भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा ही सार्वजनिक आरोग्याची मोठी समस्या पन्नाशीच्या आसपासच्या अर्ध्याहून अधिक महिलांना भेडसावते. वयोवृद्धांच्या लोकसंख्येत वाढ होत असताना, अशा वयोवृद्ध व्यक्तींच्या हाडांची काळजी घेऊन झीज, ठिसूळ होऊ नये म्हणून, हाड मोडणे टाळले तर येणाऱ्या खर्चाचा ताण आपल्या स्वतःच्या तसेच मोठ्या प्रमाणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत असतो तो कमी करायला आपण हातभार लावू शकतो.

हाडांमध्ये घनता वाढवणे आणि फ्रॅक्चर कमी करण्यासाठी आपल्याला विविध उपचारांची गरज भासते. अस्थिरोगतज्ज्ञाची मदत घेऊन त्यावर अत्याधुनिक उपचार घेणे शक्य आहे. गरज आहे ती योग्य मात्रा, नियमितपणे आणि सुरक्षितपणे घेण्याची.

ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय

वय वाढत जातं तसं हाडांमधले कॅल्शियममध्ये झीज व्हायला सुरुवात होते. हाडांचे प्रमाण कमी होणे, हाडांच्या रचनेमध्ये उतींचे प्रमाण घटायला सुरुवात होणे… याचा परिणाम म्हणून हाडांची खनिज घनता कमी होते आणि हाड ठिसूळ झाल्याने मोडून फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. डेक्सा (Dual-energy x-ray absorptiometry) ही चाचणी हाडांची घनता तपासण्यासाठी केली जाते. डेक्सा ही चाचणी मांड्याची हाडे, कंबरेची, नितंबाची हाडे, मणका, मनगटाची केली जाते. रुग्णाच्या हाडांची खनिज घनता किती आहे त्याप्रमाणे गुणांकन दिले जाते.

हाडांची खनिज घनता म्हणजे काय

हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) म्हणजे हाडांच्या ऊतींमधील (Bone Tissue) कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजांचे प्रमाण असते. ही खनिजे किती प्रमाणात आहेत त्यावरून हाडांची ताकद आणि मजबुती लक्षात येते. घनता जितकी जास्त तितकी हाडे मजबूत आणि फ्रॅक्चरला आळा बसतो.

हाडांची पुनर्रचना (बोन रिमॉडेलिंग) म्हणजे काय

आपला हाडांचा सांगाडा सतत कार्य करत राहणारा, एक अत्यावश्यक अवयव आहे. हाडांची दुरुस्ती, नव-निर्मिती, खनिजे रक्तात पाठवणे तिथे आयुष्यभर चालू असते. या सर्व प्रक्रियेला हाडांची पुनर्रचना (Bone Remodelling) म्हणतात.

हाडांचा ठिसूळपणा कशामुळे वाढतो

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन संप्रेरक कमी झाल्याने महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण वाढते. हाडांच्या पुनर्रचना चक्रात दोन भिन्न टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे हाडांचे विघटन आणि शरीरातून काढून टाकले जाणे (bone resorption) आणि दुसरा टप्पा म्हणजे नवीन हाडाची निर्मिती होणे (bone formation). नवीन हाडांची निर्मिती होणे आणि विघटन (अस्थिक्षय) होणे यामध्ये वय वाढत जाते तसा असमतोल निर्माण होतो. त्यात अस्थिक्षय अधिक प्रमाणात होऊ लागतो, त्यामुळे अस्थि कमकुवत व ठिसूळ होतात. अस्थिक्षय होण्यामागचे अजून एक कारण म्हणजे शरीरात रक्तात कॅल्शियमची कमतरता असणे. आहारात जर कॅल्शियमची मात्रा कमी पडली तर शरीर हाडांतून कॅल्शियम मिळवते.

ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हाडांचे विघटन होत असताना, हाडांच्या पृष्ठभागावर ऑस्टिओक्लास्ट नावाच्या विशेष पेशी अस्थि ऊतींचे विघटन करतात आणि खनिजे (कॅल्शियम) रक्तात सोडतात. अस्थि पुनर्रचनेचा हा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये जुनी किंवा खराब झालेली हाडे सतत काढून टाकली जातात आणि त्या जागी नवीन ऊती तयार केल्या जातात. यात वयपरत्वे अतिरिक्त अस्थिक्षयामुळे अस्थींची घनता कमी होते, ऑस्टिओपोरोसिस होतो आणि अस्थींचा ऱ्हास होतो. त्यामुळे हाडांमध्ये लहान खड्डे पडतात. हाडांची निर्मिती करणाऱ्या दुसऱ्या पेशी असतात ‘ऑस्टिओब्लास्ट’. या ऑस्टिओब्लास्ट पेशी हाडांना पडलेले खड्डे बुजवतात आणि नवीन हाडाची निर्मिती करतात. सर्व साधारण शरीरातील हाडांमध्ये अस्थिंचे विघटन (अस्थिक्षय) आणि अस्थी-निर्मिती दोन्ही हातात हात घालून काम करतात.

ऑस्टिओपोरोसिसची कारणे

वयानुरूप होणारे बदल, संप्रेरकांमुळे होणारे बदल, जनुकीय घटक, आहार, जीवनशैली जसे की, धूम्रपान, शारीरिक हालचाली कमी करणे, अपस्मारावर देण्यात येणारी औषधे, इतर औषधे, थायरॉइड, मूत्रपिंडाचे आजार.

लक्षणे :

ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) ला अनेकदा ‘मूक रोग’ म्हटले जाते, कारण हाड मोडण्यापूर्वी याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, तरीसुद्धा अचानक हाड मोडणे, तीव्र पाठदुखी, उंची कमी होणे, पाठीला बाक येणे इत्यादी लक्षणे असतात.

उपचार :

अँटीरेझोर्प्टिव्ह औषधे

बिस्फोस्फोनेट्स

ही औषधे ऑस्टियोपोरोसिसच्या उपचारांच्या अँटीरेझोर्प्टिव्ह प्रकारात मोडतात, हाडांचे तसेच हाडांची पुनर्रचना चक्राचे विघटन कमी करण्याचे काम करतात, त्यामुळे हाडांची घनता वाढते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

अलेन्ड्रोनेट : रजोनिवृत्तीनंतरच्या काळात महिलांमध्ये आणि पुरुषांमधील ग्लुकोकॉर्टिकॉइडमुळे होणारे ऑस्टिओपोरोसिससाठी वापरले जाते, आठवड्यातून एकदा घेतले जाते.

रायसेड्रोनेट : आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा गोळी, पाठीचा कणा, नितंब आणि मणक्याव्यतिरिक्त इतर हाडांचे फ्रॅक्चर कमी करण्यास मदत करते.

सेवन पद्धती : तोंडाने बिस्फोस्फोनेट (अलेन्ड्रोनेट, रायसेड्रोनेट, इबँड्रोनेट) घेण्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सकाळी, जेवणाच्या ३०-६० मिनिटे आधी, एका पूर्ण ग्लास पाण्यासोबत घ्यावे आणि सरळ उभे राहावे. कारण ही औषधे अन्ननलिकेत जळजळ, सूज किंवा व्रण निर्माण करू शकतात. उभे राहिल्यामुळे गोळी लवकर पोटात जाते आणि अन्ननलिकेत अडकून राहत नाही. औषध घेतल्यावर झोपल्यास, पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येऊ शकते, ज्यामुळे गंभीर जळजळ होऊ शकते.

रोमोसोझुमॅब (एक शक्तिशाली हाडे तयार करणारा स्क्लेरोस्टिन इनहिबिटर) :

हे औषध एकाच वेळी दोन प्रकारे काम करते – नवीन हाड तयार करते आणि जुने हाड झिजण्यापासून अटकाव करते. शरीरात ‘स्क्लेरोस्टिन’ (Sclerostin) नावाचे एक प्रथिन असते, जे हाडे तयार होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लावते (कमी करते). रोमोसोझुमॅब या स्क्लेरोस्टिनला शरीरात काम करण्यापासून अटकाव करते. हाडे बनवण्यासोबतच, हे औषध हाडांची झीज करणाऱ्या पेशींचे कार्य कमी करते.

ॲनाबॉलिक औषधे (हाडे मजबूत करणारे) हाडांची निर्मिती करण्यास मदत करतात

आधी पॅराथायरॉईड संप्रेरक कसे काम करते ते समजून घेऊ. पॅराथायरॉईड संप्रेरक शरीरातील कॅल्शियमची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

टेरीपॅराटाईड

टेरीपॅराटाईड हे औषध पॅराथायरॉईड संप्रेरकाची नक्कल करते. ते नवीन अस्थि बनवणाऱ्या पेशींना उत्तेजित, कार्यान्वित करते आणि नवीन हाडांच्या निर्मितीस सुरुवात करते. हे या औषधाचे वेगळेपण आहे. (इतर ऑस्टिओपोरोसिसच्या औषधांच्या तुलनेत). मूत्रपिंडाला सूचना देते की मूत्रावाटे कॅल्शियम पुन्हा शोषून घ्यावे आणि कॅल्शियम पुन्हा शोषून घेण्याचे प्रमाण वाढवते तसेच आतड्यांमधून कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढवते.

ऑस्टिओपोरोसिस मध्ये रुग्णाला पॅराथायरॉईड संप्रेरक दिल्याने हाडे तयार करणाऱ्या पेशींचे प्रमाण वाढते. आणि हाडे खरवडून काढणाऱ्या (क्षय) पेशींचे कार्य कमी होते. टेरीपॅराटाईड हे ऑस्टिओपोरोसिसच्या उपचारासाठी असे औषध आहे जे शरीरातून कॅल्शियम शोषून हाडांच्या निर्मितीला आणि वाढीला चालना देते. हाडांमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे जमा करून त्यांना टणक बनवते.

दुष्परिणाम

सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना होणे, पोट खराब होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, विशेषतः इंजेक्शन घेतल्यानंतर काही वेळ चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे, इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना, सूज, लालसरपणा किंवा खाज सुटणे.

पुढच्या लेखात ऑस्टिओपोरोसिसची औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी याचे सविस्तर विवेचन करू.

(लेखिका औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत)

भाग्यश्री फडके-धर्माधिकारी / phadkebhagyashri@gmail.com