अनुजा कर्णिक मोहिले
एकदा माझ्याकडे आलेल्या एका आईने सहज सांगितलं, “माझ्या मुलीला आता कुमारी आसव द्यायचा विचार आहे. शरीराची तयारी व्हावी म्हणून.” त्या वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. आजची Gen Z हे तितक्याच सहजपणे स्वीकारेलच असं नाही. बाटली समोर ठेवली आणि “हे घे, शरीराची तयारी होईल,” असं म्हटलं तर पुढचा प्रश्न बहुधा तयारच असतो- “पण का?”
आणि तो प्रश्न चुकीचा नाही. त्या विशिष्ट औषधाची गरज, योग्य मात्रा आणि उपयोग याबद्दल निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे विचारात घेणे आवश्यक आहे. पण त्या आईच्या विचारामागची एक गोष्ट मात्र महत्त्वाची होती- मुलगी आई होण्याच्या वयात पोहोचल्यावरच तिच्या आरोग्याची काळजी सुरू करायची नसते. आज आधुनिक वैद्यकशास्त्र याच व्यापक विचाराला ‘गर्भधारणेपूर्व आरोग्यनिगा’ म्हणते. फरक एवढाच- ही तयारी एका बाटलीत किंवा एका गोळीत मावत नाही. तिची पायाभरणी मुलगी मोठी होत असतानाच सुरू होते.
पहिली पाळी : केवळ एक तारीख नाही. मुलगी किशोरावस्थेत प्रवेश करते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल वेगाने घडत असतात. उंची-वजन वाढतं, शरीरातील चरबीचं वितरण बदलतं, संप्रेरकांमध्ये बदल होतात आणि त्यानंतर मासिक पाळी सुरू होते. म्हणून पहिली पाळी ही केवळ ‘मुलगी मोठी झाली’ अशी सामाजिक खूण नाही; ती शरीरातील प्रजननक्षमतेच्या दिशेने होत असलेल्या परिपक्वतेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सामान्यतः स्तनांची वाढ सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांच्या आसपास पहिली पाळी येते. बहुतेक मुलींमध्ये ती साधारण १२-१३ वर्षांच्या आसपास दिसते. वयाच्या १५ वर्षांपर्यंत पाळी सुरू झाली नसेल किंवा स्तनांची वाढ सुरू झाल्यानंतर तीन वर्षे उलटूनही पाळी आली नसेल, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक ठरू शकते.
इथे ‘लवकर’ किंवा ‘उशिरा’ यापेक्षा मुलीची एकूण वाढ कशी होत आहे, हे महत्त्वाचं. लवकर पाळी आली म्हणजे पुढे गर्भधारणा होणार नाही, असं नाही. उशिरा पाळी आली म्हणजे गर्भधारणा होणार नाही, असंही नाही. मात्र पोषण, शरीरातील चरबीचं प्रमाण, शारीरिक हालचाल आणि काही आरोग्यविषयक स्थिती यांचा तारुण्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत लवकर किंवा लक्षणीय उशिरा होणारे बदल दुर्लक्षित न करता त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं.
पाळी सुरू झाली की लोहाकडे लक्ष : मासिक पाळी सुरू झाल्यानंतर लोहाची गरज आणि त्याची उपलब्धता याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. मासिक पाळीमधून होणारा रक्तस्राव, वाढत्या वयातील पोषणाची गरज आणि आहारातील लोहाची कमतरता- या सगळ्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षयाचा धोका वाढू शकतो. WHO देखील मासिक पाळी असलेल्या किशोरवयीन मुलींना रक्तक्षयाच्या जोखमीचा महत्त्वाचा गट मानते. म्हणून डाळी-कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, तीळ, सुका मेवा, अंडी किंवा उपलब्धतेनुसार इतर लोहयुक्त पदार्थ आहारात असणं महत्त्वाचं. गरज असल्यास तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने लोहाची औषधं घ्यावीत. ‘लग्न झाल्यावर रक्त तपासू’ हा दृष्टिकोन मात्र उशिराचा आहे.
वजनाचा प्रश्न फक्त दिसण्यापुरता नाही : गर्भधारणेपूर्व आरोग्याचा विचार करताना वजनाबद्दल आपण अनेकदा फक्त ‘जास्त वजन टाळा’ एवढंच ऐकतो. पण कमी वजनही तितकंच महत्त्वाचं आहे.
शरीराला पुरेसं ऊर्जानिर्मितीचं आणि पोषणाचं समर्थन मिळत नसेल, वजन खूप कमी असेल किंवा व्यायामाच्या तुलनेत आहार अपुरा असेल, तर मासिक पाळी आणि अंडोत्सर्जनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणा होण्यातही अडचण येऊ शकते.
दुसरीकडे, लक्षणीय जास्त वजन किंवा लठ्ठपणाचा संबंध अंडोत्सर्जनातील अडथळे, वंध्यत्व आणि गर्भपाताच्या वाढलेल्या जोखमीशी जोडला गेला आहे. गर्भधारणेनंतर गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर गुंतागुंतींचा धोकाही वाढू शकतो. म्हणून उद्देश ‘सडपातळ दिसणं’ हा नसून शरीराला त्याच्या उंची, वय, शरीररचना आणि आरोग्याच्या गरजेनुसार योग्य पोषण आणि संतुलित वजन मिळणं हा असायला हवा.
PCOS म्हणजे वंध्यत्व नाही : याच संदर्भात PCOSचा उल्लेख अपरिहार्य आहे. PCOS असलेल्या काही महिलांमध्ये अंडोत्सर्जन नियमित होत नसल्यामुळे गर्भधारणा होण्यास वेळ लागू शकतो. पण PCOS म्हणजे गर्भधारणा होणारच नाही, असा अर्थ अजिबात नाही. योग्य उपचार आणि नियोजनाने PCOS असलेल्या अनेक महिलांना गर्भधारणा होते. PCOS ही केवळ ‘पाळीची समस्या’देखील नाही. तिचा संबंध इन्सुलिन प्रतिरोध, वजन आणि चयापचयाशी संबंधित जोखमींशी असू शकतो. PCOS हा गर्भावस्थेतील मधुमेहासाठीही एक जोखमीचा घटक मानला जातो. म्हणून किशोरवयापासून संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप आणि निरोगी शरीरवजन याकडे लक्ष देणं ही PCOS असो वा नसो, सर्व मुलींसाठी आरोग्याची गुंतवणूक आहे.
फक्त लोह नाही- सूक्ष्म पोषकद्रव्यांचीही पायाभरणी : ‘आहार चांगला आहे’ म्हणजे फक्त पोट भरतंय एवढंच नाही. शरीराच्या वाढीसाठी आणि भविष्यातील प्रजनन आरोग्यासाठी विविध सूक्ष्म पोषकद्रव्यांचीही आवश्यकता असते. जस्त शरीरातील वाढ, पेशींची निर्मिती आणि प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचं आहे. जीवनसत्त्व A दृष्टी, प्रतिकारशक्ती आणि वाढीसाठी आवश्यक आहे. कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी तर जीवनसत्त्व D कॅल्शियमच्या योग्य वापरासाठी आणि हाडांच्या चयापचयासाठी महत्त्वाचं आहे. WHOच्या पोषण मार्गदर्शकांमध्येही ही पोषकद्रव्ये मातृ आणि गर्भाच्या आरोग्याच्या संदर्भात महत्त्वाची मानली आहेत. याचा अर्थ प्रत्येक मुलीने लगेच अनेक गोळ्या सुरू कराव्यात असा नाही. उलट, विविध आहारातून पोषण मिळणं हा पहिला मार्ग आहे. कमतरता असल्याचा संशय किंवा तपासणीत कमतरता आढळल्यासच आवश्यक पूरक आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा.
शरीराइतकंच मनही महत्त्वाचं : गर्भधारणेपूर्व आरोग्याबद्दल बोलताना रक्ततपासणी, वजन आणि जीवनसत्त्वांच्या पलीकडेही पाहायला हवं. किशोरवयात शरीराच्या दिसण्याबद्दलची चिंता, अभ्यासाचा ताण, सामाजिक दबाव, सामाजिक माध्यमांचा प्रभाव आणि झोपेचा अभाव यांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून भविष्यातील आईच्या आरोग्याची तयारी म्हणजे केवळ ‘निरोगी शरीर’ नव्हे; निरोगी मनही. नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि ताण हाताळण्याची क्षमता या सवयी गर्भधारणेसाठीच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
मग गर्भधारणा कधी? : आज शिक्षण, नोकरी, करिअर, आर्थिक स्थैर्य, लग्नाचं नियोजन किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अनेक महिला गर्भधारणा पुढे ढकलतात. हा निर्णय प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. पण प्रजननक्षमता मात्र आपल्या सोयीच्या वेळापत्रकानुसार बदलत नाही. ACOGनुसार स्त्रीची प्रजननक्षमता साधारण वयाच्या ३० वर्षांपासून कमी होऊ लागते आणि तिशीच्या मध्यावधीनंतर ही घट अधिक वेगाने होऊ शकते. वय वाढत असताना गर्भपात आणि गर्भातील गुणसूत्रांशी संबंधित काही विकारांचा धोकादेखील वाढतो. याचा अर्थ ३५ वर्षांनंतरची गर्भधारणा म्हणजे धोकादायक आणि त्याआधीची गर्भधारणा म्हणजे पूर्णपणे सुरक्षित, असा काळा-पांढरा नियम नाही. पण गर्भधारणेचं नियोजन करताना जैविक वयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणंही योग्य नाही. माहितीच्या आधारे स्वतःच्या आरोग्याचा, वयाचा आणि वैयक्तिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं.
आणि मग येतं फॉलिक ॲसिड… : गर्भधारणेपूर्व आरोग्यनिगा म्हटलं की आज सर्वात आधी आठवतं ते फॉलिक ॲसिड. गर्भधारणा होण्याची शक्यता असलेल्या महिलांनी दररोज ४०० मायक्रोग्रॅम फॉलिक ॲसिड घ्यावं. गर्भधारणेचं नियोजन असल्यास ते किमान एक महिना आधी सुरू करण्याची शिफारस केली जाते. यामुळे गर्भाच्या मेंदू आणि मज्जारज्जूच्या सुरुवातीच्या विकासाशी संबंधित न्यूरल ट्यूब दोषांचा धोका कमी करण्यास मदत होते. काही विशिष्ट जोखमीच्या परिस्थितीत अधिक मात्रा आवश्यक असू शकते; ती वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे- फॉलिक ॲसिड सुरू करण्याची वेळ आली म्हणून आरोग्याची तयारी सुरू होते, असं नाही.
ती तयारी त्याआधीच सुरू झालेली असते. एका बाटलीपासून एका व्यापक विचारापर्यंत. त्या आईने सांगितलेलं कुमारी आसव आजही माझ्या लक्षात आहे. त्या औषधाबद्दल मत देणं हा या लेखाचा उद्देश नाही. आयुर्वेदिक औषध वापरायचं की नाही, कोणासाठी आणि कोणत्या मात्रेत वापरायचं, हे संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून ठरवणं योग्य. पण त्या छोट्याशा संवादातून एक मोठा विचार नक्कीच पुढे येतो. मुलगी आई होण्याच्या वयात पोहोचल्यावर तिच्या आरोग्याची तयारी सुरू करण्यापेक्षा, ती मोठी होत असतानाच तिच्या आरोग्याची पायाभरणी का करू नये?
संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार, पुरेसं प्रथिन, लोहासह आवश्यक सूक्ष्म पोषकद्रव्यांकडे लक्ष, निरोगी शरीरवाढ आणि शरीरवजन, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, मानसिक आरोग्य, मासिक पाळीचं आरोग्य आणि योग्य वेळी आरोग्यतपासणी… हीच त्या तयारीची खरी रूपं आहेत. भारतीय बालरोगतज्ज्ञांच्या २०२४च्या गर्भधारणेपूर्व आरोग्यनिगेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही किशोरावस्था ही पुढील प्रजनन आरोग्याची महत्त्वाची पायरी मानली आहे आणि पोषण, निरोगी जीवनशैली, चयापचयाचं आरोग्य, मानसिक आरोग्य, लसीकरण आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्यांकडे गर्भधारणेपूर्वीपासून लक्ष देण्यावर भर दिला आहे. निरोगी बाळाची तयारी गर्भधारणेच्या नऊ महिन्यांपूर्वी सुरू होते आणि निरोगी प्रजनन आरोग्याची तयारी त्याही आधी. फॉलिक ॲसिडची गोळी गर्भधारणेच्या काही आठवडे आधी सुरू होऊ शकते; पण भविष्यातील आईच्या आरोग्याची पहिली पायरी तिच्या बालपणातच पडलेली असते.
म्हणून पुढचा प्रश्न फक्त-
“गर्भधारणेच्या आधी काय घ्यायचं?”
असा नको.
कदाचित खरा प्रश्न असावा- “भविष्यातील आईच्या आरोग्याची पायाभरणी आपण नेमकी कधीपासून करतो?”
(महिला व बालपोषण तज्ज्ञ)
aahaartadnya1605@gmail.com
