भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
प्रोजेस्टेरॉन याला नैसर्गिक ‘प्रोजेस्टोजेन’ म्हणतात, हे संप्रेरक ल्युटेनायझिंग हार्मोनला प्रतिसाद म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये तयार केलं जातं. स्त्रियांमध्ये कॉर्पस ल्युशियममध्ये आणि नाळ, वार आणि मासिक पाळीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तयार होतं आणि पुरुषांमध्ये वृषणाद्वारे तयार होतं. प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकासारखेच जैविक कार्य करणाऱ्या संयुगांना वैद्यकीय भाषेत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्यांना प्रोजेस्टिन्स, प्रोजेस्टेशनल एजंट्स, प्रोजेस्टॅजेन्स, प्रोजेस्टोजेन्स, जेस्टॅजेन्स किंवा जेस्टोजेन्स असे म्हणतात. या प्रोजेस्टिन्समध्ये निसर्गात आपोआप तयार होणारे प्रोजेस्टेरॉन संप्रेरक आणि १७α-ॲसिटॉक्सीप्रोजेस्टेरॉनचे उपप्रकार सामावलेले आहेत. प्रेग्नेन श्रेणी, १९-नॉरटेस्टोस्टेरॉनचे उपप्रकार (इस्ट्रेन्स), आणि गोनेन श्रेणीतील नॉरजेस्ट्रेल आणि त्याशी संबंधित संयुगे समाविष्ट आहेत. मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन ॲसिटेट आणि मेजेस्ट्रॉल ॲसिटेट हे सी-२१ प्रकारचे स्टिरॉइड्स आहेत, ज्यांचे कार्य अगदी प्रोजेस्टेरॉन संप्रेरकासारखेच असते. जेव्हा शरीरावर ठरावीक आणि निवडक परिणाम घडवून आणायचा असतो, तेव्हा मेनोपॉजच्या (मासिकपाळी बंद होण्याच्या काळातील) संप्रेरक उपचारांमध्ये इस्ट्रोजेनबरोबर, मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन ॲसिटेट आणि तोंडाने घ्यायचे मायक्रोनाइज्ड प्रोजेस्टेरॉन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तसेच, मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन ॲसिटेटचे रूप हे दीर्घकाळ टिकणारे आणि इंजेक्शनने दिले जाणारे गर्भनिरोधक म्हणून वापरले जाते.

१९- नॉरटेस्टोस्टेरॉनचे उपप्रकार हे प्रामुख्याने तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये प्रोजेस्टिन म्हणून वापरण्यासाठी विकसित केले गेले होते. त्यांचे मुख्य काम प्रोजेस्टेशनल (गर्भधारणेला पूरक) असले, तरी त्यांच्यामध्ये अँड्रोजेनिक (पुरुष संप्रेरकासारखे) आणि इतर गुणधर्मही दिसून येतात. गोनेन्स (gonanes) ही अधिक अलीकडे विकसित झालेली ‘१९-नॉर’ संयुगांची श्रेणी आहे. यामध्ये १३ व्या स्थानावर मिथाईलऐवजी इथाईल घटक असतो, ज्यामुळे त्यांचे अँड्रोजेनिक (पुरुष संप्रेरकासारखे) दुष्परिणाम कमी होतात. ‘१९-नॉरटेस्टोस्टेरॉन’ उपप्रकाराचे हे दोन वर्ग सर्व प्रकारच्या तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये आणि काही अधिक काळ टिकणाऱ्या इंजेक्शन स्वरूपातील गर्भनिरोधकांमध्ये मुख्य घटक म्हणून वापरले जातात.

शारीरिक आणि औषधशास्त्रीय कार्य : चेतापेशी-अंतःस्रावी कार्ये- मासिकपाळीच्या ‘ल्युटीअल टप्प्यात’ तयार होणारे प्रोजेस्टेरॉन शरीरावर अनेक परिणाम घडवून आणते. यामध्ये GnRH पल्सची वारंवारता कमी करणे हे याचे मुख्य काम आहे. प्रोजेस्टिनयुक्त गर्भनिरोधके शरीरात नेमके याच पद्धतीने काम करतात.

प्रजनन / पुनरुत्पादन संस्था : प्रोजेस्टेरॉन हे इस्ट्रोजेनमुळे वाढणाऱ्या गर्भाशयाच्या आतील अस्तराची वाढ कमी करते आणि त्या अस्तराला स्राव निर्माण करणाऱ्या स्थितीत बदलते. मासिकपाळीच्या शेवटी शरीरातील प्रोजेस्टेरॉनची पातळी अचानक कमी होणे, हेच मासिकपाळी सुरू होण्याचे मुख्य कारण असते.

जर मासिकपाळीचा ‘ल्युटीअल टप्पा’ कृत्रिमरित्या वाढवला, म्हणजे ल्युटीअलचे कार्य टिकवून ठेवून किंवा प्रोजेस्टेरॉनचे उपचार देऊन, गर्भाशयाच्या अस्तरामध्ये गरोदरपणात सुरुवातीला दिसतात तसे बदल घडवून आणता येतात. सामान्य परिस्थितीत, गर्भाशयाच्या अस्तरावर कार्य करताना इस्ट्रोजेन हे प्रोजेस्टेरॉनच्या आधी आणि बरोबर दोन्ही वेळा उपलब्ध असते आणि सामान्य मासिकपाळीचे चक्र सुरळीत चालण्यासाठी ते अत्यंत आवश्यक असते. प्रोजेस्टेरॉन हे गर्भाशयाच्या मुखातील ग्रंथींवरदेखील परिणाम करते. इस्ट्रोजेनमुळे तयार होणारा भरपूर आणि पाण्यासारखा पातळ स्राव, प्रोजेस्टेरॉनमुळे कमी आणि घट्ट/ चिकट बनतो. प्रोजेस्टिन्सच्या या आणि इतर परिणामांमुळे शुक्राणूंचा गर्भाशयाच्या मुखातून आत जाण्याचा वेग किंवा प्रवेश कमी होतो.

इस्ट्रोजेनमुळे योनीच्या अस्तराची जी वाढ किंवा परिपक्व होते, त्यामध्ये प्रोजेस्टेरॉनमुळे बदल घडून येतो आणि हे अस्तर गरोदरपणासारख्या स्थितीकडे झुकते. हा बदल योनीच्या स्मिअर चाचणीतील पेशींच्या रचनेतील बदलांवरून ओळखता येतो. जर शरीरात कार्य करणाऱ्या इस्ट्रोजेनचे प्रमाण पुरेसे आहे हे माहीत असेल. किंवा बाहेरून इस्ट्रोजेन देऊन ते निश्चित केले गेले असेल तर प्रोजेस्टिनला पेशींकडून मिळणाऱ्या या प्रतिसादाचा वापर करून त्या प्रोजेस्टिनची कार्यक्षमता तपासली जाते.

गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन अत्यंत महत्त्वाचे असते. प्रोजेस्टेरॉन मासिक पाळी थांबवते आणि गर्भाशयाचे आकुंचन रोखते, पण त्याचे इतर परिणामही गरोदरपणात महत्त्वाचे असतात. गर्भधारणा टिकवून ठेवण्याच्या याच गुणधर्मांमुळे, पूर्वीच्या काळी गर्भपाताला आळा घालण्यासाठी प्रोजेस्टिन्सचा ऐतिहासिक वापर केला जायचा. तरीही, या उपचारांचा कितपत फायदा होतो याबद्दल शंका आहे, कारण निसर्गतः होणारा गर्भपात हा केवळ प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी झाल्यामुळे होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण, एका अलीकडील अहवालानुसार, ज्या गरोदर मातांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीचा जास्त धोका होता, त्यांना दर आठवड्याला १७-हायड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉनचे स्नायूमध्ये इंजेक्शन दिल्यास हा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, या वापराचे पुनर्संशोधन केले जात आहे.

स्तन ग्रंथी : स्तन ग्रंथींच्या विकासासाठी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांची आवश्यकता असते. गरोदरपणात आणि मासिकपाळीच्या ‘ल्युटीअल टप्प्यात’ थोड्या प्रमाणावर, प्रोजेस्टेरॉन हे इस्ट्रोजेनबरोबर मिळून स्तन ग्रंथींमधील दूध तयार करणाऱ्या लहान ग्रंथींची वाढ घडवून आणते.

गरोदरपणाच्या शेवटी, या ग्रंथी दूध तयार होण्यापूर्वीच्या द्रवाने भरतात आणि स्तन ग्रंथींमधील रक्तवाहिन्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. त्यानंतर, मूल जन्माला आल्यावर जेव्हा शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी अचानक कमी होते, त्यानंतरच खऱ्या अर्थाने अंगावर दूध येण्यास सुरुवात होते. हा सारा संप्रेरकांचा खेळ आहे आणि निसर्गाचा चमत्कार आहे.

सामान्य मासिकपाळीच्या दरम्यान, स्तनाच्या अस्तराच्या पेशींमधील विभाजनाची प्रक्रिया पाळीच्या पहिल्या भागात म्हणजेच ‘फॉलिक्युलर टप्प्यात’ अत्यंत कमी असते आणि नंतर ‘ल्युटीअल टप्प्यात’ ती सर्वोच्च पातळीवर पोहोचते. हा बदल प्रोजेस्टेरॉनमुळे होतो, ते स्तनाच्या अस्तरातील पेशी विभाजनाला गती देते. तरी हा परिणाम तात्पुरता असतो आणि या संप्रेरकाचा सतत संपर्क राहिल्यास पेशींची वाढ वेगाने थांबते. मेनोपॉज (मासिकपाळी बंद) झालेल्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन-प्रोजेस्टिनच्या एकत्र वापरामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा जो धोका वाढतो, त्यासाठी प्रोजेस्टेरॉन कारणीभूत असू शकते.

मज्जासंस्थेवरील परिणाम : सामान्य मासिकपाळीच्या दरम्यान, पाळीच्या मध्यात शरीराच्या मूळ तापमानात सुमारे ०.६° सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येते; या वाढीचा थेट संबंध स्त्री-बीज बाहेर पडण्याशी असतो. शरीराच्या तापमानातील ही वाढ प्रोजेस्टेरॉनमुळे होते, पण ही प्रक्रिया नेमकी कशी घडते हे अजून पूर्णपणे माहीत नाही. तसेच, प्रोजेस्टेरॉन हे श्वसन केंद्राची कार्बन डायऑक्साइडला मिळणारी प्रतिसाद क्षमता वाढवते. ज्यामुळे मासिकपाळीच्या ‘ल्युटीअल टप्प्यात’ आणि गरोदरपणात धमन्या व फुफ्फुसांमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होते. प्रोजेस्टेरॉन मज्जासंस्थेला शांत करणारे आणि झोप आणणारे कार्यदेखील करू शकते. हे संप्रेरक घेतल्यानंतर काहींना जो सुस्ती किंवा डुलकी आल्यासारखे जाणवते, त्यामागे हेच कारण असू शकते. हा संभाव्य त्रास टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रोजेस्टेरॉनची औषधे रात्री झोपताना दिली जातात, ज्यामुळे काही रुग्णांना उलट चांगली झोप येण्यास मदत होते.
(लेखिका औषधनिर्माण शास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक आहेत).
Bhagyashri1@zohomail.in