भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
न्यूट्रास्युटिकल्समध्ये दोन शब्दांचे संयुग आहे- न्युट्रिशन आणि फार्मास्युटिकल्स. आहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच रोग प्रतिबंधक औषध उपचार म्हणून न्यूट्रास्युटिकल्स विशेषत्वाने तयार केलेली असतात. जागतिक स्तरावर न्यूट्रास्युटिकल्सची पोषणमूल्य देणारे, आरोग्य सुधारणारे, सुरक्षितता देणारे म्हणून वेगाने वाढ होते आहे. प्रीबायोटिक्स म्हणजे शरीर जे अन्न घटक पचवू शकत नाही, पण शरीरातील सूक्ष्मजीवांच्या वाढीस मदत करतात असे तंतुमय पदार्थ.

प्रोबायोटिक्स म्हणजे शरीरात असणारे सूक्ष्मजीव, जीवाणू, अन्न पचनासाठी आणि काही रोग प्रतिबंधक म्हणून काम करतात. दही, आंबवलेल्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळतात. प्रीबायोटिक्स व प्रोबायोटिक्स हे एकटे किंवा दोन्ही मिळून एकत्र दिले जाणारी, खाद्यपदार्थांमधून मिळवलेली, आहाराच्या बरोबरीने दिली जाणारी, वैद्यकीय उपयोगासाठी वापरली जाणारी, कॅप्सूल किंवा टॅब्लेटसारख्या औषधी स्वरूपात दिली जाणारी जैविक-सक्रिय संयुगे यांना न्यूट्रास्युटिकल्स म्हणतात.

फूड सप्लिमेंट्स म्हणजे आहारातून मिळणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी घेतली जाणारी जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने किंवा वनस्पतीजन्य उत्पादने या दोहोंमध्ये फार बारीक फरक आहे.

न्यूट्रास्युटिकल्स शक्यतो विविध नैसर्गिक स्त्रोतांमधून जसे की, सूक्ष्मजीव, वनस्पती आणि समुद्री जीव यामध्ये आढळून येतात. त्यापैकी बरेच संशोधन आणि वापर वनस्पतीजन्य न्यूट्रास्युटिकल्सवर झाले आहे. ज्यामध्ये टरपेनॉइड्स, पॉलिफिनॉल, फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स हे सर्व घटक ‘फायटोकेमिकल्स’ या नावाने ओळखले जातात, जे नैसर्गिक औषधांचा मुख्य आधार आहेत. या सर्व फायटोकेमिकल्समध्ये जळजळ कमी करणारे, नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात तसेच हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करतात, कर्करोगावर मात, सूज कमी करणारे, वेदनाशामक, अँटी-ॲलर्जिक, सूक्ष्मजीवावर मात करणारे गुणधर्म असतात. हे सर्व घटक बहुसंख्येने फळे, भाज्या, पालेभाज्या, मसाल्याचे पदार्थ, तृणधान्य यात असतात. न्यूट्रास्युटिकल्स शारीरिक समतोल राखण्यासाठी तसेच जुनाट, गंभीर आजारांचे धोके कमी करण्यासाठी गरजेची असतात.

उदाहरण द्यायचे झाले दररोज तंतुमय पदार्थ, पॉलिफिनॉल, आहारात घेतले आणि चयापचय क्रियेमध्ये बदल घडवून आणले, शिवाय ऑक्सिडेटिव्ह ताण कमी केला तर टाईप २-मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. ऑक्सिडेटिव्ह ताण म्हणजे शरीरातील फ्री रॅडिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स यांच्यातील असंतुलन, ज्यामुळे पेशींचे नुकसान होते. कर्करोग, अल्झायमर आणि हृदयरोग यांसारख्या अनेक आजारांमध्ये याची भूमिका असते. सिगारेटचा धूर आणि पर्यावरणातील त्रासदायक घटक यांसारखे विषारी पदार्थ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात, तर अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले अन्नपदार्थ तो कमी करण्यास मदत करतात.

ओमेगा-३ फॅटी ॲसिड, कोरफड, गव्हांकुर, हळदी मध्ये असलेले कर्क्युमिन, समुद्र शैवाल, जिनसेंग. रेस्वेराट्रोल हे लाल द्राक्षे, रसाळ फळे आणि लाल वाईनमध्ये आढळणारे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे. हृदयरोग, कर्करोग आणि अकाली वार्धक्य टाळण्यास मदत करते, शरीरातील पेशींची हानी होण्यापासून वाचवते.

मुलभूत कार्य- रोगप्रतिबंध आणि आरोग्य वर्धक

न्यूट्रास्युटिकल्स हृदय रोग, मधुमेह, संधिवात, लठ्ठपणा, डोळ्यांचे आजार, कर्करोग, तोंडाचे आजार, कंपवात, स्मृतिभ्रंश या रोगांचे प्रतिबंध करतात. तर पचनसंस्थेचे आजार, मूळ पेशींची वाढ, मायटोकॉन्ड्रियाची नवीन निर्मिती, मूत्रपिंड आणि उत्सर्जनाचे आरोग्य, आयुर्मान वाढणे, प्रजो‍त्पादन अशा रीतीने आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.

भारताचा विचार केला तर कोविड-१९ नंतर लोकांचा स्वतःच्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याबद्दल जाणीव जागृती निर्माण झाली. आरोग्याचे आणि निरामय, स्वास्थ्य आयुष्याचे महत्त्व लोकांना पटले, त्यांच्या मनावर बिंबवले गेले. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी न्यूट्रास्युटिकल्स सप्लिमेंट्स घेण्याकडे लोकांचा कल वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणून न्यूट्रास्युटिकल्स बाजारपेठ एकदम विस्तारत गेली. शहरीकरण, वाढते उत्पन्न आणि बदललेली जीवनशैली या सगळ्याचा परिणाम म्हणून सप्लिमेंट्सची मागणी वाढत गेली.

भारताचे सांस्कृतिक वैविध्य परंपरा, आपल्याकडे आयुर्वेद ग्रंथ असल्यामुळे वनस्पतीजन्य वा वनौषधी न्यूट्रास्युटिकल्स स्थानिक भारतीय ग्राहकांना तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांनादेखील आकर्षित करतात. रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याकडे नागरिकांचा कल आहे. वैयक्तिक औषधोपचार येत्या काळाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे न्यूट्रास्युटिकल्सच्या उत्पादकांना भारतीयांच्या गरजेनुसार नव-नवीन उत्पादनांचे संशोधन करण्यास चांगला वाव आहे.

औषध नियामक, अनुपालक संस्थे कडून मान्यता मिळवून न्यूट्रास्युटिकल्स औषधे सुरक्षिक, परिणामकारक, व्यवस्थित लेबल लावलेली आहेत याची खातरजमा केली जाते. तरी नवनवीन घटक पदार्थ, औषध निर्मिती होत असताना अधिक सूक्ष्म, सर्वसमावेशक औषध नियमन (Regulatory Compliance) करण्याची गरज निर्माण झाली आहे.

औषध नियामक संस्थांनी यांनी येत्या काळात सुधारित मार्गदर्शक सूची आणायला हवी. न्यूट्रास्युटिकल्स औषधांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे की नाही हे तपासण्यासाठी गुणवत्ता मापन यंत्रणा (Quality Assurance) अत्यंत सक्षम व्हायला हवी. ही यंत्रणा नीट नसेल तर सुमार दर्जाची उत्पादने बाजारात येतात आणि ग्राहकांचा विश्वास गमावून बसतात. हे टाळण्यासाठी नवीन घटकांसाठी स्वच्छ मार्गदर्शक सूचना तसेच, प्रत्येक देशागणिक औषध नियामक नियमावली वेगळी असल्याने भारतीय न्यूट्रास्युटिकल्स निर्यात करताना अधिकची साधन सामग्री, नियामक प्राविण्य गरजेचे असते. व्यक्तिगत औषधे यांच्या वाढत्या मागणीमुळे अधिक गुंतागुंत होते. कारण व्यक्तिगत औषधेही व्यक्तीच्या जनुकीय, सूक्ष्मजीव, जीवनशैलीनुसार तयार केलेली असतात. अशा औषधांचे नियामक म्हणून सुरक्षितता, परिणाम देणारी आहेत हे नाही त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. या औषधांचा व्यक्ती नुसार परिणाम बदलू शकतो.

२०२३-२०२४ मध्ये अंदाजे ४ अब्ज ते ६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके मूल्य असलेली भारतीय न्यूट्रास्युटिकल्स बाजारपेठ वेगाने वाढत असून, अंदाजानुसार २०२८-२०३० पर्यंत ती १८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे सध्या सर्वांचा कल असल्याने न्यूट्रास्युटिकल्स त्यात महत्त्वाची भूमिका बजावतील हे नक्की.

भारताच्या न्यूट्रास्युटिकल क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली आहे. ग्राहक उपचारात्मक आरोग्यसेवेकडून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे वळत आहेत आणि पूरक आहारांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करत आहेत. भारताकडे बहु-विध, प्रदीर्घ आयुर्वेदाची परंपरा आहे. त्यातील औषधी ज्ञान वापरून भारत नवनवीन न्यूट्रास्युटिकल्सचे संशोधन, उत्पादन करू शकतो. तसे करण्याची गरज आहे. वैयक्तिक औषधोपचारामध्ये व्यक्तीच्या जनुकीय विदाचा अभ्यास करून त्याप्रमाणे न्यूट्रास्युटिकल्स औषधे तयार केली जातात. येत्या काळात कृत्रिम प्रज्ञेचा वापराने वितरण व्यवस्था सुधारता येईल.

तसेच कृत्रिम प्रज्ञेने ग्राहकाचे आरोग्य, आहार, व्यायाम, झोप इ अभ्यासून त्याप्रमाणे सुयोग्य न्यूट्रास्युटिकल्स सप्लिमेंट्स सुचवून देता येतात. फार्मा कंपन्या असे प्रीबायोटिक्स व प्रोबायोटिक्स तयार करत आहेत, जे प्रत्येक व्यक्तीच्या पचनसंस्थेतील जीवाणूंना विचारात घेऊन तयार केलेले असतील- जी पचन संस्थेचे विकारांसाठी देण्यात येतील. व्यक्तिगत औषधोपचार करायचे म्हणजे प्रचंड प्रमाणात आरोग्य विषयक संवेदनशील विदा लागणार. तो गोळा करणे, संकलन, पृथक्करण, अभ्यास करायचा म्हणजे गोपनीयता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार. यामुळे न्यूट्रास्युटिकल उद्योगावर ग्राहकांची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्याचा वाढता दबाव आहे.

परिणामी ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपीआर (GDPR) सारख्या नियामक चौकटींचे पालन निश्चित करण्यासाठी भक्कम डेटा संरक्षण अत्यावश्यक बनले आहे. वैयक्तिक पोषण हे एक वेगाने विकसित होणारे, अब्जावधी डॉलर्सचे क्षेत्र आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट, सुसंगत जागतिक नियामक चौकटीचा अभाव आहे. यामुळे सुरक्षितता, परिणामकारकता आणि पुराव्यावर आधारित दाव्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण होते. तसेच न्यूट्रास्युटिकल औषध कंपन्यांनी ग्राहक शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची तफावत दूर करायला हवी, तसेच सर्व व्यवहारात पारदर्शकता आणून विश्वास निर्माण करणे बाजारपेठेच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत.)

phadkebhagyashri@gmail.com