scorecardresearch

Premium

पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

पोन्नीयिन सेल्व्हन’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नितांतसुंदर चित्रपटात ‘बाहुबली’ छापाची दृश्य फार कमी आहेत. पण या गोष्टीत असं काही आहे, जे आपल्याला फार कमी पाहायला मिळतं. प्रत्यक्ष युद्धात लढताना दिसल्या नाहीत, तरी तत्कालीन राजकारणाच्या आणि त्याच्याशी संबंधित समस्त गोष्टींच्या कर्त्या-करवित्या ठरलेल्या प्रभावशाली स्त्रिया. त्यांचंच खरं राज्य आहे!

Ponniyin Selvan
पोन्नीयिन सेल्व्हन

संपदा सोवनी

लेख वाचण्याआधी महत्त्वाची सूचना- तुम्ही ‘पोन्नीयिन सेल्व्हन- पार्ट १’ (अर्थात ‘पीएस-१’) हा चित्रपट पाहिला नसेल आणि ‘स्पॉइलर्स’ नको असतील तर हा लेख वाचू नका!)

hamas attack on israel women deadbody paraded naked
हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!
idol of Adishakti is also affected by inflation
गोंदिया : आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ, श्रृंगार साहित्यांच्या दरात वाढ
wedding dresses
लग्नांच्या पोशाखात ‘पेस्टल’ रंगच ‘हिट’!
Pankaja munde
“…म्हणून मी कोणत्याही आधाराशिवाय टिकले”, संघर्षकन्येनं सांगितलं सहनशीलकन्या होण्यामागचं कारण!

चोल साम्राज्याचा धाकटा युवराज आरुलमोळी वर्मन श्रीलंकेत बिकट परिस्थितीत सापडलाय. नदीच्या गुडघाभर पाण्यात चहुबाजूंनी शत्रूनं घेरलेला, नि:शस्त्र. बरोबर केवळ दोघे विश्वासू सहकारी. शत्रू अक्षरश: जाळं फेकून युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांना जागच्या जागी जखडून टाकतो… आता काही खरं नाही… तेवढ्यात नदीत अनपेक्षितपणे ‘एन्ट्री’ होते एका हत्तीची… हत्ती आणि त्याच्या पाठीवर बसलेली पांढऱ्याशुभ्र, लांबसडक केसांची वृद्धा. ही स्त्री मूकपणे येते आणि हत्तीसह युवराजाच्या शत्रूंवर चाल करते. हत्तीला लीलया खेळवत राहाते. आक्रमकतेनं पुन:पुन्हा चालून येणारा आणि शत्रूच्या एकेका सैनिकाला सोंडेत उचलून भिरकावणारा तो महाकाय प्राणी! त्या जोडगोळीपुढे कुणाचं काही चालत नाही. शत्रूला अखेर पळ काढणं भाग पडतं आणि युवराज वाचतो. ही वृद्धा जशी मूकपणे आली होती, तशीच मूकपणे, चेहराही न दाखवता हत्तीसह निघून जाते…

हेही वाचा- भारतीय क्रिकेट संघाचा तोफखाना : रेणुका सिंह ठाकूर

हा थरारक प्रसंग आहे नुकत्याच पाच भाषांत प्रसिद्ध झालेल्या ‘पोन्नीयिन सेल्हन’ या चित्रपटातला. चोल साम्राज्याच्या राजसिंहासनासाठी चाललेल्या संघर्षाची ही गोष्ट. मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला, ‘कल्की’ लिखित ‘पोन्नीयिन सेल्व्हन’ (अर्थ- ‘कावेरी नदीचा पुत्र’) या महाकादंबरीवरचा हा नितांतसुंदर चित्रपट. ‘व्हीएफएक्स’नं घडवलेल्या अतिभव्य मारामाऱ्या पाहाण्याची चटक लागलेल्या आपल्याला वर उल्लेख केलेला ‘टोन्ड डाऊन’ केलेला आणि बराच ‘रिअलिस्टिक’ वाटणारा प्रसंग खिळवून ठेवतो. त्यातली विशेष लक्षात राहाते ती हत्तीवर बसलेली आणि काम झाल्यावर एकही शब्द न बोलता, धड चेहरासुद्धा न दाखवता निघून जाणारी वृद्ध ‘उमई राणी’ (‘उमई’ अर्थात तमिळमध्ये ‘मूक’).

‘पोन्नीयिन सेल्व्हन’मधली लक्षात राहाणारी ही एकमेव स्त्री नाही. किंबहुना प्रत्यक्ष युद्धभूमीवर पराक्रम गाजवणारे पुरूष असले, तरी स्त्रियाच खऱ्या तत्कालीन जग आणि राजकारण चालवत होत्या, असं म्हणावं इतक्या प्रभावशाली स्त्रिया या कथेत आहेत. नुसत्या नायिका नव्हे, त्यांच्या तोडीस तोड खलनायिका आहे.

हेही वाचा- मेन्टॉरशिप : “अभिनय करणं हे तंत्र केवळ सुकन्या ताईंमुळे शिकले” : अभिनेत्री मुग्धा गोडबोले

वर लिहिलेल्या प्रसंगातल्या उमई देवीइतकीच आणखी एक गूढ व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे- नंदिनी (अभिनेत्री ऐश्वर्या राय). चोल साम्राज्याच्या गादीसाठी चाललेल्या रस्सीखेचीला निर्णायक कलाटणी देऊ पाहाणारी खलनायिका. जिच्या रूपानं भले भले घायाळ व्हावेत अशी सौंदर्यवती- ‘पळवूर’ची राणी. चोल साम्राज्याचा विश्वस्त असलेल्या आणि वयानं नंदिनीपेक्षा कितीतरी मोठ्या असलेल्या ‘पेरिया पळवेत्तरयारा’ची पत्नी. तिच्या ‘खलनायिका’ असण्यामागे मोठं दु:ख आहे. अनाथपण, लहान वयातलं न विसरता आलेलं प्रेम, पराभव आणि मानहानीचे चटके खाऊन उभी राहिलेली ही व्यक्तिरेखा. चोल साम्राज्याचं सिंहासन आपल्या पायाशी असायला हवं या महत्त्वाकांक्षेनं पेटलेली. या गोष्टीला नंदिनी मोठी वळणं देते. तिच्या गूढ व्यक्तिमत्त्वानं समोरच्याला भारावून टाकत चोल सिंहासनापर्यंत पोहोचण्याची वाट सोपी होण्यासाठी कोणताही धोका पत्करायची तिची तयारी आहे.

खलनायिकेप्रमाणेच प्रेक्षकांना भारून टाकणारी या गोष्टीतली एक नायिका म्हणजे ‘कुंदवई’ (त्रिशा कृष्णन्). चोल साम्राज्याची राजकुमारी. राजा सुंदर चोल यांच्यानंतरचा सिंहासनाचा दावेदार म्हणून घोषित करण्यात आलेला मोठा युवराज आदिथा करिकलन आणि धाकटा आरुलमोळी वर्मन यांची लाडकी बहीण. कुंदवई हे सौंदर्य, तीक्ष्ण बुद्धी आणि चातुर्य यांचं सुरेख मिश्रण आहे. राजकारण उत्तम कळणारी आणि ते करू शकणारी ही राजकन्या. चोलांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर राजा सुंदर चोल यांच्या होणाऱ्या चर्चांच्या वेळी कुंदवईची तिथे नुसती उपस्थितीच नाहीये, तर तिचं त्यावर स्वत:चं मत आहे, ते मोकळेपणानं वडिलांना सांगण्याची तिला पूर्ण मुभा आहे. राज्याचे पदाधिकारी राजाला उलथवून टाकून त्या जागी नवा राजा आणण्याची गुप्त खलबतं करताहेत, हे कळताच कुंदवई आपलं चातुर्य वापरते. या पदाधिकाऱ्यांना लग्नाच्या मुली आहेत, हे ओळखून आपल्या दोन्ही बंधूंसाठी आपण योग्य वधू आपण शोधतोय असं सांगून त्यांना भुलवते. हे वायदे आपण पूर्ण करणार नाही, हेही तिला ठाऊक आहे. पण या खेळीनं राज्याविरोधातले बेत थंडावले जावेत ही सुप्त इच्छा. नंदिनीशी असलेल्या लहानपणीच्या अपयशी प्रेमानं मनातून उध्वस्त झालेला, नंदिनी आपल्याच राज्यात एका वृद्ध पतीबरोबर आहे या विचारानं वारंवार कष्टी होणारा शीघ्रकोपी आदिथा करिकलन याला कुंदवई समजुतीच्या चार गोष्टी सांगते. ‘इतका राग बरा नव्हे, त्याला आवर घाल. इथे तू, मी, आपण कुणीच महत्त्वाचे नाही, राज्य नीट चालणं महत्त्वाचं,’ असं ती लहान बहीण असूनही थेट सुनावते.

हेही वाचा- सुंदर मी होणार : केस गळतीची प्रमुख कारणे ते उपाय, जाणून घ्या

या गोष्टीतली आणखी एक सुंदर व्यक्तिरेखा आहे, ती ‘पूंगळाली’. समुद्र कुमारी! होडी चालवणारी, समुद्रात उडी घेऊन मासोळी पकडणारी कणखर स्त्री. मूळ कादंबरीतली ही लोकप्रिय व्यक्तिरेखा चित्रपटात तुलनेनं कमी काळासाठी येत असली, तरी तिच्यात असलेली चौफेर लक्ष ठेवण्याची उत्सुक वृत्ती आणि धाडस चित्रपटात पुरेपूर दिसतं. श्रीलंकेत आलेल्या युवराज आरुलमोळी वर्मनवर पूंगळालीचा जीव जडलाय. युवराजाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, याकडे तिचं सतत लक्ष आहे आणि त्याला वाचवण्यासाठी काहीही करायची तयारी.

‘पोन्नीयिन सेल्व्हन’मध्ये ‘व्हीएफएक्स’नं साकारलेली अतिभव्य दृश्य कमी आहेत, हे खरंय. पण आजवर आपण फार कमी पाहिलेल्या समृद्ध स्त्री व्यक्तिरेखा ‘पोन्नीयिन सेल्व्हन’नं दिल्या. त्यासुद्धा कपोलकल्पित नव्हेत; खऱ्याखुऱ्या! या स्त्री-व्यक्तिरेखांसाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा!


sampada.sovani@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ponniyin selvan movie the story of ruling and impressive women dpj

First published on: 07-10-2022 at 11:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×