प्रिय सोनाली,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी तुझे चित्रपट पाहत मोठी झाले आहे, मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्तम काम करून तू तुझ्या अभिनयाचा ठसा उमटवलास. संवेदनशील आणि सर्वांगी विचार करून बोलणारी अशी तुझी ओळख. पण काल अचानक तू सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागलीस. नेमका विषय काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर एका कार्यक्रमातील तुझ्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडीओत तू भारतातल्या बऱ्याच मुली आळशी आहेस, असं म्हणाली. शिवाय त्यांना गाडी, बंगला, चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी असलेला मुलगा नवरा किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा असतो, असंही तू म्हणालीस. तुझी ती व्हायरल क्लिप पाहिली आणि मग तुला पत्र लिहायचं मी ठरवलं.

“मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?” लग्नासाठी अवाजवी अटी ठेवणाऱ्या मुलींना सोनाली कुलकर्णीने सुनावलं; म्हणाली, “ऐशोआराम पाहिजे तर…”

सोनाली, तू भारतातल्या मुली आळशी आहेत, असं म्हणून सरसकटीकरण कसं केलंस गं? तुझ्या मते भारतीय मुलींना श्रीमंत नवरा हवा असतो, पण त्यांना मात्र कोणतंही काम किंवा नोकरी करायची नसते. तू किती अशा मुली, बायका पाहिल्यात? म्हणजे काही पुरावा किंवा आकडेवारी आहे का ? की असंच बोलून मोकळी झालीस? तू उल्लेख केलास, तशा मुली नक्कीच असतील, पण त्यांचं प्रमाण तुला वाटतंय त्यापेक्षा तरी नक्कीच कमी आहे. कारण तू ज्या मुलींबद्दल बोलतेयस ना, त्या फार संख्येने नाही पाहिलेल्या मी अजून आजूबाजूला.

“भारतातील मुली आळशी आहेत” म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “नोकरी करणाऱ्या स्त्रिया…”

तू तुझ्या परिघातून बाहेर आलीस ना, तर कदाचित तुला वास्तविकता कळेल, याच महाराष्ट्रात खूप कष्टकरी मुली आहेत, ज्या जबाबदारी सांभाळण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी जिवाचं रान करतात, मेहनत घेतात. तू पाहिलं नसेल कदाचित पण अनेक क्षेत्रात मुली अगदी नाइट शिफ्टही करतात. चांगलं सुरक्षित वातावरण नसतं तरी त्या जबाबदारी पार पाडतात, घर आणि नोकरी उत्तम सांभाळतात. अशा या मुलींचा आणि महिलांचा तू आळशी म्हणून अपमान केलायस त्यांचा. खरं तर तू देखील लग्न, संसार, मुलगी सगळं सांभाळून करिअर केलंस, त्यामुळे तू सरसकटीकरण करून मुलींना आळशी म्हणण्यापेक्षा त्यांना चांगला सल्ला नक्कीच देऊ शकली असतीस. मुली, स्त्रिया घरात असतात, काम करत नाहीत, कमावत नाहीत, याचा अर्थ त्या फक्त बसून खातात असं नाही. स्वतः गृहीणी असल्याने तुला त्या जबाबदाऱ्यांची जाणीव नक्कीच असेल. जर, तू इतकी यशस्वी अभिनेत्री असून तुला त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तर मग सर्वसामान्य महिलांबद्दल मी तुला सांगण्याची गरज नाही.

Video: “भारतातल्या मुली आळशी” मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “त्यांना असा नवरा हवा जो…”

सर्वात महत्त्वाचं काय तर आपण पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत वाढतो, त्यामुळे मुलांनी पैसा कमवायचा आणि मुलींनी घर सांभाळायचं असे संस्कार आजही बहुतांशी कुटुंबात केले जातात, त्याचा अर्थ मुली आळशी आणि मुलं जबाबदाऱ्या घेतात असं नाही. अशा अनेक मुली मी माझ्या सभोवताली पाहिल्यात, ज्यांचे भाऊ त्यांच्या पालकांना सांभाळत नाहीत, पण त्या सांभाळतात. त्यामुळे तुझ्या सभोवताली दिसलेल्या बोटावर मोजण्याइतक्या उदाहरणांवरून तुला कष्टकरी असंख्य मुलींचा अपमान करणं नक्कीच शोभत नाही, अगं! त्यामुळे विनंती एकच की सरसकट विधान करू नकोस, कारण तसं करून तू मोठ्या संख्येने कष्ट-मेहनत घेणाऱ्या आपल्याच बहिणींना दुखावतेयस!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open letter to actress sonali kulkarni over her remarks indian girls are lazy money minded hrc
First published on: 18-03-2023 at 12:03 IST