डॉ. मधुरा कुलकर्णी
देवालयातला प्रवेश असो, धाडसी वाटणाऱ्या सॅनिटरी पॅडच्या जाहिराती असोत किंवा सोशल मीडियावर चालणाऱ्या ‘period positivity’ च्या चर्चा असोत- मासिक पाळी आज बहुचर्चित आहे, पण तरीही पूर्णपणे समजलेली नाही. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने काम करणाऱ्या अत्याधुनिक तरुणीही घरात पूजा आहे म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात, हे पाहिलं की जाणवतं की, विज्ञान पुढे गेलं असलं तरी मनातील शंका, गैरसमज, शुचिता-अशुचितेच्या कल्पना अजूनही खूप प्रमाणात तशाच आहेत!

“मासिकपाळीबद्दल इतक्या हळू आवाजात का बोलता?” ती काही लपवण्यासारखी गोष्ट नाही… तर स्त्रीशरीराच्या सृजनशक्तीची मासिक साक्ष आहे! दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात, मनात, भावविश्वात आणि ऊर्जेत घडणारा एक जैविक, मानसिक, भावनिक आणि काही अंशी आध्यात्मिक प्रवास! आज जगभर “menstrual hygiene” विषयी बोललं जातं. पण स्वच्छता म्हणजे नेमकं काय? फक्त पॅड बदलणं? बाह्य स्वच्छता? की त्यापलीकडेही काही आहे? मासिक पाळी म्हणजे केवळ रक्तस्राव नाही. मी स्त्रीशरीराच्या आरोग्याची भाषा आहे. मी तिच्या अंतःस्रावी ग्रंथींचा आरसा आहे. मी तिच्या मानसिक स्थितीची चाहूल आहे. आणि अनेकदा तिच्या जीवनशैलीचा आराखडाही आहे. म्हणूनच मासिकपाळीविषयी बोलताना केवळ ‘त्या चार दिवसां’पुरतं न पाहता, स्त्रीच्या संपूर्ण अस्तित्वाकडे पाहणं आवश्यक ठरतं.

मासिक पाळी नेमकी काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचं तर, स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला गर्भधारणेसाठी तयारी होत असते. अंडाशयातून बीज तयार होतं. गर्भाशयाच्या आतील थराची वाढ होते. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर शरीरातून बाहेर टाकला जातो. त्यालाच मासिक पाळी म्हणतात. पण ही प्रक्रिया फक्त गर्भाशयापुरती मर्यादित नसते. मेंदूमधील पिट्यूटरी ग्रंथी, अंडाशय, थायरॉईड, अधिवृक्क ग्रंथी (adrenal glands), इन्सुलिनची कार्यपद्धती… या सगळ्यांचा त्यात सूक्ष्म सहभाग असतो. या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू शकतो-
शरीर थकलेलं वाटणं
पोट फुगल्यासारखं वाटणं
स्तनांमध्ये जडपणा
भूक बदलणं
पचन मंदावणं
चिडचिड किंवा भावनिक संवेदनशीलता
डोकेदुखी
झोपेचे बदल
काहींमध्ये त्वचेवर पुरळ… हे सगळे मनाचे खेळ नसून शरीरातील जैविक बदलांचे परिणाम असतात.

पाळी आणि आयुर्वेद – ‘रजस्वला परिचर्या’

आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही या बदलांची दखल घेतात. आयुर्वेदाने ‘रजस्वला परिचर्या’ सांगितली आहे. ती केवळ रूढी किंवा निर्बंध नसून स्त्रीच्या जैविक लयीत जगण्याचं शास्त्र आहे. या काळात स्त्रीला- अतिश्रम टाळणे, पुरेशी विश्रांती घेणे, हलका व सात्त्विक आहार घेणे, मानसिक शांतता राखणे, राग, जागरण, अति व्यायाम टाळणे असं सांगितलं गेलं आहे. यामागचा उद्देश स्त्रीला कमी लेखणे नव्हता; तर तिच्या शरीराला पुनर्बलनासाठी वेळ देणे हा होता. दुर्दैवाने काळाच्या ओघात विश्रांतीचं रूपांतर वर्ज्यमध्ये झालं आणि मूळ अर्थ हरवला.

स्वच्छता म्हणजे नेमकं काय?

आज “menstrual hygiene” म्हटलं की चर्चेचा केंद्रबिंदू असतो- पॅड, कप, टॅम्पॉन किंवा सॅनिटरी उत्पादने. पण स्वच्छता फक्त बाह्य नसते; ती शरीर, मन, भावना आणि जीवनशैली या सगळ्यांची असते.

१. बाह्य स्वच्छता

बाह्य जननेंद्रियांची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.

काही मूलभूत गोष्टी :

  • वेळेवर पॅड किंवा कापड बदलणं
  • ओलसरपणा टाळणं
  • सुती, हवेशीर अंतर्वस्त्र वापरणं
  • अतिसुगंधी स्प्रे, इंटिमेट वॉशचा अतिरेक टाळणं
  • खूप गरम पाण्याने वारंवार धुणं टाळणं
  • वापरलेले कपडे नीट धुऊन उन्हात वाळवणं
  • हे संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त असतं.
  • पण अनेकदा ‘जास्त स्वच्छता’ करताना योनीमार्गातील नैसर्गिक जीवाणू संतुलन बिघडवलं जातं.
  • योनीमार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः राखण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे अति रसायनयुक्त उत्पादने वापरणं हानिकारक ठरू शकतं.

२. शरीराची आतली स्वच्छता

या काळात शरीरातील प्रत्येक पेशी बदल अनुभवत असते.
म्हणून स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य साफसफाई नसून- शरीरावर अतिरिक्त भार न टाकणंही होय.
आयुर्वेदानुसार या काळात पचनशक्ती किंचित मंदावलेली असते. त्यामुळे हलकं, ताजे , गरम आणि सहज पचणारं अन्न अधिक अनुकूल ठरतं.

शरीराला पोषण देणारे पदार्थ :

  • मूगडाळ खिचडी
  • तूप
  • उकडलेल्या भाज्या
  • सूप
  • डाळिंब
  • खजूर
  • मनुका
  • तीळ-गूळ
  • कोमट पाणी
  • लोहतत्वयुक्त आहार

त्रास वाढवू शकणाऱ्या गोष्टी:

  • अतिथंड पदार्थ
  • जंक फूड
  • अतितिखट अन्न
  • सततचा चहा-कॉफीचा अतिरेक
  • कृत्रिम रंगद्रव्ययुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ

पाळीच्या आधीच्या आठवड्यात अतिखारट, तळलेले पदार्थ कमी केल्यास काही स्त्रियांमध्ये पोटदुखी, सूज, शरीरात पाणी साठणे ( वॉटर retention )कमी होतं. याचा अर्थ ‘सगळंच बदलून खावं’ असा नाही. पण शरीर त्या काळात जे सांगतं, ते ऐकण्याची संवेदनशीलता आवश्यक आहे.

मी एक सुपरवूमन…

आज अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराला न विचारता सतत “नेहमीसारखं perform” करण्याचा प्रयत्न करतात. ऑफिस, घर, मुलं, करिअर, सामाजिक अपेक्षा- सगळं सांभाळताना शरीर मात्र शांतपणे सांगत असतं- “थोडं सावकाश… मी आतून काम करत आहे.” विश्रांती घेणं म्हणजे कमकुवतपणा नाही. स्वतःच्या शरीराच्या लयीचा आदर करणं हीसुद्धा आरोग्याची परिपक्वता आहे. PMS – “ती जरा emotional झाली आहे…” इतकंच का? “ही फक्त पाळीची चिडचिड आहे…” असं म्हणत अनेक स्त्रियांच्या भावनांना कमी लेखलं जातं. पण PMS – Premenstrual Syndrome – हे वैज्ञानिक वास्तव आहे.

हार्मोनल बदलांमुळे काही स्त्रियांमध्ये :

  • चिडचिड
  • mood swings
  • उदासी
  • रडू येणं
  • थकवा
  • एकाग्रतेचा अभाव
  • गोड खाण्याची इच्छा
  • झोपेचे बदल
  • सामाजिक संवाद टाळावासा वाटणं, अशी लक्षणं दिसू शकतात.

महत्त्वाचं म्हणजे- प्रत्येक भावनेला “ही तर पाळी संबंधी आहे” म्हणून नाकारणं चुकीचं आहे. या काळात स्त्रीला औषधांइतकीच गरज असते ती- भावनिक सुरक्षिततेची, समजून घेणाऱ्या संवादाची, विश्रांतीची, स्वीकाराची हेही उपचारच असतात.

मासिक पाळी- अंतःस्रावी आरोग्याचा आरसा

माझ्याकडे नीट पाहिलंत तर मी शरीराच्या अनेक गोष्टी सांगत असते. थायरॉईडचे विकार, PCOS, इन्सुलिन रेझिस्टन्स, ताणतणाव, अपुरी झोप, वजनातील बदल, अति व्यायाम, रक्तक्षय- यांचा परिणाम पाळीवर दिसू शकतो.

लक्ष देण्यासारखी लक्षणं :

  • अनियमित पाळी
  • अतिरक्तस्राव
  • खूप मोठ्या गुठळ्या
  • तीव्र वेदना
  • वारंवार पाळी चुकणं
  • तीन महिन्यांपेक्षा जास्त पाळी बंद राहणं
  • दुर्गंधीयुक्त स्त्राव
  • अत्यंत अशक्तपणा ही शरीराची संकेतभाषा असू शकते. “हे तर नॉर्मल आहे” म्हणून सतत दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

पॅड, कप की कापड?

आज menstrual cup विषयी बरीच चर्चा होते. वैज्ञानिक दृष्ट्या योग्य पद्धतीने वापरल्यास तो सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतो. तसंच योग्य प्रकारे धुतलेलं, उन्हात वाळवलेलं स्वच्छ सुती कापडही सुरक्षित असू शकतं. मात्र प्रत्येक स्त्रीसाठी एकच पर्याय योग्य असेल असं नाही.

निर्णय घेताना पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात :

  • योनीमार्गाची संवेदनशीलता
  • वारंवार संसर्ग होण्याची प्रवृत्ती
  • वापरण्याची सवय
  • प्रवास
  • स्वच्छतेची सुविधा
  • मानसिक आश्वस्तता
  • वय आणि जीवनशैली

वैद्यकीय विज्ञानातसुद्धा ‘एकच उपाय सर्वांसाठी’ हा दृष्टिकोन मान्य नाही. म्हणून माहितीपूर्ण निर्णय महत्त्वाचा- अंधानुकरण नव्हे. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट- हीसुद्धा संस्कृतीच! वापरलेले पॅड वर्तमानपत्रात गुंडाळून तसेच फेकून देणं ही फक्त अस्वच्छता नाही; तर पर्यावरण आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दलची असंवेदनशीलता आहे.
शक्य असल्यास पॅड व्यवस्थित स्वच्छ करून मगच गुंडाळणे, जैववैद्यकीय कचऱ्याच्या नियमांची जाणीव ठेवणे, परत वापरता येण्यासारख्या पर्यायांचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेचा आदर करणे हीसुद्धा menstrual hygiene चाच भाग आहे.

पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या- कितपत योग्य?

लग्न, यात्रा, परीक्षा, सुट्ट्या, स्पर्धा… आणि मग सहज विचारलं जातं— “पाळी पुढे ढकलण्याची गोळी घेऊ का?” काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये या गोळ्या उपयुक्त असतात. परंतु वारंवार स्वतःहून वापर केल्यास हार्मोनल लयीवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी शरीराला ‘तुझं नैसर्गिक चक्र थांबव’ असं सांगताना त्याची किंमत शरीर कधीतरी वसूल करतं. सोयीसाठी शरीराचा आवाज सतत दाबणं- हीसुद्धा अस्वच्छतेची एक सूक्ष्म पातळी आहे.

पाळी आणि अध्यात्म

“पाळीच्या काळात मंदिरात जाऊ नये” – यावर अनेक वाद होतात. पण या चर्चेपलीकडे जाऊन एक प्रश्न विचारूया- या काळात स्त्रीच्या चेतनेत काय बदल घडतात? अनेक पारंपरिक संदर्भांमध्ये या दिवसांत स्त्री अधिक अंतर्मुख, संवेदनशील आणि सूक्ष्म जाणिवांनी भरलेली होत असल्याचे उल्लेख आढळतात. शरीरबाह्य क्रियांकडून थोडं मागे येतं आणि मन आतल्या दिशेने वळतं. कदाचित म्हणूनच पूर्वी स्त्रीला विश्रांती दिली जात होती. पण नंतर विश्रांतीचं रूपांतर ‘अस्पर्श’ आणि ‘वर्ज्य’मध्ये झालं. अध्यात्म म्हणजे केवळ मंदिरप्रवेश नव्हे. स्वतःच्या शरीराशी सुसंवाद साधणं, त्याच्या लयीचा आदर करणं- हेही अध्यात्मच आहे

मुलींशी पाळीबद्दल कसं बोलावं?

आजही अनेक मुलींना पहिल्या पाळीच्या वेळी भीती वाटते. काहींना तर काय घडतंय हेच माहिती नसतं. म्हणून मुलींशी योग्य वयात खुला संवाद आवश्यक आहे. मुलांनाही मासिक पाळीबद्दल संवेदनशील शिक्षण दिलं पाहिजे. ‘शरम’ऐवजी ‘समज’ दिली पाहिजे. शरीरशास्त्राबरोबर भावनिक शिक्षणही गरजेचं आहे. कारण मासिक पाळी ही फक्त स्त्री केंद्रित नाही- ती समाजाच्या आरोग्यसंस्कृतीची परीक्षा आहे. पाळीबद्दल लाज बाळगू नका. पाळीला शिक्षा समजू नका. पाळीला फक्त ‘त्या चार दिवसां’मध्ये बंदिस्त करू नका. पाळी स्त्रीशरीराचा मासिक उत्सव आहे. कधी वेदना… कधी शांतता… कधी नवसृजनाची चाहूल…

पाळीदरम्यान स्वच्छता फक्त बाह्य नाही, तर स्त्रीच्या शरीराचा, भावनांचा, मानसिकतेचा आणि अस्तित्वाचा आदर करणं आहे. आणि ज्या दिवशी समाज हा आदर शिकेल,
त्या दिवशी ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ वेगळा साजरा करावा लागणार नाही…
कारण प्रत्येक दिवस स्त्री आरोग्याचा उत्सव बनेल.

( एम. डी, आयुर्वेद स्त्री रोग प्रसुतीतज्ज्ञ)
madhurauday@gmail.com