आजच्या आधुनिक भारतात महिलेला आई होण्याचा आणि यशस्वी व्यावसायिक आयुष्य जगण्याचा समान अधिकार आहे. कोणतीही संस्था, नियम किंवा प्रशासकीय प्रक्रिया त्या अधिकारांवर अन्याय्य मर्यादा घालू शकत नाही.
भारतीय राज्यघटनेने महिलांना समानतेचा, सन्मानाने जगण्याचा आणि सार्वजनिक नोकरीतील समान संधीचा अधिकार दिलेला आहे. तरीदेखील प्रत्यक्षात अनेक महिलांना गर्भधारणेमुळे नोकरी, पदोन्नती किंवा नियुक्तीमध्ये अडथळे निर्माण होताना दिसतात. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अत्यंत ऐतिहासिक आणि महिलांच्या हक्कांना बळ देणारा निर्णय दिला आहे.
या प्रकरणात डॉ. रेणुका शिवाजी बुणगे यांची CRPF मध्ये ‘Specialist Medical Officer Grade-II’ पदावर निवड झाली होती. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेशही देण्यात आला. त्या सेवेत रुजू होण्यासाठी हजर झाल्या आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या. मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान त्या १६ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे आढळले. त्यानंतर CRPF प्रशासनाने Swamy’s Manual मधील काही तरतुदींवर अवलंबून राहून त्यांना ‘temporarily unfit’ घोषित केले आणि नियुक्ती स्थगित ठेवली.
या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयाने- १. CRPF मधील पद ‘combatised’ स्वरूपाचे आहे, त्याकरता प्रशिक्षण आवश्यक आहे, गर्भवती महिला उमेदवार तत्काळ प्रशिक्षण घेऊ शकत नाही, म्हणून नियुक्ती थांबविणे योग्य आहे असे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. २. केवळ गर्भधारणेमुळे महिला उमेदवाराची नियुक्ती रोखता येते का?, गर्भधारणा ही ‘temporary unfitness’ मानता येईल का?, मातृत्व आणि रोजगार यांपैकी निवड करण्यास महिलेला भाग पाडणे संविधानविरोधी आहे का?
आणि सरकारी नियम किंवा प्रशासकीय पुस्तके मूलभूत अधिकारांपेक्षा वरचढ ठरू शकतात का? हे या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. ३. गर्भधारणा म्हणजे आजार नसल्याने गर्भधारणा ही कोणतीही वैद्यकीय अपात्रता किंवा कायमस्वरूपी कार्यअसमर्थता नाही, ४. मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक जैविक टप्पा आहे. त्यामुळे त्याला ‘अयोग्यता’ समजणे हा महिलेविरोधी भेदभाव आहे. ५. पुरुष उमेदवारांना जैविक कारणांमुळे अशा प्रकारे अपात्र ठरवले जात नाही. त्यामुळे महिलेला मातृत्वामुळे नोकरीपासून दूर ठेवणे हे स्पष्टपणे लैंगिक भेदभाव ठरते.
६. असे केल्यास ते भारतीय घटनेच्या अनुच्छेद १४ आणि १६ चे उल्लंघन ठरेल. ७. महिलेला ‘मातृत्व की नोकरी’ असा पर्याय देणे हे तिच्या मूलभूत हक्कांवर आघात करणारे आहे. ८. Medical Officer चे काम Police Officer सारखे नसते, डॉक्टरांना कठोर शारीरिक प्रशिक्षण आवश्यक नसते, त्यामुळे १५ दिवसांचे familiarization training हे police physical training समकक्ष मानता येणार नाही. ९. सरकारने “Swamy’s Complete Manual” वर अवलंबून निर्णय घेतला आहे, मात्र खाजगी प्रकाशनातील पुस्तके नागरिकांचे अधिकार कमी करू शकत नाहीत आणि प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे संविधानापेक्षा वरचढ नाहीत, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि नियुक्ती स्थगितीचा आदेश रद्द केला.
हा निर्णय केवळ एका महिला डॉक्टरपुरता मर्यादित नसून, भविष्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्व हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा संदर्भ ठरणार आहे. अनेक संस्थांमध्ये आजही गर्भधारणेकडे ‘कार्य करण्यास असमर्थ’ अशी चुकीची मानसिकता ठेवली जाते. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. संभाजीनगर खंडपीठाचा हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेतील महिलांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जाईल.
‘मातृत्व हा दोष नाही, तर स्त्रीचा सन्माननीय अधिकार आहे.’ हे या निकालाने अधोरेखित केलेले आहे. आजच्या आधुनिक भारतात महिलेला आई होण्याचा आणि यशस्वी व्यावसायिक आयुष्य जगण्याचा समान अधिकार आहे. कोणतीही संस्था, नियम किंवा प्रशासकीय प्रक्रिया त्या अधिकारांवर अन्याय्य मर्यादा घालू शकत नाही. हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नसून, भारतीय महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याचा विजय आहे.
