Who is Nithya Sre Sivan : भारताची बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिनं पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स २०२४ मध्ये कास्यपदक जिंकलं आहे. महिलांच्या सिंगल SH6 इव्हेंटमध्ये नित्यानं इंडोनेशियाच्या रिना मार्लिना हिचा पराभव केला. विशेष म्हणजे रिनानं २०२२ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. भारताच्या शेवटच्या बॅडमिंटन सामन्यात नित्या श्री सिवनने महिला एकेरीच्या SH6 तिसऱ्या क्रमांकाच्या प्लेऑफ सामन्यात कास्यपदक जिंकलं, जो भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. १९ वर्षीय नित्यानं इंडोनेशियाच्या रिना मार्लिनाचा २१-१४, २१-६ असा सहज पराभव करून या गेम्समध्ये आपल्या पहिल्याच उपस्थितीत नित्या श्री सिवननं विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विशेष म्हणजे तिनं हा सामना जिंकण्यासाठी फक्त २३ मिनिटांचा वेळ घेतला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नित्या श्री सिवन हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि तिनं ती सार्थ ठरवली आहे.

नित्याचा प्रवासबॅडमिंटन वाया क्रिकेट

नित्या ही तमिलनाडूमधील होसूरची आहे. नित्यानं बॅडमिंटन व्हाया क्रिकेट, असा प्रवास केला होता. सुरुवातीला क्रिकेट हा तिचा आवडता खेळ होता. २०१६ मध्ये रिओ पॅरालिम्पिकनंतर तिनं बॅडमिंटनला फॉलो करायला सुरुवात केली. २०२० मध्ये लॉकडाउनपर्यंत नित्याची पॅरा-बॅडमिंटनशी ओळखही नव्हती. मात्र, नित्याच्या वडिलांनी तिला तमिळनाडू पॅरा-बॅडमिंटन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश घ्यायला सांगितला. जिथे तिनं भाग घेतला आणि तिचं कौशल्य दाखवून दिलं. तिच्या वडिलांचे सहकारी राज्यस्तरीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी, तसेच तिच्या प्रशिक्षकांनी नित्याला प्रोत्साहन दिलं आणि आता तिनं तिची कामगिरी जगालाही दाखवून दिली.

नित्याची आतापर्यंतची कामगिरी

आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – WS मध्ये कास्यपदक
आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – XD मध्ये कास्यपदक
आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – WD मध्ये कास्यपदक
जागतिक अजिंक्यपद (२०२४) – WS मध्ये कास्यपदक
जागतिक अजिंक्यपद (२०२२) – WS मध्ये कास्यपदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२२) – WD मध्ये कास्यपदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२२) – XD मध्ये कास्यपदक

४ नेशन्स पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल (२०२४)- WS मध्ये सुवर्णपदक आणि XD मध्ये रौप्यपदक
स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय २०२४- I (२०२४)- WS मध्ये सुवर्णपदक आणि XD मध्ये कास्यपदक

हेही वाचा >> कोण आहे प्रीती पाल जिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रचला नवा इतिहास? कसा होता तिचा इथपर्यंतचा प्रवास? घ्या जाणून

दुसरीकडे बॅडमिंटनपटू मनदीप कौरचा पॅरालिम्पिक २०२४ मधील प्रवास संपला आहे. नायजेरियाच्या मरियम बोलाजीनं तिचा २१-८, २१-९ असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर पलक कोहलीलाही बॅडमिंटनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला इंडोनेशियाच्या खेळाडूनं २१-१९, २१-१५ असं पराभूत केलं.