रॉपिकल असे दोन प्रकार असतात हे आपण मागील लेखात बघितलं. दोनही प्रकारातल्या लिली उत्तम फुलतात. भरपूर आनंद देतात. हार्डी लिली या लाल, पिवळ्या, पांढऱ्या, पीच या मूळ रंगात अनेक सुंदर छटा दाखवतात. यांची पाने आणि फुले ही पाण्याला समांतर वाढतात. वर्षातील ठराविक महिन्यात यांना फुलं येतात. याउलट ट्रॉपिकल लिली या वर्षभर भरभरून फुलतात. यांच्या फुलांना मंद सुगंध असतो. यांची फुले आणि त्यांचे देठ हे पाण्यापासून थोडे उंच वाढतात. ट्रॉपिकल लिली या अनेक सुंदर रंगात मिळतात. यांचे रंग काहीसे फिकट, पण अतिशय उत्फुल्ल असतात. बल्ब (कंद) लावून यांची सहज वाढ करता येते. ट्रॉपिकल लिली देखभालीसाठी आणि जोसण्यासाठी सोप्या असतात.
ज्यांना पाणवनस्पती किंवा वॉटर गार्डन करायची इच्छा असेल त्यांनी या दोन्ही प्रकारातील लिली लावल्या पाहिजेत. जेणे करून बाग सदासर्वकाळ फुललेली राहील. मागील लेखात गोगलगायी आणि शेवाळ यांच्याबद्दल लिहिलं होतं. या दोन गोष्टींचा सातत्याने बंदोबस्त करावा लागतो. यासाठी काही रासायनिक औषधे वापरली जातात, पण मी रासायनिक खते किंवा इतर रासायनिक औषधे बागेसाठी कधीच वापरली नाहीत. शेवाळासाठी नेहमीच हाताने साफसफाई करणे हा उपाय केला. जसजशी लिलींची संख्या वाढायला लागली तसे पक्षी माझ्या बागेमध्ये येऊ लागले आणि काही विशिष्ट पक्षी या गोगलगायींचा आपोआपच बंदोबस्त करू लागले. गप्पी मासे सोडल्यामुळे पाणीही स्वच्छ राहत होते. या सगळ्या लिली जरी वाढत असल्या तरीसुद्धा त्यांची संख्या वाढू लागली तशी त्यांना वेगळं करून नवीन टबमध्ये लावणं हे नवीन काम सुरू झालं.
हार्डी लिली या रायझोम किंवा प्रकंदांपासून वाढतात, त्यामुळे त्यांना विशिष्ट ठिकाणी छेद देऊन हे रायझोम मी नवीन टबमध्ये लावले. बल्ब किंवा कंदापासून वाढणाऱ्या ट्रॉपिकल लिली लावणं त्यामानाने सोपं होतं. बरेच वेळा मी कंद वेगळे करून, कोरडे करून ठेवत असे. मग सोयीनुसार त्यांची लागवड करत असे. हे कंद अतिशय पौष्टिक असून आदिवासी लोक मोठ्या आवडीने खातात अशी नवीन माहिती या दरम्यान मला मिळाली होती. तसेच वॉटर लिलीच्या सूक्ष्म बियांपासून पौष्टिक खीर केली जाते. या बिया मिळवणे आणि गोळा करणे हीसुद्धा एक मोठी गंमतीदार पद्धत आहे. ती समजून घेण्यातही वेगळीच मजा आहे. पाणवनस्पतींच्या प्रांतात माझी मुशाफिरी सुरू झाल्यावर मला अशा नवीन नवीन गोष्टी कळू लागल्या.
गच्चीवर लावलेल्या या कुमुदिनींच्या बागेत एक दिवस एक गंमत झाली. हिवाळ्यातल्या एका शांत सकाळी मी एका कुंडाजवळ लिहित बसले होते. वातावरण अल्हाददायक होतं. सकाळचं कोवळ ऊन पसरलं होतं. कमळफुलं आणि कुमुदिनी वाऱ्यावर मंदपणे डोलत होत्या. पाण्यात गप्पींची लपाछपी रंगात आली होती.
गच्चीला लागून एक उंच झाड होतं त्यावर एक pond heron म्हणजेच पाणथळ जागी आढळणारा बगळा बसला होता. हा पक्षी मी कधीही आमच्या परिसरात पाहिला नव्हता. कुतूहलाने मी त्याचं निरीक्षण करू लागले तर हे महाशय अगदी ध्यानस्थ बसल्यासारखे होते. ‘काक: चेष्टा बको ध्यानं’ या संस्कृत सुभाषिताची मला अगदी चटकन आठवण झाली. आजूबाजूला चतुरांची प्रजा निवांत गिरक्या घेत होती. काही वेळाने अगदी अचानकपणे झडप घालून या पक्षाने आपल्या लांब चोचीत खूप सारे चतुर पकडले. पुन्हा तो अगदी निश्चिंत बसला. त्याचं हे चतुरांशी चतुरपणाचं वागणं मोठं मजेशीर होतं. निसर्गातली ही एक छोटीशी कृती, पण ती निरखताना मला विविध अर्थ उलगडत गेले. आपली एखादी कृती ही निसर्ग चक्रात नोंदवली जाते याची जाणीव झाली. मी केलेल्या पाणवनस्पतींच्या जोपासनेमुळे हे पक्षी महाशय इथे आले होते. पुढे ते माझ्या पाण्याच्या कुंडांच्या काठावर ही बसलेले आढळून यायला लागले.
यातून एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली की, आपण करत असलेल्या चांगल्या किंवा वाईट, उपयुक्त किंवा उपद्रवी कृतीला निसर्गाकडून तात्काळ प्रतिसाद मिळत असतो. फक्त आपली निरीक्षण शक्ती मात्र जागृत हवी.
mythreye.kjkelkar@gmail.com