डॉ. शारदा महांडुळे भेंडीमध्ये कॅल्शिअम 'अ' व 'क' जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असल्याने हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी, गुडघेदुखी व कंबरदुखी या आजारांमध्ये भेंडी गुणकारी ठरते. नाजूक, लुसलुशीत भेंडीची भाजी ही सर्वांच्याच परिचयाची व आवडती आहे. तिच्या नाजूकपणामुळेच तिला इंग्रजीमध्ये स्त्रीच्या बोटांची उपमा दिली आहे. भेंडीचे रोप हे साधारणतः कमरेइतक्या उंचीचे असून, एकदम ताठ उभे असते. त्याच्या दांडीवर काटेरी लव असते. त्याची पाने एरंडाच्या पानाप्रमाणे मोठ्या आकाराची असतात. या पानांच्या मध्ये फूल येऊन प्रत्येक फुलाला भेंडी लागते. भेंडी म्हणजे त्या रोपाचे फळ होय. पावसाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर साधारणतः जून-जुलै (ज्येष्ठ, आषाढ), तर थंडीत साधारणतः डिसेंबर महिन्यात अशाप्रकारे दोनदा भेंडीची लागवड केली जाते. भेंडीचे मूळ स्थान आफ्रिका आहे. त्यानंतर त्याचे संपूर्ण जगभरात उत्पादन घेतले जाऊ लागले. बोटाच्या आकाराची व लांबीची भेंडी गडद हिरव्या रंगाची असते व तिच्या आतमध्ये पांढऱ्या शुभ्र लहान मोत्यांप्रमाणे बिया असतात. मराठीत 'भेंडी', हिंदीमध्ये 'भिंडी', संस्कृतमध्ये 'भिण्डिका', इंग्रजीमध्ये 'लेडी फिंगर', तर शास्त्रीय भाषेत 'अबेलमोचस एस्कुलेन्थस' (Abelmochus Esculentus) या नावाने भेंडी ओळखली जाते. हेही वाचा >>>आहारवेद: वातविकारांवर प्रभावी मेथी औषधी गुणधर्म : आयुर्वेदानुसार : भेंडी ही वात व कफकारक, आम्लग्राही गुणधर्माची, पौष्टिक, वीर्यवर्धक, रुचिकारक आहे. आधुनिक शास्त्रानुसार : भेंडीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, थायमिन, लोह, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नायसिन, प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, तसेच 'अ' व 'क' जीवनसत्त्व ही सर्व घटकद्रव्ये विपुल प्रमाणात असतात. उपयोग : १) भेंडीमध्ये कॅल्शिअम 'अ' व 'क' जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असल्याने हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी, गुडघेदुखी व कंबरदुखी या आजारांमध्ये रोज सात-आठ कोवळ्या भेंड्या चिरून त्याचा एक लिटर पाण्यात काढा करावा. हा काढा एक ग्लास उरेपर्यंत आटवावा. अनुशापोटी हा काढा घ्यावा. याने हाडांमधील झीज भरून येऊन व श्लेष्मक कफ (दोन सांध्याच्यामधील वंगण ) तयार होऊन सांधेदुखीचा त्रास कमी होतो. २) कोरडा खोकला, सर्दी यामुळे घसा खवखवत असतो. अशा वेळी अर्धा लिटर पाण्यात सात-आठ भेंड्या उकळून काढा करावा व तो काढा प्यावा. याने घशातील कोरडेपणा कमी होऊन खवखव थांबते. तसेच उकळत्या पाण्यात चिरलेली भेंडी टाकून त्यांची वाफ घेतली असता सर्दी कमी होते. ३) भेंडीमध्ये कॅल्शिअम विपुल प्रमाणात असल्यामुळे बालकांची वाढ व स्त्रियांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे भेंडीच्या भाजीचा वापर करावा. हेही वाचा >>>आहारवेद : भाज्यांचा राजा बटाटा ४) वंध्यत्व असणाऱ्या पुरुषांनी शुक्रजंतूंची निर्मिती चांगली होण्यासाठी आहारामध्ये भेंडीची भाजी नियमित खावी. तसेच भेंडीची मुळे सुकवून त्याचे चूर्ण तयार करून ते चूर्ण पाच-दहा ग्रॅम दुधातून घ्यावे. यामुळे शुक्रजंतूंची वाढ चांगली होते. ५) चेहरा काळवंडला असेल व रूक्ष होऊन सुरकुत्या पडल्या असतील, तर चेहऱ्यावर भेंडीची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी लावावी व हलक्या हाताने मसाज करावा. असे केल्याने चेहऱ्याची त्वचा उजळ, कांतियुक्त व मऊ होते. चेहरा गोरा व सतेज दिसतो. ६) पोट, मूत्रमार्ग, जननेंद्रिय यांची जर जळजळ होत असेल, तर दहा ते बारा भेंड्या एक लिटर पाण्यात उकळून त्याचा काढा बनवावा व त्यामध्ये चिमूटभर सैंधव, एक चमचा लिंबाचा रस घालावा. तो काढा दिवसभर थोड्या थोड्या अंतराने घ्यावा. यामुळे शरीराची उष्णता कमी होऊन जळजळ कमी होते. ७) अनेक वेळा स्त्रियांना अंगावरून पांढरे पाणी जाणे (श्वेतप्रदर) या समस्येचा त्रास होतो. अशा वेळी भेंडीमुळाचे चूर्ण एक चमचा, पुष्यानुग चूर्ण एक चमचा मधात कालवून त्याचे सकाळ-संध्याकाळ चाटण करावे. काही दिवसांतच पांढरे पाणी जाणे कमी होते. ८) आहारामध्ये सहसा भेंडी न किडलेली ताजी व कोवळी वापरावी. कोवळ्या भेंडीची सुकी भाजी, सूप बनवावे. तसेच कढीमध्ये भेंडीचे काप घालावेत. सावधानता :भेंडीवर कीड पटकन पडत असल्यामुळे कीड लागू नये म्हणून तिच्यावर कीटकनाशकांचा मारा भरपूर प्रमाणात करतात. अशा वेळी भेंडी शरीराला बाधक ठरू नये म्हणून कोमट पाण्यात तिला दोन व तीन वेळा स्वच्छ धुऊन मगच तिचा आहारात वापर करावा. dr.sharda.mahandule@gmail.com