आदरणीय अब्दुल सत्तार,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर तुम्हाला आदरणीय म्हणावं की नाही, हाच आता प्रश्न पडला आहे. पण असो, आमची बुद्धी आणि डोकं अजूनही ठिकाणावर आहे. प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं, मग ती महिला असो किंवा पुरुष आमच्या तत्वात हे अजूनही बसतं. फक्त मला एकच सांगा कॅमेऱ्यासमोर एका महिलेला शिवीगाळ करणं, तुमच्या तत्त्वात बसतं का? एका राजकीय नेत्याला आणि त्याहूनही राज्याचे कृषिमंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीला असली वक्तव्य करणं शोभतं का?

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. “तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केली. त्यावर त्या म्हणाल्या की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात. या संदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारताच तुमची जीभ घसरली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ”, असं तुम्ही म्हणालात. हे वक्तव्य करताना, माध्यमांसमोर एका महिलेला शिवीगाळ करताना पदाचं, परिस्थितीचं, कशाचंच गांभीर्य तुमच्यात दिसलं नाही. अनेकदा तोंडात आलं म्हणून टीका केली असं राजकारण्यांच्या बाबतीत घडताना दिसतं, अगदी तसंच घडलं आणि तुम्ही अगदी खालचीच पातळी गाठलीत.

सुप्रिया सुळे खासदार आहेत, समाजातील जनतेचं, महिलांचं प्रतिनिधित्व करतात म्हणून हे पत्र लिहीत नाहीये. त्या खासदार असल्या तरी सर्वप्रथम महिलाच आहेत. तुम्ही त्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे तुमची विचारसरणी, महिलांबद्दलचा आदर, तुमची संकुचित वृत्ती हे सारं तुम्हीच जनतेसमोर खुलं करुन ठेवलं आहे. एका खासदार महिलेला तुम्ही ‘ऑन कॅमेरा’ शिवीगाळ करत असाल, तर सामान्य महिला तुमच्यासाठी नगण्यच असतील नाही का? तुम्हालाही दोन मुली आहेत. त्यांना उद्देशूनही तुम्ही अशीच भाषा वापरता का? तुमच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, हाही विचार नक्की करा.

आणखी वाचा >> किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?

तुम्ही एक लोकप्रतिनीधी आहात. राज्याचे कृषिमंत्रीपद भूषवत आहात. जे खातं तुम्ही सांभाळता तो शेतकरी जिला आई मानतो ती धरती सुद्धा स्त्रीच आहे, हे फक्त तुम्हाला आठवण करुन देण्यासाठी सांगतेय. एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असताना आपण काय वक्तव्य करत आहोत, याचा विचार तुम्ही करत नाही का? की ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, अशी परिस्थिती आहे तुमची? काही दिवसांपूर्वी किरण पावसकरांनीही अंधेरी पोटनिवडणूकीदरम्यान ‘बायकी धंदे’ करत नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. महिलेला शिवागाळ करण्यात, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करण्यात कसला पुरुषार्थ वाटतो तुम्हाला? तुम्ही समाजाचे नेतृत्व करता. तुमच्या वक्तव्याकडे समाज गांभीर्याने पाहतो. तुमचं अनुकरण केलं जातं. आजच्या समाजापुढे, तरुण पिढीपुढे तुम्ही राजकारणी असेच आदर्श ठेवणार का?

हेही वाचा >> “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

स्वत:च्या पायावर उभे असताना, प्रत्येक क्षेत्रात यशाची नवनवीन शिखरं गाठत असताना महिलांबद्दल अशी वक्तव्य म्हणजे पुरुषप्रधान समाजाचा आरसाच आहे हा. सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्यानंतर माफी मागण्यास सांगितल्यानंतर तुम्ही महिलेला उद्देशून वक्तव्य केलं नाही, असं म्हणालात. मला एक सांगा सुप्रिया सुळे महिला नाहीत का? महिलांचा आदर करणाऱ्या नेत्याच्या यादीमध्ये सुप्रिया सुळे नाहीत का? चुकीचे शब्द निघाल्यानंतरही आपल्याच वक्तव्याचं समर्थन करण्यात धन्यता मानताय तुम्ही. जाता जाता एकच सांगेन, पुढच्या वेळी वक्तव्य करताना सद्सद विवेकबुद्धी शाबूत ठेवा. आगामी काळात किमान महिलांबद्दल तरी अशी वक्तव्य तुम्ही टाळाल, हीच अपेक्षा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open letter to abdul sattar for abusing comments on supriya sule in front of camera kak
First published on: 07-11-2022 at 17:27 IST