केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल डिजिटल दरी वाढतेय | only 31 percent of women are having mobile digital divide inequality india report vp-70 | Loksatta

केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

कोविडोत्तर डिजिटल वाढीनंतरही मोबाईल हाती असलेल्या भारतीय महिलांचे प्रमाण हे केवळ ३१ टक्केच आहे. तर हाती मोबाईल असलेल्या पुरूषांची संख्या मात्र ६० टक्क्यांहून अधिक आहे.

केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!
महिलांना मोबाईल द्यायचा की नाही याचा निर्णय भारतीय कुटुंबांमधे पुरूषांकडूनच घेतला जातो…

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोविड महासाथीने जगभरात अनेक बदल घडवून आणले. यातील बहुतांश बदल इंटरनेट आणि डिजिटल गोष्टीसंदर्भातील होते. कोविडपूर्वी प्रत्यक्षात होणारे बरेचसे व्यवहार कोविडोत्तर काळात डिजिटल झाले. त्यासंदर्भातील वेगवेगळे अहवाल आजवर प्रकाशित झाले आहेत. त्यात अनेक शासकीय अहवालांचाही समावेश आहे. डिजिटल व्यवहार आणि वापर वाढला हे खरे असले तरीही वाढलेल्या सहभागात पुरूषांचाच भरणा अधिक आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ऑक्सफॅमच्या अहवालामधे ही बाब पुरती स्पष्ट झाली आहे.

आणखी वाचा : उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

वाढलेल्या डिजिटल व्यवहारांचा शोध ऑक्सफॅमने घेतला तेव्हा असे लक्षात आले की, कोविडोत्तर डिजिटल वाढीनंतरही मोबाईल हाती असलेल्या भारतीय महिलांचे प्रमाण हे केवळ ३१ टक्केच आहे. तर हाती मोबाईल असलेल्या पुरूषांची संख्या मात्र ६० टक्क्यांहून अधिक आहे. “इंडिया इनक्वॅलिटी रिपोर्ट : डिजिटल डिव्हाइड” हा अहवाल ६ डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालामध्ये आणखी दोन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. ३१ टक्के महिलांहाती असलेला मोबाईल ही आकडेवारी अधिक चिंताजनक तेव्हा ठरते; जेव्हा त्या ३१ टक्क्यांमागील वास्तव आपल्यासमोर येते. भारतीय महिलांच्या हाती असलेला मोबाईल हा बहुतांशपणे फीचर फोनच असतो, खास करून ग्रामीण भागात. याचा अर्थ या फीचर फोनचा बराचसा वापर फक्त कॉल करणे वा घेणे तसेच एसएमएस करणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे. मुळात महिलांना मोबाईल द्यायचा की नाही याचा निर्णय भारतीय कुटुंबांमधे पुरूषांकडूनच घेतला जातो, असेही या अहवालासाठी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे.

आणखी वाचा : यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)

शहर आणि ग्रामीण अशा दोन पातळ्यांवर विचार करता शहरांतील महिलांच्या हाती स्मार्टफोन असले तरी ते अॅडव्हान्स नसतात. अॅडव्हान्स स्मार्टफोनचा वापर पुरूषांकडूनच अधिक केला जातो. एवढेच नव्हे तर मोबाईलवर उपलब्ध असलेल्या विविध स्वरूपाच्या सेवा यांच्याहीबाबतीत या सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत फारच कमी डिजिटल सेवा वापरण्याचे अधिकार महिलांना आहेत. यासंदर्भात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशननेदेखील एक सर्वेक्षण केले होते. त्याचा आधार घेत ऑक्सफॅम रिपोर्टने असे म्हटले आहे, की इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये एक तृतीयांश महिला आहेत आणि पलीकडच्या बाजूस भारतात महिला आणि पुरूष यांच्यातील डिजिटल दरी अधिकाधिक वाढते आहे. याशिवाय हा अहवाल तयार करताना सेंटर फॉर मॉनिटरी इंडियन इकॉनॉमी ( सीएमआयइ) आणि भारत सरकारचा नॅशनल सॅम्पल सर्व्हे (एनएसएस) या दोन्हींमधील माहिती वापरून भारतातील डिजिटल दरीला आर्थिक, धार्मिक, जातीय आणि शैक्षणिक असेही विविध कोन असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा : प्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…

भारतातील डिजिटल वापरकर्त्यांची संख्या ही ५७ टक्क्यांच्या आसपास आहे. ग्रामीण भागात डिजिटल वापरकर्ते सरासरी ३४ टक्क्यांच्या आसपास आहेत तर शहरांत हे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे. कोविड महासाथीपूर्वी डिजिटल सेवा वापरकर्त्यांची संख्या शहरातदेखील तुलनेने तशी कमी होती. मात्र स्पर्शामधूनही लागण होण्याची शक्यता असलेल्या कोविडने डिजिटल सेवा अनिवार्य केल्या. लोकांच्या मनातील भीती आणि अनिवार्यता यामुळे कोविड काळात डिजिटलसेवांचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर झाला. भारताच्या ग्रामीण भागांमधे तर डिजिटल सेवा दुपटीहून अधिक संख्येने वाढल्या. त्यामुळे अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले होते, की भारतामध्ये डिजिटल माध्यमे आणि सेवा वापरणाऱ्यांची संख्या आता ७५ टक्क्यांहून अधिक असावी. मात्र या समजाला हे सर्वेक्षण छेद देते. त्यातही लक्षात आलेला डिजिटल दरीचा मुद्दा हा अधिक चिंताजनक वाटावा असा आहे. शहरांमध्ये महिलांच्या हाती अधिक चांगल्या प्रतीचे अॅडव्हान्स स्मार्ट फोन दिसत असले तरी त्यातील अनेकींच्याबाबतीत त्या निर्णयामागे पुरूषच असतो, हा मुद्दादेखील विचार करायला लावणारा आहे.

(शब्दांकन : साक्षी सावे)

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:29 IST
Next Story
मेनिक्युअर-पेडिक्युअर करताय?… नखांसाठी लक्षात घ्या या टिप्स