डॉ. अपर्णा गोविल भास्कर, डॉ. संदीप तलवार
पूर्वी पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा आजार केवळ अंडाशयांशी संबंधित समस्या मानला जात होता. मात्र आता वैद्यकीय क्षेत्रात या आजाराकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यामुळे या स्थितीला आता ‘पीएमओएस’ (Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome) असे नवे नाव दिले जात आहे.

हे नवे नाव केवळ अंडाशयांपुरते मर्यादित नसून हार्मोन्स, वजन, इन्सुलिन, चयापचय प्रक्रिया आणि मानसिक आरोग्य यांच्याशीही या आजाराचा संबंध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे महिलांनी या समस्येकडे केवळ पाळी किंवा गर्भधारणेच्या अडचणी म्हणून न पाहता संपूर्ण आरोग्याशी जोडून पाहणे आवश्यक झाले आहे.

फक्त पाळीची समस्या नाही पूर्वी पीसीओएस म्हटले की अनियमित मासिक पाळी, अंडाशयातील सिस्ट, मुरुम किंवा गर्भधारणेत अडथळे एवढाच विचार केला जात होता. पण तज्ज्ञांच्या मते हा आजार शरीरातील अनेक बदलांना कारणीभूत ठरू शकतो.

यामध्ये वजन वाढणे, विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, त्वचा व केसांच्या समस्या, थकवा, मानसिक ताण आणि भविष्यात हृदयविकाराचा धोका यांचा समावेश होतो.पीएमओएसमध्ये वाढलेले वजन आणि इन्सुलिन रेझिस्टन्स या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी हार्मोन्सचे संतुलन बिघडवते आणि त्याचा परिणाम मासिक पाळी, स्त्रीबीज निर्मिती आणि गर्भधारणेवर होतो.

जीवनशैलीत बदल अत्यावश्यक

पीएमओएसच्या उपचारासाठी केवळ औषधे पुरेशी नसतात. महिलांनी झोप, आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य याकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि पुरेशी झोप यामुळे हार्मोन्सचे संतुलन सुधारण्यास मदत होते. ताणतणाव कमी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही गंभीर प्रकरणांमध्ये वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचाही पर्याय उपयोगी ठरू शकतो.

वंध्यत्वाशीही संबंध अनेक महिला अनियमित पाळी, चेहऱ्यावर मुरुम, वजन वाढणे किंवा गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही लक्षणे पीएमओएसची असू शकतात. वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतल्यास अनेक महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होऊ शकते. काहींना आययूआय (IUI) किंवा आयव्हीएफ (IVF) उपचारांची गरज लागू शकते.

जागरूकता हीच पहिली पायरी पीसीओएस ते पीएमओएस हा बदल केवळ नावापुरता नाही, तर महिलांच्या आरोग्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील मोठा बदल आहे. हा आजार वेळीच ओळखून योग्य जीवनशैली आणि उपचार स्वीकारल्यास भविष्यातील अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.म्हणूनच महिलांनी शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.