अकरावीच्या वर्गात नापास होण्यापासून ते थेट मध्य प्रदेशची डेप्युटी कलेक्टर बनण्यापर्यंतचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास प्रियल यादवने केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अपयशामुळे हार न मानता, जिद्दीने वाटेतील प्रत्येक अडथळा दूर करीत आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने विनाखंड वाटचाल चालू ठेवायला हवी, अशी प्रेरणा प्रियल यादवने मिळविलेल्या कमालीच्या यशामुळे
अनेक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

प्रियल यादव ही सध्या इंदूरची डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रर असून, तिने मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची [MPPSC] परीक्षा तीन वेळा दिली आणि तीनही वेळेस ती त्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिसऱ्या प्रयत्नामध्ये तिच्या रँकमध्ये सुधारणा झाल्याने तिला आता मध्य प्रदेश उपजिल्हाधिकारी [डेप्युटी कलेक्टर] या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे.

शेतकरी कुटुंबातील २७ वर्षांच्या प्रियल यादवचे वडील हे शेतकरी; तर आई गृहिणी आहे. उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असली तरीही दहावीनंतर नॉन-मेडिकल क्षेत्र निवडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला होता. कदाचित त्यामुळेच प्रियलला अकरावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यात अपयश आले असावे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आमंत्रण असलेल्या ऐश्वर्या एस मेनन, सुरेखा यादव कोण? पाहा…

“मी दहावीपर्यंत वर्गात टॉपर होते. मात्र, कुटुंबीयांच्या दबावामुळे मी आवड नसतानाही अकरावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांची निवड केली आणि भौतिकशास्त्रात नापास झाले,” असे प्रियलने पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. असे असले तरीही ते प्रियलच्या शैक्षणिक आयुष्यातील पहिले आणि शेवटचे अपयश होते, असे ती म्हणते.

प्रियलने तिच्या आई-वडिलांचेदेखील आभार मानले आहेत. त्यांनी ग्रामीण भागात राहत असूनही, प्रियलला कधीही लग्नासाठी घाई केली नाही. उलट प्रियलच्या पालकांनी तिला कायम तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचा प्रियलला कायम पाठिंबा असायचा.

“मी ग्रामीण भागात राहते. अशा भागात मुलींची लवकर किंवा लहान वयातच लग्न लावून दिली जातात. मात्र, माझा पालकांनी माझ्यावर लग्नासाठी कधीही जबरदस्ती केली नाही. त्यांनी मला शिक्षणासाठी पूर्ण मुभा अन् स्वातंत्र्य दिले होते”, असे ती म्हणते.

प्रियल यादवचा MPPSC चा प्रवास

प्रियल अकरावीच्या वर्गात जरी अपयशी झाली होती. पण, तिने अथक मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर २०१९ साली MPPSC परीक्षा देऊन, त्यात १९ वा क्रमांक पटकावला. तेव्हा प्रियलला जिल्हा निबंधक म्हणून नियुक्त केल्यानंतर तिच्या कष्टाचे चीज झाले.

मात्र, तिच्या महत्त्वाकांक्षेला अजूनही तिच्या यशाला हवी तशी समाधानाची झालर लाभली नव्हती. त्यामुळे प्रियलने २०२० साली पुन्हा एकदा MPPSC परीक्षा दिली. मात्र, या वेळेस तिला ३४ वा क्रमांक मिळाला आणि तिची सहकार विभागातील सहायक आयुक्त पदासाठी निवड झाली.

परंतु, यशाच्या आणखी उंचीवर जाण्यासाठी प्रियलने २०२१ साली पुन्हा एकदा MPPSC परीक्षा देऊन त्यामध्ये आणखी उत्तम कामगिरी करून दाखवली. MPPSC २०२१ परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार प्रियलने ६ वा क्रमांक पटकावला आहे.अधिकाऱ्यांनीदेखील सांगितले आहे की, २०२१ च्या MPPSC परीक्षेत डेप्युटी कलेक्टर पदासाठी निवडलेल्या टॉप १० उमेदवारांमध्ये प्रियल यादवचादेखील समावेश आहे.

हेही वाचा : तिसऱ्यांदा अंतराळ प्रवास करून सुनीता विलियम्सने रचला इतिहास! पाहा तिचा हा आत्मविश्वासपूर्ण प्रवास

आता लक्ष्य IAS वर

आता प्रियलचे प्रतिष्ठित अशी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे आणि आयएएस अधिकारी बनणे हे पुढील लक्ष्य आहे. IAS अधिकारी बनण्याचे आता प्रियलचे स्वप्न आहे. राज्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना आयएएस परीक्षेची तयारी करणार असल्याचे प्रियलने म्हटले आहे. सध्या प्रियल यादव ही इंदूरमध्ये डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रर म्हणून कार्यरत आहे, अशी सर्व माहिती ही इंडिया डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.