करिअरसाठी स्वत:हून वेगळी वाट निवडणं आणि पालकांनी निवडून दिलेल्या वेगळ्या वाटेवरून चालण्यात निश्चितच फरक आहे. सुभेदार प्रीती राजक पालकांनी निवडलेल्या वेगळ्या वाटेवरून फक्त चाललीच नाही तर त्यात यशस्वी होऊन दाखविलं. आणि पहिली सुभेदार महिला बनून नवा इतिहासदेखील रचला. तेव्हा जाणून घेऊया तिच्या प्रवासाविषयी…
बऱ्याचदा करिअरचा विचार करताना ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या उक्तीनुसार अनेक तरूण-तरुणी आपला मार्ग धुंडाळत असतात. कारण जग झपाट्यानं बदलत असलं तरी आजही आपल्याकडे मुलं करिअरमध्ये स्थिर स्थावर होईपर्यंत पालकच त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत असतात. काही असेही पालक आहेत, जे आपल्या मुलींना वेगळ्या वाटा धुंडाळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. प्रीती राजकच्या बाबतीत असंच काहीसं झालं.
मध्यप्रदेशच्या इटारसीमध्ये २००२ साली प्रीतीचा जन्म झाला. वडिलांचा इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. खाऊन-पिऊन सुखी असं कुटुंब होतं. गाठीशी फार पैसा नव्हता, पण आपल्या मुलीनी वेगळं आणि चांगलं करिअर निवडावं असं सतत तिच्या आई- वडिलांना वाटत होतं. २०१५ साली आईनं प्रीतीसह तिच्या बहिणीला शुटिंग अकादमीमध्ये दाखल केलं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी प्रीतीनं या क्षेत्रात कमालीचं प्रभुत्व मिळविलं. इतकं की १५-१६ व्या वर्षीच ती राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व करणारी खेळाडू बनली. त्यातही ट्रॅप शुटर या प्रकारात तिनं आपलं कौशल्य अधिक चांगल्याप्रकारे विकसित केलं. आणि जेव्हा २०२३च्या आशियाई स्पर्धेत सहभागी होऊन रजतपदकाची मोहोर आपल्या नावावर उमटविली, त्यावेळी तो क्षण केवळ तिच्यासाठीच नाही तर भारतासाठीदेखील अभिमानाचा क्षण होता.
या स्पर्धेच्या आगोदर तिनं भारतीय सैन्यात प्रवेश मिळविला होता. सैन्यातील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२४ मध्ये तिला भारतीय सैन्याची ‘सुभेदार’ अशी पदवी मिळाली. अशाप्रकारची पदवी प्राप्त करणारी ती पहिली भारतीय तरुणी आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर प्रीतीनं अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन पदकांची कमाई केली. एक वेगळं क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होणं, ही तशी पहिली तर अवघड गोष्ट आहे. अवघ्या २३ व्या वर्षी यशाची चव चाखताना कसं वाटतं, असं विचारलं असता प्रीती नम्रपणे या सर्व गोष्टींचं श्रेय आपल्या पालकांना देते.
ती म्हणते की, आई-वडिलांनी नेहमीच आम्हा दोघी बहिणींना प्रोत्साहन दिलं. वेगळ्या वाटेवरून चालताना, मोठी स्वप्नं बघून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनतीबरोबर दुर्दम्य इच्छाशक्तीचीदेखील तितकीच गरज असते, हा विश्वास त्या दोघांनी आमच्यामध्ये रुजविला. आज जेव्हा सुभेदार प्रीती म्हणून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खूप छान वाटतं.
एका सामान्य कुटुंबातली मुलगी ते सुभेदार होण्याचा प्रवास प्रीतीसाठी साधा-सोपा नसला तरी आव्हानांनी भरलेला होता. शुटिंगच्या प्रशिक्षणाच्या वेळी एकाग्र (फोकस) राहण्याच्या सवयीनं खेळातच नाही तर आयुष्यातदेखील बदल घडवून आणला. ज्या ज्या वेळी आव्हानात्मक परिस्थिती समोर उभी राहिली, त्यावेळी या एकाग्र राहण्याच्या वृत्तीने ती न डगमगता सामोरी गेली. आज सुभेदार प्रीती फक्त स्वत:साठीच प्रतिनिधित्व करीत नाही तर तिचं प्रतिनिधित्व हे देशाबरोबर भारतीय सैन्याचंदेखील असतं. अशा या उमद्या तरुणीला पुढील वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
