‘आई म्हणजे ममतेचा सागर…’ हे सुख काही चिमुकल्या ‘पंच’च्या वाट्याला आलं नाही. जन्मतःच त्याच्या आईनं झिडकारलं… शास्त्रज्ञांच्या मते, ही अशी लाखात एक केस. पण जन्मतःच अनाथ झालेलं हे बाळ आता सहा महिन्यांचं होऊन अवघ्या जगाच्या कौतुकाचा, प्रेमाचा विषय झालं आहे. समाजमाध्यमं रकानेच्या रकाने भरून पंचच्या बाललीलांचं कौतुक करताहेत. त्याच्या व्हिडीओंना लाखोंनी लाइक्स मिळताहेत. रोज उठल्यावर आज पंच काय करतोय, हे फॉलो केलं जातंय. जपानमधली चिमुरडी ‘पंच’ला बघायला जायचं म्हणून आईवडिलांकडे हट्ट धरताहेत. आणि एवढंच नाही तर त्याच्यामुळे एका ब्रँडची खेळणी अचानक मोठ्या संख्येनं विकली जात आहेत…

थोडक्यात सांगायचं तर, सहा महिन्यांच्या या बाळानं सगळ्या जगाला त्याच्या निरागसतनं मोहीत केलं आहे. पण हे कुणा माणसाचं बाळ नाही, तर ते आहे मॅक्कॉक जातीच्या माकडाचं पिल्लू. जपानमधल्या इचिगावा या प्राणीसंग्रहालयात ते २६ जुलै २०२५ रोजी जन्माला आलं. या बाळाबद्दल का कोण जाणे त्याच्या आईला अजिबात पान्हा फुटला नाही. तिनं त्याला स्वीकारलंच नाही. जन्मदात्रीच स्वीकारत नाही, ही कोणत्याही बाळासाठी किती करुण गोष्ट. त्यामुळे त्या तान्ह्या बाळाची आबाळ होतेय, हे बघितल्यावर प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनीच पंचची देखभाल करायला सुरुवात केली. त्यातल्या एका कर्मचाऱ्यावर तर पंचचा जीवच जडला.

पण पंचला असं कायम सांभाळणं शक्य नव्हतं. त्याला कधी न कधी माकडांच्या समूहात सोडणं आवश्यक होतं. इचिगावा संग्रहालयात बाकीची माकडं ओरँगउटान जातीची. ती काही केल्या या मकाव जातीच्या पंचला स्वीकारेनात. आणि त्यांची आपल्या आईला बिलगणारी, तिच्या कुशीत शिरणारी इतर पिल्लं पाहून पंच आणखीनच कावरा बावरा व्हायला लागला. त्याची नरज आपल्या आईला शोधतेय हे त्याच्या डोळ्यात दिसे. त्यात इतर मोठी माकडं त्याच्यावर हल्ला करायला लागली. म्हणजे एकीकडे आई नसल्याचं दुःख आणि दुसरीकडे जगण्यासाठी संघर्ष…

पण सहा महिन्यांचा चिमुरडा पंच ही लढाई निकरानं लढत होता. त्या लढाईत मनानं जखमी होत होता, पण पठ्ठ्या अजिबात हार मानत नव्हता. हे सगळ बघणाऱ्या त्या प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी एक शक्कल लढवली. माकडाचा एक मोठा टेडी पंचच्या आसपास ठेवून दिला. आणि काय आश्चर्य? पंचला त्या मखमली टेडीचा फक्त स्पर्शच आवडला असं नाही, तर त्याला त्या टेडीमध्ये त्याची आईच दिसली. तो त्या टेडीरूपी आईला बिलगून झोपायला लागला. तिचे पापे घेऊन तिचे लाड करायला लागला. एवढंच नाही तर कुणी एखाद्या हुप्प्यानं मारामारी केली, हाकललं तर त्या टेडीजवळ येऊन त्याच्या कुशीत विसावू लागला. आईचं प्रेम मिळवण्याची त्याची ही तगमग एकीकडे सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. तर दुसरीकडे त्याचं ते निष्पापपण मोहवणार ठरलं.

ते सहा महिन्यांचं एवढंसं माकडू तो एवढा मोठा टेडी घेऊन आपल्याला हवं तिथे ओढत घेऊन जातानाचं दृश्य मोठं विलोभनीय आणि तितकंच करुण आहे. लहान बाळं आईशी करतात तशी दंगामस्तीही पंच त्या टेडीबरोबर करतो तेव्हा ते बघणं फार गंमतीशीर आहे. त्याचे हे व्हिडिओ समाजमाध्यमांवर यायला सुरुवात झाली तसा चिमुरडा पंच सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. तो टेडी ज्या कंपनीचा आहे, त्या कंपनीचे टेडी घेऊन लोकांना ते पंचला द्यायचे आहेत. अनेकाना पंचला दत्तक घ्यायचं आहे. रोज तसे अनेक फोन प्राणी संग्रहालयाला येत आहेत.

जगण्याचा संघर्ष, स्पर्शाची ओढ, कुतूहल, बालसुलभ उत्सुकता, निरागसता यांचं मनोहर दर्शन घडवणाऱ्या पंचच्या लीला खरोखरच गंमतीशीर आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी सगळ्या माकडांना खायला घालायला येतात तेव्हा एका विशिष्ट कर्मचाऱ्याच्या अंगावर टुणकन् उडी मारून बसणारा आणि त्याला अजिबात न सोडणारा पंच… त्याच्याकडचा टेडी बळकावायला आलेल्या हुप्प्यांना हुसकावून लावणारा पंच… आपल्या वयाच्या पिल्लांशी दोस्ती करू पाहणारा पंच… लाकडाची काटकी मिळवून टेडी इतकीच प्राणपणानं ती जपणारा पंच… त्या टेडीचा हात हातात घेऊन आपल्याच पाठीवरून फिरवणारा पंच… हे सगळं फार फार लोभस आहे.

संघर्ष, एकाकीपणावरची मात आणि आशावाद यांचं प्रतीक असलेल्या पंचची कहाणी म्हणूनच सगळ्या जगाला भुरळ घालते आहे. त्याला त्याच्या आईनं झिडकारलं असलं तरी आता तो सगळ्या जगाचा झाला आहे.