डॉ. राधिका प्रशांत हेडाऊ

आजकाल आपल्या घरोघरी एक चित्र सर्रास पाहायला मिळते, १५-१६ वर्षांची मुलगी आरशासमोर उभी राहून चेहऱ्यावरील मुरुमांमुळे (Acne) किंवा वाढत्या वजनामुळे चिंतेत असते. मासिक पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर बारीक केस येऊ लागतात आणि घरचे ‘वयात येताना असं होतंच’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हा केवळ नैसर्गिक बदल नसून, ‘PCOS’नावाचा एक वाढता जीवनशैलीविषयक विकार असू शकतो, ज्याकडे पालकांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

PCOS कडून PMOS कडे : एक वैचारिक क्रांती द लॅन्सेट (मे २०२६) मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात जागतिक सहमतीने वैद्यकीय समुदायाने ‘PCOS’ हे जुनं नाव अधिकृतपणे बदलून आता 

‘PMOS’ (Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome) असा नवा शब्द स्वीकारला आहे. हा केवळ नावातील बदल नसून, या स्थितीकडे पाहण्याचा एक मूलभूत दृष्टीकोन आहे. आता हा केवळ एक प्रजनन (reproductive) विकार नसून, एक व्यापक मेटाबॉलिक (चयापचय) आणि एंडोक्राइन (संप्रेरक) आजार असल्याचे मान्य करण्यात आले आहे. 

ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रजनन वयातील जवळपास प्रत्येक ५ पैकी १ महिला, म्हणजेच २०% महिला या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे, ही समस्या आता सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर बाब बनली आहे. हा केवळ एक स्त्रीरोगविषयक आजार (Disease) नसून, शरीरातील संप्रेरकांचे (Hormones) असंतुलन आणि चयापचय (Metabolism) क्रियेचा बिघाड दर्शवणारा हा एक गुंतागुंतीचा सिंड्रोम आहे. 

शरीरातील इन्सुलिनचा बिघडलेला वापर (Insulin Resistance) आणि अँड्रोजन या हार्मोनचे वाढते प्रमाण हे याचे मूळ कारण आहे. म्हणूनच, आता आपण या स्थितीकडे केवळ ओव्हरीचा आजार म्हणून न पाहता, संपूर्ण चयापचय प्रक्रियेचा भाग (Metabolic Disorder) म्हणून पाहणे गरजेचे आहे.

मुलींमधील लक्षणे कशी ओळखावी?

पालकांनो, जर तुमच्या मुलीमध्ये खालील बदल दिसत असतील तर वेळीच दक्ष व्हा :

मासिक पाळी खूप उशिरा येणे किंवा महिना-दोन महिने न येणे.

चेहऱ्यावर, हनुवटीवर किंवा छातीवर अनावश्यक जाड केस येथे (Hirsutism).

पाठीवर आणि चेहऱ्यावर उपचारानेही बरे न होणारे तीव्र मुरुम येणे.

मान किंवा काखेतली त्वचा अचानक जाड आणि काळी पडणे (Acanthosis Nigricans).

अशावेळी काळजी घ्या, पण गैरसमजांना बळी पडू नका!

हा विकार केवळ लठ्ठ मुलींनाच होतो असे नाही, अगदी बारीक आणि सडपातळ मुलींमध्येही अंतर्गत हार्मोन्सच्या बिघाडामुळे हा त्रास असू शकतो. वयात आल्यानंतर सुरुवातीची २ वर्षे प्रजोत्पादन प्रणाली (HPO Axis) विकसित होत असते, त्यामुळे प्रत्येक अनियमित पाळी म्हणजे ‘PMOS’ नव्हे. किमान २ वर्षांनीच याचे अचूक निदान करता येते.

किशोरवयीन मुलींमध्ये अंडाशयाचा आकार अनेकदा सामान्य दिसू शकतो. ‘द पीसीओएस सोसायटी, इंडिया’च्या मते, किशोरवयीन मुलींमध्ये केवळ सोनोग्राफीवरून निदान करणे घाईचे ठरू शकते. त्याऐवजी बाह्य क्लिनिकल लक्षणे आणि चयापचय क्रियेतील बदल यावरच निदानाची मुख्य पायरी आधारलेली असावी.

कुटुंबात कोणालाही हा त्रास नसला, तरी आजकालचा ताणतणाव, अपुरी झोप आणि प्लास्टिक किंवा पॅकबंद अन्नाच्या अतिवापरामुळे हा त्रास होऊ शकतो. भविष्यातील धोके (Long-term Risks) : दुर्लक्ष केल्यास भविष्यात (वयाच्या ३०-४० व्या वर्षी) टाईप-२ मधुमेह, हृदयविकार, वंध्यत्व (Infertility) आणि तीव्र मानसिक नैराश्य येण्याचा धोका दुप्पट होतो. परंतु योग्य वेळी जीवनशैली सुधारल्यास हा विकार पूर्णपणे उलटवता (Reverse) येतो.

‘PCOS’ टाळण्यासाठी आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे :

१. आहाराचे सुवर्णनियम (Nutritional Guidelines) :

लो-ग्लायसेमिक इंडेक्स आहार : मैदा, पांढरी साखर, बेकरी प्रॉडक्ट्स, पिझ्झा-बर्गर, पाकीटबंद पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स पूर्णपणे बंद करा.

सकस अन्न : मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा आणि फायबरयुक्त तृणधान्ये (ज्वारी, बाजरी, नाचणी) यांचा रोजच्या जेवणात समावेश करा. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.

२. शारीरिक सक्रियता आणि पुरेशी झोप :

मुलींना दररोज किमान ४५ ते ६० मिनिटे घाम गाळणारा व्यायाम (जसे की वेगाने चालणे, धावणे, सायकलिंग किंवा एरोबिक्स) करणे बंधनकारक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रीन पाहणे बंद करून, कमीत कमी ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला

PCOS हा औषधांपेक्षा तुमच्या सवयी बदलून पूर्णपणे नियंत्रित आणि पूर्ववत करता येणारा विकार आहे. पहिल्या टप्प्यात औषधे दिली जात नाहीत. केवळ ५ ते १०% वजन कमी केल्यास आणि जीवनशैली सुधारल्यास शरीरातील हार्मोन्स स्वतःहून संतुलित होतात. अत्यंत गंभीर लक्षणे असतील तरच डॉक्टर काही काळासाठी हार्मोन्स संतुलित करणारी औषधे देतात.

थोडक्यात काय तर… PCOS ला घाबरण्याची अजिबात गरज नाही. पालकांनो, आपल्या घरातील किशोरवयीन मुलींशी मोकळेपणाने संवाद साधा, त्यांना वेळेवर निरोगी जीवनशैलीची भेट द्या!

(लेखिका पोषणतज्ज्ञ व सिंबायोसिस स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स अँड न्यूट्रिशनल सायन्सेस येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

radhikaphedaoo@gmail.com