Premium

विवाह समुपदेशन : लग्नाचाही प्रोबेशन पीरियड असतो?

लग्नाचे सुरुवातीचे चार-पाच महिने फारच महत्त्वाचे असतात. कारण एकमेकांसोबत प्रत्यक्ष राहणं सुरू झालेलं असतं. त्या दिवसांतच एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा, गरजा लक्षात येतात. काही वेळा आपलं एकमेकांशी पटेल ना, आपण कायम एकत्र राहू ना, हेही प्रश्न पडू शकतात. कसे सांभाळायचे हे सुरुवातीचे दिवस? लग्नाचा प्रोबेशन पीरियड कसा सांभाळाल?

marriage new age girls
लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी दोघांनीही वेळ द्यायला हवा

“मॅम, रवीसोबत संपूर्ण आयुष्य काढणं मला शक्यच होणार नाही, असं मला वाटू लागलं आहे. खरं तर माझी फसवणूक झालेली आहे. त्याचे आणि त्याच्या घरच्यांचे विचार अतिशय पुरातन, मागासलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं मला शक्य नाही आणि माझ्या म्हणण्यानुसार ते त्यांच्यात काही बदल घडवणार नाहीत, त्यापेक्षा वेगळं झालेलं कधीही चांगलं.” अवनी तिचं म्हणणं समुपदेशकांना सांगत होती. तिचं वक्तव्य ऐकून रवीही शांत बसला नाही. “ती म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण मलाही हिच्यासोबत आयुष्य काढणं अशक्य आहे. पण फसवणूक तिची नाही, माझी झाली आहे. आमची मुलगी अतिशय शांत, सर्वांना सामावून घेणारी, नाती सांभाळणारी आहे, असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं, पण त्यातील एकही गुण मला लग्न झाल्यानंतर दिसलेला नाही. थोडं मनाविरुद्ध झालं की ही लगेच माहेरी जाणार आणि महिनाभर तिथंच राहणार. साध्या साध्या गोष्टीही तिला जमत नाहीत. घरात गौरी-गणपती असताना तिची मासिकपाळी सुरू झाली. तेव्हा आईने तिला स्वयंपाकघरात येऊ नकोस, असं म्हटलं म्हणजे माझी आई मागासलेल्या विचारांची आहे, असं म्हणणं योग्य आहे का? नवीन लग्न झाल्यावर आपल्या घरातील कार्यक्रमांना महत्त्व द्यायचं की मित्रांच्या पार्टीला प्राधान्य द्यायचं हे तिला समजत नाही आणि आम्ही तिच्या म्हणण्यानुसार बदलायला हवं असा तिचा हट्ट आहे आणि हे शक्य होणार नाही. खरंच वेगळं झालेलंच चांगलं.” रवीनं त्याची बाजूही मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : भारतीय स्टार्टअप : सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान पटकावणारी दिव्या गोकुळनाथ आहे तरी कोण?

“मॅडम, जर जवळच्या मित्राचं लग्न असेल, त्याची पार्टी असेल आणि ती खूप आधीपासून ठरली असेल तर जाणं महत्त्वाचं नाही का? त्याच दिवशी सासूबाईंनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला तर मी काय करणार? हळदीकुंकू दुसऱ्या दिवशीही करता आलं नसतं का? पण त्यांनी एकट्यानेच त्या दिवशी केलं आणि काय दिसलं, तर घरच्या कार्यक्रमात सून नाही. त्याची आई जसं म्हणते तसंच हाही वागतो. त्यांच्यात बदल होणार नाही.”

आणखी वाचा : गच्चीवरची बाग कशी कराल?

दोघेही एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीतच होते. समुपदेशकांशी बोलताना, मी कसा योग्य आहे आणि माझा जोडीदार कसा चुकीचा हे सांगण्याचा प्रयत्न करीत होते. रवी आणि अवनी यांचं लग्न होऊन जेमतेम पाच महिने झाले होते. त्यांचं लग्न नियोजित पद्धतीनं अगदी कांदेपोह्यांचा कार्यक्रम होऊन, दोन्ही नातेवाईकांनी एकमेकांची चौकशी करून झालं होतं. त्यांच्या लग्नाचा कोर्टशिप पीरियड जवळजवळ एक वर्षांचा होता. खरं तर या कालावधीत दोघेही एकमेकांना भेटत होते, फोनवर सतत चॅटिंगही चालू होतं, मग या कालावधीत एकमेकांच्या स्वभावाची ओळख पटलीच नसेल का? कुटुंबातील रीतिरिवाज, पद्धती याबाबत ते दोघांशी बोललेच नसतील का? लग्नाआधी केव्हा एकदा एकमेकांसोबत राहता येईल याची ओढ असणारे, अगदी एक एक दिवस मोजणारे दोघे अगदी पाच महिन्यांत एकमेकांना कंटाळले? एकमेकांना समजावून घेणं इतकं अवघड का जातंय?

आणखी वाचा : Happy Birthday Barbie: बार्बी म्हणते, अवघे ६३ वयोमान; अमेरिकन बार्बी होती ‘मेड इन जपान’!

समुपदेशकांनी दोघांच्या बाजू समजावून घेतल्या आणि दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. “रवी आणि अवनी अरे, तुमच्या लग्नाला आत्ता कुठे पाच महिने पूर्ण होत आहेत, आणि तुम्ही विभक्त होण्याचा विचार करत आहात. एकमेकांना समजावून घ्यायला तुम्ही पुरेसा वेळ तरी कुठं दिलाय? तुम्ही दोघंही वेगवेगळ्या वातावरणात आणि संस्कारात वाढलेले आहात, त्यामुळे एकमेकांच्या वागण्याच्या पद्धती वेगळ्या असणारच आहेत, त्याची सवय व्हायला थोडा वेळ तर द्या. सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा होणार नाहीत याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा नवीन नोकरी मिळते तेव्हा तुम्हाला काही ठरावीक कालावधीचा प्रोबेशन पीरियड असतो, तो तुम्ही समाधानकारक पूर्ण केला तर तुमची नोकरी पक्की होते. यासाठी तुम्हाला तुमच्या क्षमतांचा कस लावावा लागतो. कौशल्यपूर्ण रीतीने आपला परफॉर्मन्स सिद्ध करावा लागतो. किती गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, तेव्हा नोकरी सोडण्याचा विचार न करता आपण कामामध्ये कुठं कमी पडतो?अजून काय केलं पाहिजे? याचं आत्मपरीक्षण करतो आणि अधिक चांगलं काम करून नोकरीत कन्फर्म होण्याचा प्रयत्न करतो. लग्न टिकवण्यासाठीसुद्धा पहिल्या १ ते २ वर्षांचा प्रोबेशन पीरियड पूर्ण करावा लागतो. कारण याच कालावधीत गैरसमज, मतभेद अधिक होतात. नवीन गोष्टींचा स्वीकार करण्यास त्रास होतो, पण लग्न टिकवायचं असेल, तर स्वतःला येथेही सिद्ध करायला हवं, संयम ठेवायला हवा. एकमेकांच्या वेगळ्या जीवनशैलीचा समतोल साधायला हवा. म्हणूनच लग्न ठरल्यानंतर एकमेकांशी फक्त लग्नाचा इव्हेंट आणि प्रेमाच्या गप्पा मारण्याबरोबर आमच्या घरच्या पद्धती, संस्कार कोणते आहेत, दोघांना एकमेकांसोबत राहताना कोणते बदल करावे लागतील याबाबत चर्चा करणं, अपेक्षा व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. याबाबतची मानसिक तयारी झाली, की मग लग्नानंतर मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींचा बाऊ न करता तडजोड करणं शक्य होतं आणि लग्नाचा प्रोबेशन पीरियड समाधानकारकरीत्या पूर्ण होतो. लोणचं मुरायला वेळ लागतोच ना. त्यानंतरच त्याची चव वाढते, तसंच लग्न मुरायलाही वेळ द्यायला हवा. रागाच्या भरात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, अजूनही विचार करा, तुमच्यातील वाद हे किरकोळ स्वरूपाचे आहेत, पण गांभीर्याने आणि शांतपणे विचार केला तर ते तुम्हीच संपवू शकता.” समुपदेशकांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर दोघांनाही काही गोष्टी पटल्या. दोघांनीही आत्मपरीक्षण केलं आणि आपला प्रोबेशन पीरियड पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Probation period for marriage counseling in laws relationship how to handle vp

Next Story
गच्चीवरची बाग : बाग कोणासाठी आणि कशी?