दोन भावंडे, वयात काही वर्षांचेच अंतर… दोघेही एकाच खेळातील खेळाडू, दोघेही विविध किताबांचे मानकरी, पण एकाची अगदी लहान वयापासूनच चर्चा, तर दुसरीचा मात्र नाव कमावण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष… अशीच काहीशी ही काहणी… भारताचे ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. वैशाली आणि आर. प्रज्ञानंद यांची.

अकरावीची परीक्षा सुरू असताना एका ‘ऑनलाइन’ स्पर्धेत प्रज्ञानंदने ख्यातनाम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला आणि तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने दर्जेदार कामगिरी सुरू ठेवत बुद्धिबळविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्याच वेळी त्याची थोरली बहीण वैशालीही सातत्याने बुद्धिबळाच्या पटावर आपली जादू दाखवत होती. मात्र, तिच्या नावाला कधीही म्हणावे तसे ‘वलय’ आले नाही.

‘‘वैशालीचे प्रज्ञानंदवर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या कामगिरीतून तिलाही प्रेरणा मिळते. मात्र, काही वेळा ती निराश होते. मीसुद्धा चांगली कामगिरी करत आहे, मग माझी चर्चा का होत नाही, असा तिला प्रश्न पडतो,’’ असं या दोघांच्या प्रशिक्षकांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं.

अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत वैशालीच्या मुलाखती वाचल्यास, त्यात तिला तिच्याविषयी कमी आणि प्रज्ञानंदविषयी अधिक प्रश्न विचारले जात असल्याचं स्पष्ट होतं. गेली अनेक वर्षे बहुतांश भारतीयांसाठी तिची ओळख प्रज्ञानंदची बहीण अशीच होती. आपल्या लाडक्या भावाच्या छायेतून बाहेर येण्यासाठी वैशालीला काही तरी खास करावं लागणार होतं आणि तिनं ते केलं.

नुकत्याच सायप्रस येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत जेतेपद पटकावत २४ वर्षीय वैशालीने इतिहास घडवला. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. त्यामुळे आता तिने महिलांतील बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी चीनच्या जू वेन्जूला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे. भारताची सर्वोत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यापूर्वी २०११ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळली होती. मात्र, त्यावेळी आव्हानवीर ठरवण्यासाठी ‘कँडिडेट्स’ स्पर्धा खेळवली जात नसे. यंदा वैशालीला मात्र अन्य सात गुणवान बुद्धिबळपटू आणि १४ फेऱ्यांच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेच्या आव्हानाला सामोरं जावं लागलं.

या स्पर्धेतील सर्वांत कमी रेटिंग असलेली खेळाडू म्हणून वैशालीला जेतेपदासाठी दावेदार मानलं जात नव्हतं. स्पर्धेतील पहिल्या पाच फेऱ्यांनंतर ती दिव्या देशमुख आणि टॅन झोंगयी यांच्यासह शेवटच्या स्थानावर होती. मात्र, त्यानंतर तिनं दिमाखात पुनरागमन करत थेट अव्वल स्थान गाठलं. जे तिच्या खेळाचा वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत, त्यांना तिच्या या यशाचं किंवा पिछाडीनंतर तिनं ज्या प्रकारे मुसंडी मारली, त्याचं जराही आश्चर्य वाटलं नाही. तिच्यातील हे गुण अगदी लहानपणापासूनच स्पष्टपणे दिसून येत होते.

वैशालीबद्दल एक गुण सतत ठळकपणे दिसतो तो म्हणजे तिची कमालीची एकाग्रता. चेन्नईतील ज्या अकादमीत तिनं बुद्धिबळाचे धडे गिरवले, तेथील प्रशिक्षकही तिच्याबद्दल ही आठवण सांगतात. इतर मुले जिथे चंचल असतात, तिथे वैशाली अगदी शांत असते, जणू एखादी लहान संन्यासी. पाच तासांहून अधिक वेळ ती एकाग्रतेनं खेळू शकत होती. त्या वयात हे अत्यंत दुर्मिळ आहे, असं ते सांगतात.

तिची ही एकाग्रता, संयम अजूनही कायम आहे. मात्र, बुद्धिबळाच्या पटासमोर ती शांतपणे विचार करत बसलेली असली, तरी पटावर जेव्हा ती चाल रचते, त्यात वेगळीच आक्रमकता असते. विलक्षण आकलनक्षमता, प्रतिस्पर्ध्याचा बारीक अभ्यास आणि सापळे रचण्याची हुशारी, हे गुण वैशालीला आघाडीची बुद्धिबळपटू बनवतात. त्याहीपेक्षा तिच्या हार न मानण्याच्या वृत्तीचं विशेष कौतुक केलं जातं.

दोन वर्षांपूर्वी एका स्पर्धेदरम्यान वैशालीला अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे तिला दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मात्र, याकडे तिनं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं. मानसिकदृष्ट्या ताजंतवानं झाल्यानं आपल्याला अधिक चांगला खेळ करता येऊ शकेल असा तिनं विचार केला आणि तेच झालं. ती २०२४ मध्ये कारकीर्दीत प्रथमच ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरली. त्यात पहिल्या नऊ फेऱ्यांमध्ये फारसं यश न मिळाल्यानंतरही निराश न होता, तिनं अखेरच्या पाच डावांत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत थेट दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली.

यंदाच्या स्पर्धेतही पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये तिला एकही विजय मिळवता आला नव्हता. परंतु नंतर तिनं नऊपैकी पाच लढती जिंकत आणि तीन लढती बरोबरीत सोडवत जेतेपद पटकावलं. यावेळी पूर्वीपेक्षा ती अधिक परिपक्व दिसून आली. तसंच तिचा भाऊ प्रज्ञानंद खुल्या विभागात आव्हान उपस्थित करत होता. त्याला फारसं यश मिळवता आलं नाही, पण त्यानं बहिणीला प्रोत्साहन दिलं. तसंच त्यांची आईही त्यांच्या बरोबर होती. त्यामुळे वैशालीला मोठा आधार मिळाला.

वैशाली आता फक्त प्रज्ञानंदची बहीण नाही, तर जगज्जेतेपदाच्या दारात उभी असलेली भारताची नवी आशा आहे. २०१८ सालापासून जगज्जेतेपद राखून असलेल्या जू वेन्जूनला पराभूत करत आणखी एक इतिहास रचण्याची तिच्याकडे संधी आहे. पुरुषांमधील भारताचा पहिला जगज्जेता विश्वनाथन आनंद याची ती शिष्या. तर दुसरा जगज्जेता गुकेश याच्यासह ती आनंदच्या अकादमीची विद्यार्थी. त्यामुळे आता गुकेशप्रमाणे वैशालीसुद्धा आनंदला जगज्जेतेपदाची ‘गुरुदक्षिणा’ देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जाताजाता असंच म्हणावं लागेल की, वैशालीचा संघर्ष अखेर फळाला आला.