ब्राझीलमधील साओ पाउलो येथील ‘कॅमिनो दा फे’ या खडतर मार्गावरून धावणं म्हणजे केवळ शारीरिक क्षमतेचीच नव्हे, तर मानसिक कणखरतेचीही परीक्षा असते. सुमारे २०,००० फूट उंचीचे चढ-उतार, घनदाट जंगलं आणि अनिश्चित हवामान असलेल्या या २१७ किमीच्या शर्यतीत जगातील सर्वोत्तम धावपटूही हार मानतात. मात्र, मुंबईच्या पूजा कृष्णमूर्ती हिने ही शर्यत विहित केलेल्या ६० तासांच्या मर्यादेपूर्वीच, म्हणजेच अवघ्या ४८ तासांत पूर्ण केली. या ऐतिहासिक कामगिरीसह तिनं महिला गटात आठवं स्थान पटकावलं.
काही स्वप्नं अशी असतात जी आपण पाहत नाही, तर ती आपल्याला गवसतात. मुंबईकर तरुणी पूजा कृष्णमूर्तीने ब्राझीलमधील जगातील सर्वात कठीण मानली जाणारी ‘ब्राझील १३५ अल्ट्रा’ ही मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचला आहे. २१७ किलोमीटरचे हे अंतर पार करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला तिचा हा प्रवास जिद्द, शिस्त आणि महिला सशक्तीकरणाचं उत्तम उदाहरण आहे.
ब्राझीलमधील साओ पाउलो येथील ‘कॅमिनो दा फे’ या खडतर मार्गावरून धावणं म्हणजे केवळ शारीरिक क्षमतेचीच नव्हे, तर मानसिक कणखरतेचीही परीक्षा असते. सुमारे २०,००० फूट उंचीचे चढ-उतार, घनदाट जंगलं आणि अनिश्चित हवामान असलेल्या या २१७ किमीच्या शर्यतीत जगातील सर्वोत्तम धावपटूही हार मानतात. मात्र, मुंबईच्या पूजा कृष्णमूर्ती हिने ही शर्यत विहित केलेल्या ६० तासांच्या मर्यादेपूर्वीच, म्हणजेच अवघ्या ४८ तासांत पूर्ण केली. या ऐतिहासिक कामगिरीसह तिनं महिला गटात आठवं स्थान पटकावलं.
पूजाचा जन्म आणि जडणघडण मुंबईत झाली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या पूजाला धावण्याची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. मात्र, तिच्या पालकांनी तिला नेहमीच छंद जोपासण्याचं आणि अनुभवातून शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. तिची आई तिला आणि बहिणीला लहानपणीच हिमालयात ट्रेकिंगला पाठवत असे. वयाच्या ११ व्या वर्षी तिने पहिला ट्रेक केला आणि २० व्या वर्षी ती एक सर्टिफाईड गिर्यारोहक बनली. पर्वतांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तिच्यात नकळतपणे सहनशक्ती आणि नेतृत्त्वगुणांची जोपासना झाली.
शिक्षणानंतर तिनं जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज ती ‘बॉलाइन’(Bowline) नावाच्या स्वतःच्या जाहिरात निर्मिती संस्थेची मालकीण आहे. कॉर्पोरेट जगातील धावपळ आणि कामाच्या डेडलाईन्स सांभाळत असतानाच २०११ मध्ये पूजाच्या आयुष्यात धावणं एका अपघातानंच आलं. एका हाफ मॅरेथॉनमध्ये तिनं हौस म्हणून ५ कि.मी धावण्याचं ठरवलं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला.
नंतर सात-आठ वर्षे पूजा केवळ आवड – आनंदासाठी १० किमी धावत होती. २०१८ मध्ये तिनं २१ किमीची हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. कोरोना महामारीमुळे दोन वर्षं सरावात खंड पडला असला, तरी तिची जिद्द कमी झाली नव्हती. नोव्हेंबर २०२२ मध्ये जेव्हा ती पुन्हा ट्रॅकवर परतली, तेव्हा तिची भेट प्रशिक्षक आदिल मिर्झा यांच्याशी झाली.
याच काळात तिनं अमेरिकेतील बॅडवॉटर १३५ या जगातील सर्वात कठीण शर्यतीत आपल्या प्रशिक्षकासाठी ‘क्रू’ म्हणून काम केलं. तिथं तिनं चक्क ८० किमीपर्यंत आपल्या प्रशिक्षकासोबत धावत त्यांना साथ दिली. हे पाहून प्रशिक्षक तिला म्हणाले, ‘‘ तू हाफ मॅरेथॉनर का आहेस? तू तर एक अल्ट्रा धावपटू आहेस.’’ या एका वाक्यानं पूजाचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिथेच तिची भेट सोनिया आहुजा या पहिल्या भारतीय-अमेरिकन धावपटूशी झाली- जिने तिला ब्राझील अल्ट्रासाठी प्रेरित केलं.
पूजासाठी ब्राझीलचं लक्ष्य गाठणं सोपं नव्हतं. त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लडाखमध्ये पहिली फुल मॅरेथॉन पूर्ण केली, त्यानंतर पुणे अल्ट्रामध्ये १०० किमी धावून विजेतेपद मिळवलं. डिसेंबर २०२५ मध्ये राजस्थानच्या वाळवंटात १६० किमी यशस्वीरीत्या पार केल्यानंतर ती ब्राझील १३५ साठी पात्र ठरली.
मुंबईच्या उष्ण हवामानात तिने पहाटे दोन तास आणि संध्याकाळी दीड तास असा कठोर सराव केला. प्रत्यक्ष शर्यतीत दोन रात्री जागून धावायचं असल्यानं तिनं रात्रीच्या सरावावरही भर दिला. त्या दरम्यान झालेल्या प्रत्यक्ष शर्यतीत तिनं केवळ शरीराशीच नव्हे, तर मनातील भीतीशीही लढा दिला. ती सांगते की, पर्वतांचे चढ जेवढे त्रासदायक होते, तितकेच उतारही गुडघ्यांसाठी वेदनादायी होते. तरीही, पूर्णकुटी या स्वयंसेवी संस्थेसाठी आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं ती धावत राहिली.
पूजाच्या मते, ही धाव केवळ अंतर कापण्यासाठी नव्हती, तर स्त्रियांच्या अंतःशक्तीचे प्रदर्शन होतं. ती म्हणते, ‘‘स्त्रियांनी स्वतःला प्राधान्य देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण नेहमी कुटुंब आणि कामाला आधी स्थान देतो, पण धावण्यानं मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं.’’ पूजाचा हा प्रवास आज अनेक भारतीय महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीकडे वळण्यास प्रेरित करणारा आहे.
पूजाचं पुढील उद्देश आहे जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या बॅडवॉटर १३५ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणं. तिनं सिद्ध केलं की, जर तुमच्याकडे योग्य नियोजन, जिद्द आणि कठोर परिश्रमांची तयारी असेल, तर जगातील कोणतंही शिखर सर करणं अशक्य नाही. पूजा कृष्णमूर्तीची ही वाटचाल येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.
rohit.patil@expressindia.com

