चॉइस तर आपलाच: अबोल्याची शिक्षा?

नाती म्हटली की वाद, नाराजी, एकमेकांना दुखवणं वा दुखावलं जाणं हे पॅकज डीलच असतं. चिडलेल्या, रागावलेल्या किंवा दुखावलेल्या अवस्थेत एकदा कमी जास्त शब्द तोंडून निघतो आणि तो नेमका समोरच्याच्या वर्मी बसतो. बोलणाऱ्याच्या ते लक्षात येतं. आपण बोलायला नको होतं, असंही वाटतं. काही वेळा सॉरी म्हटलंही जातं. पण अनेकदा ते दुखावलं जाणं इतकं जिव्हारी लागतं की तो सॉरी पोहोचतच नाही आणि दोघांमध्ये अबोला सुरु होतो. पण काही वेळा ताणलाही जातो. आणि मग हा अबोला कोणी, कधी संपवायचा हा प्रश्न निर्माण होतो… ही अबोल्याची शिक्षा का कमी करायला हवी?

chatura
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक फोटो)

नीलिमा किराणे

“या वीकएंडला मी तुमच्याकडे येतेय. धम्माल करू.” निहारिकानं ऋग्वेदी-प्रियाला ग्रुपवर मेसेज पाठवला. तिघी शाळेपासूनच्या जीवलग मैत्रिणी. निहारिकाचा जॉब फिरतीचा आणि ऋग्वेदी-प्रिया एका शहरात जॉब मिळाल्याने फ्लॅट घेऊन एकत्र राहात होत्या. ठरल्याप्रमाणे निहारिका उत्साहाने आली खरी, पण काहीतरी धुमसतंय हे तिला लगेच जाणवलं. दोघीही तिच्याशी चांगल्या बोलत होत्या, पण नेहमीसारखी भट्टी जमत नव्हती.

“काय बिनसलंय?” असं निहारिकानं विचारल्यावर समजलं, की हा अबोला बरेच दिवस चालू होता. क्षुल्लक कारणाने चिडचिड झाली, मग वादावादी, रागाच्या भरात ऋग्वेदीने प्रियाला जोरदार सुनावलं. त्याने दुखावून, अपमानित वाटून प्रियाने ऋग्वेदीशी बोलणंच थांबवलं. रागाचा भर ओसरल्यावर, आपण भलतंच बोलून प्रियाला विनाकारण दुखावलंय याचं भान ऋग्वेदीला आलं. वाईटही वाटलं. ती मनापासून प्रियाला ‘सॉरी’ म्हणाली, पण तिला झिडकारून एक शब्दही न बोलता प्रिया तिच्या कामाला लागली. आपली चूक झालीय हे जाणवल्यामुळे ऋग्वेदीनं तिच्या खूप मागेमागे केलं, प्रियाच्या वाटणीची कामंही करून टाकली, तरी तिचा राग, ताठा, अबोला संपला नाही. अखेरीस कंटाळून ऋग्वेदीनंही बोलणं बंद केलं. तेव्हापासून अबोला मागच्या दिवसावरून पुढे चालू होता.

आणखी वाचा- नातेसंबंध : लोभी माणसं वेळीच ओळखायला हवीत!

“ऋग्वेदी असं बोलली हे मला अजूनही झेपत नाहीये, डायजेस्ट होतच नाहीये. इच्छाच होत नाहीये बोलण्याची.” प्रिया म्हणाली. “संतापल्यावर मी काय बोलते ते नाही कळत निहा मला, पण लक्षात आल्यावर लगेच ‘सॉरी’ म्हणाले मी. तिला दुखावण्याचा हेतू नव्हता. पण पुन्हापुन्हा सॉरी आणि तिच्या मागेमागे करूनही ती न बोलता जे हाडूत तुडूत करते ना मला, संताप होतो.” ऋग्वेदीने बाजू मांडली. “किती दिवस झाले तुमच्या ‘कट्टी’ला?”
“दहा-बारा दिवस.”

“मग आणखी किती दिवस चालू ठेवायचंय हे तुम्हाला? तुमचं दुसरीत असल्यासारखं कट्टी कट्टी खेळणं आणि मूडस् असेच राहणार असतील तर मी आपली जाते परत.” निहारिका म्हणाली.

“तू जाऊ नको, पण ऋग्वेदीनं असं बोलायची गरज होती का?”
“अगं, पण ती सॉरी म्हणाली ना लगेच?” निहारिकानं विचारलं.

“मला नाही असं लगेच विसरता येत.”

“बारा दिवस कमी झाले का विसरायला? अबोल्याचे दोन प्रकार असतात प्रिया. एक गरजेतून येतो आणि दुसरा बदल्याच्या भावनेतून येतो. समजा आपल्याला काहीतरी हर्ट झालंय, अनपेक्षित धक्का बसलाय. तो पचवण्यासाठी जरा वेळ शांत बसावंसं वाटणं स्वाभाविक आहे. ‘घडलेलं प्रोसेस करायला थोडा वेळ हवाय.’ या गरजेतून तो अबोला असतो. पण जेव्हा तुम्ही अबोला मर्यादेपेक्षा ताणता, तेव्हा बदल्याची भावना जागी झालेली असते. ‘मला दुखावलंस ना? थांब तुला दाखवते.’ असं अबोल्यातून तुम्ही सांगत असता. ते जाणवल्यावर समोरची व्यक्ती पण इगोवर जाते.

“तूच सांग प्रिया, ऋग्वेदीनं आणखी किती वेळा तुला मनवायला हवं होतं? सॉरी म्हटल्यानंतरही जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यावर शिक्षा केल्याचा फील येतो. इतके दिवस मला शिक्षा करणारी ही कोण? असं वाटून ऋग्वेदीही इगोवर गेली. त्यानंतर मैत्रीचा विचार संपलाच. फक्त इगो लढतायत दोघींचे. बरं, इगो कुरवाळल्यामुळे एकीने तरी खूश असावं, तेही नाही. प्रत्येक मिनिटाला तुमच्या मनातला ताण कळतोय मला. आपण दुसरीत आहोत का आता कट्टी करायला?”

प्रिया-ऋग्वेदी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

“तर, फ्रेंडस, आपण दुसरीत आहोत की पुढे गेलोत ते आधी ठरवा. मैत्री महत्त्वाची की इगो हेही एकदा ठरवा. मैत्रिणीला शिक्षा द्यायचीय, की समजून घ्यायचंय, हा चॉइस तुमचाच आहे. तुमचं दुखावणं-रागावणं मान्य केलं तरी त्याला किती दिवस फुटेज द्यायचं हे ठरवण्याचा ‘चॉइस तुमचा आहे’ आणि मी लगेचची गाडी पकडायची की उद्या संध्याकाळपर्यंत थांबायचं हा चॉइसही तुमचाच आहे.” निहारिका म्हणाली.
प्रिया-ऋग्वेदीने एक शब्दही न बोलता एकमेकींचे हात घट्ट धरले होते.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:08 IST
Next Story
नातेसंबंध : लोभी माणसं वेळीच ओळखायला हवीत!
Exit mobile version