Premium

स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी!

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार इराणमधील सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. महिलांवर होणाऱ्या दडपशाहीविरोधात त्या गेल्या ३२ वर्षांपासून आवाज उठवत आहेत, लढा देत आहेत. त्यासाठी चाबकाचे फटके आणि वारंवार तुरुंगवास अशी मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे आणि चुकवत आहेत. आताही त्या तेहरानमधील एव्हिन तुरुंगात १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

Nobel Peace PrizeIranian human rights activist Narges Mohammadi year 2023
स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पर्शियन भाषेत नर्गिस म्हणजे एक प्रकारचे फूल. प्रत्यक्षात नर्गिस मोहम्मद यांनी फुलांच्या पाकळ्यांचा कोमल रस्ता निवडण्याऐवजी काटेरी आयुष्याची निवड केली आहे. इराणमध्ये धर्म, परंपरा आणि सामाजिक चालीरितींच्या नावावर महिलांवर केला जाणारा अत्याचार थांबावा यासाठी नर्गिस मोहम्मद विद्यार्थीदशेत असल्यापासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी गेल्या २५ वर्षांमध्ये १३ वेळा तुरुंगवास, एकूण ३१ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा (जी अद्याप पूर्ण झालेली नाही) आणि चाबकाचे १५४ फटके खाण्यासारखी मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे. त्यांचे पती तघी रहमानी आणि मुलांनाही त्याचे परिणाम सहन करावे लागले आहेत. सततच्या तुरुंगवासामुळे त्या गेल्या १५ वर्षांपासून आपल्या पतीला भेटू शकलेल्या नाहीत तर मुलांना अखेरचे पाहिले त्याला सात वर्षे होऊन गेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५१ वर्षांच्या नर्गिस मोहम्मदी सध्या तेहरानच्या एव्हिन तुरुंगात आहेत. त्यांना १२ वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. एव्हिन तुरुंगात राजकीय कैदी आणि पाश्चात्त्य देशाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या कैद्यांना ठेवले जाते. सर्वात पहिल्यांदा १९९८ मध्ये इराणी राजवटीवर टीका केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना वर्षभर तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर अटक आणि तुरुंगवास हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. सध्याची १२ वर्षांची शिक्षा धरून त्यांना आतापर्यंत एकूण ३१ वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात जवळपास २० वर्षे त्यांनी तुरुंगात काढली आहेत.

हेही वाचा… बहुविकलांगतेवर मात करणारी कृष्णा बंग आता वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर; माय-लेकीचा प्रेरणादायी प्रवास

नर्गिस मोहम्मदी या इराणमधील डिफेंडर्स ऑफ ह्युमन राइट्स सेंटर या एनजीओच्या उपाध्यक्ष आहेत. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या इराणमधील पहिल्या महिला शिरीन इबादी यांनी ही एनजीओ स्थापन केली आहे. मानवाधिकार आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या या एनजीओवर इराणने बंदी घातली आहे.

‘तुमचे धाडस असेच राहू द्या आणि यातून पुढे मार्ग काढा असे आम्हाला जगभरातील भेदभावाला सामोरे जाणाऱ्या महिलांना सांगायचे आहे’, अशी प्रतिक्रिया पुरस्कार समितीच्या प्रमुख बेरिट रीस-अँडरसन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नर्गिस मोहम्मदी आणि इराणमध्ये ‘स्त्री, जीवन, स्वातंत्र्य’ यासाठी आक्रोश करणाऱ्या लाखो लोकांना आम्हाला प्रोत्साहन द्यायचे आहे असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा… पर्यटनाचा व्यवसाय निवडायचाय? शासन करेल मदत

नर्गिस या विद्यार्थीदशेत असल्यापासूनच विविध चळवळींमध्ये सहभागी होत असत. इराणमधील परंपरा आणि सामाजिक प्रथा यासह धार्मिक जुलूमाविरोधात लढणे हे माझे तेव्हापासून ध्येय होते असे त्यांनी माहसा अमिनीच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेल्या लेखात ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे. सरकार जितक्या जास्त लोकांना तुरुंगात टाकेल तितकी आमची ताकद वाढत जाईल हे त्यांना समजतच नाही असे त्यांनी या लेखात म्हटले आहे.

माहसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीने ‘व्यवस्थित’ डोके न झाकल्यामुळे तिला पोलिसांनी मारहाण केली आणि त्यांच्या कोठडीतच तिचा मृत्यू झाला. ही घटना गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला घडली होती. त्यानंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने उसळली. ही निदर्शने चिरडून टाकण्यासाठी हुकुमशाही राजवटीने ताकदीचा क्रूर वापर केला. त्यामध्ये ५०० हून अधिक लोकांनी जीव गमावला तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांना विविध तुरुंगांमध्ये डांबले. या निदर्शनांमध्ये हौतात्म्य पत्करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींचा समावेश होता.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: हिरव्या मातीचे मैत्र

मोहम्मदी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. नर्गिस यांच्या संघर्षाला सलाम करणाऱ्या प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरून देण्यात आल्या. आपले स्वातंत्र्य, आरोग्य आणि अगदी जीवनसुद्धा धोक्यात टाकून स्वतःच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सर्व महिलांना हा सन्मान आहे असे संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी-जनरल अँटोनियो गुटेरेस म्हणाले. या पुरस्कारामुळे इराणमधील महिलांच्या संघर्षाकडे सगळ्यांचे लक्ष जाईल अशी अपेक्षा शिरीन इबादी यांना वाटते. मात्र, नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल पुरस्कार जाहीर होणे ही पाश्चात्त्य देशांची इराणला बदनाम करण्याची चाल आहे असे इराणच्या सरकारला वाटते. मात्र, सामान्य इराणी नागरिक, विशेषतः तरुणी या पुरस्काराचे मोल जाणतात. नर्गिस आपल्या हक्कांसाठी वैयक्तिक सुखाची किंमत मोजून हा लढा देत आहेत याची त्यांना जाण आहे आणि त्यासाठी त्या कृतज्ञताही व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nobel peace prize declared to iranian human rights activist narges mohammadi for year 2023 dvr

First published on: 07-10-2023 at 14:51 IST
Next Story
बहुविकलांगतेवर मात करणारी कृष्णा बंग आता वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर; माय-लेकीचा प्रेरणादायी प्रवास