मागील महिन्यात वक्तृत्व स्पर्धांसाठी गांधी स्मारक समितीत गेले होते. गावदेवीचा तो जुना परिसर, सेवासदन, गांधी स्मारकासमोरच्या गल्लीत असलेली ती जुनी घरं… आणि गल्लीच्या उजवीकडे वळलो की सरळ पुढे जाताना लागणारं गावदेवीचं मंदिर. मला हा सगळा परिसर फार आवडतो. तिथे गेलं की जुन्या काळात गेल्याचा भास होतो. वाटतं, आता या इमारती आपल्याशी बोलू लागतील. वास्तूकलेची वैशिष्ट्यं सांगतील, इतिहास जिवंत करतील…
या वेड्या समजूतीनेच मी काम संपल्यावर त्या सभोवतालच्या परिसरात फिरत राहते- अगदी निरूद्देश. आजही तेच केलं. लांबवर चक्कर मारली, देवीच्या देवळापासून पलीकडे जात, समोरच्या गल्लीतून बाहेर येऊन दोन वळणं मागे टाकत इस्कॉन मंदिरात जाऊन आले, खरं आकर्षण पुढे होतं- ते म्हणजे बाबुलनाथाची भेट. शुभ्र संगमरवरी मंदिरात ऐसपैस गाभाऱ्यात विराजमान झालेला बाबुलनाथ प्रचंड मोहात पाडतो. जुलैमध्ये आणि त्यात आठवड्याचा मधला वार असल्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नव्हती. फुलांच्या रंगीबेरंगी आराशीत सजलेला तो साजरा शंकर मी डोळेभरून पाहून घेतला. हो… अगदी डोळे भरून पाहिला. एरवी श्रावणी सोमवारी किंवा गर्दीच्या वेळी इथे आलेच नसते. कारण गर्दीतले दर्शन मला मुळीच मान्य नाही. देवाला नीट निरखता तर येत नाहीच आणि त्याच्याशी आत्मिक संवादही होत नाही.
मनसोक्त दर्शन झाल्यावर खाली उतरले कमानीच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे सोम नावाचं गुजराती उपहारगृह आहे. मागे एकदा तिथे गेले होते. यावेळी ठरवलं इथली पानकी खाऊन पाहायची. वर्णनावरून ती आजीच्या हातची पानगीच असणार असं वाटतं होतं आणि झालंही तेचं. ही पानकी आमची पानगीच होती. केळीच्या हिरव्यागार पानात खरपूस भाजलेली आणि सोबतीला चटण्यांचा सरंजाम. दोन साधारण आकाराचे पानगीचे तुकडे होते. त्याचे घास घेताना आजीच्या घसघशीत मोठ्या पानग्या आठवल्या. तवशी काकडी किसून गूळ घालून केलेल्या काकडीच्या पानग्या आणि ताकात भिजवलेल्या तांदुळाच्या पिठाच्या तिखट पानग्या. तेलाचा पुसटसा हात लावून भल्यामोठ्या मोदक पात्रात लहानशा काटक्यांची महिरप लावत उकडून घेतलेल्या.इतका चटपटीत हेल्दी, जोडीला इकोफ्रेंडली नास्ता आपल्याला किती सहज मिळत होता त्याची जाणीव ते दोन वितभर पानगीचे पातळ तुकडे खाताना अगदी खोलवर झाली.
हळदीच्या पानात उकडलेले मोदक, त्यांना येणारा हळदीचा उग्र, पण हवाहवासा वास, केळीच्या पानातल्या पानग्या उकडवलेल्या आणि भाजलेल्यासुद्धा! मुचकुंदाच्या पानावरचा गुरगुट्या भात, त्यावर दाटसर पसरलेला पिवळं धम्मक मेतकूट. गरम भाताला लागलेला पानाचा आणि मेतकूटाचा स्वाद, जिभेपेक्षाही आधी श्वासात खोलवर रूजलेला.
उडपी मंदिराच्या लगत एक स्थानिक भाजी बाजार आहे तिथे फणसाच्या पानाचे तयार द्रोण मिळतात. यात इडलीचं पीठ भरून छान इडल्या उकडून खातात. एकदा मी ही तयार द्रोण आणून निगुतीने इडल्या केल्या. ताज्या पानांइतका नाही, पण फणसाचा अंगभूत वास इडलीत अगदी खोलवर भिनला होता. ती जिभेवर ठेवली आणि चिंब पावसात काप्या फणसाच्या पानांचा हिरवा दर्प यायचा त्या आठवणींची कळ मनात उमटली…
फणस, मुचकुंद, केळी, हळदीची पानं तर रोजचीच, पण घोरक्यानाच्या नाजूक पाल्यावर रचून उकडलेले कंद, अळकुड्या आणि जोडीला रताळी… इतकी फर्मास चव लागायची म्हणून सांगू. बागेच्या पलीकडच्या अळविणीच्या अंगणात पावसात भरगच्च अळू उगवायचा. त्याची ती पोपटीसर नाजूक, पसरट पानं आणताना, जोडीला केनाची नाजूक पाती खूडून आणायचं कामही आम्हा मुलांना करावं लागे. अळूची पातळ भाजी होई आणि केनाची भजी. परसातल्या नागवेलीची पानं जेवणानंतर गुलकंद घालून खायला मिळत ती ही अधेमधे, पण त्यांचा तो दर्प आणि सर्रकन् जिभेवरून पुढे सरकणारा तिखटपणा हळूहळू गुलकंदात विरून जाई. आंबाडीची भाजी भाताच्या कण्या आणि डाळीमुळे अशी फक्कड लागे तर शेवग्याचा मऊ
लुसलुशीत पाला मऊसर शिजल्यावर वरून दाट पांढरं शुभ्र खोबरं त्यावर पसरलं जाई. मग ती भाजी पाल्याचा कोवळेपणा हवा म्हणून खायची की ओल्या खोबऱ्याचा सढळ वापर केलाय म्हणून खायची हा प्रश्न नेहमीच पडे.
पावसाळ्याच्या हिरव्यागार ऋतुतलं हे पर्ण वैभव रंगातून डोळ्यात,स्पर्शातून जाणीवेत आणि गंधातून श्वासात खोलवर उतरत असे. आजचा पाऊस काळ मात्र बदललाय हेचं खरं, पानांचं वैभव लोपलंय. गंध हरवलाय आणि ती लज्जतदार पानं तरी आता कुठे मिळतायत? काउंटरवर जाऊन इवल्याशा पानगीचं घसघशीत बिल देताना, ‘‘छे ! काहीतरीच असतं बा मुंबईकरांचं!’’हे आजीचं वाक्य पुसटसं ऐकू आल्यासारखं वाटलं. क्षणभर हसू आलं, तरीही खोलवर काहीतरी हातातून निसटल्याची जाणीव मात्र झालीच.
mythreye.kjkelkar @ gmail.com
