नीलिमा किराणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाला कुत्र्यांची प्रचंड भीती वाटायची. कुत्र्यानं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी तिला घाम फुटायचा, घशाला कोरड, हातपायाला थरथर आणि चेहऱ्यावर विलक्षण भीती. या फोबियाला कारणही तसंच होतं. ती लहान असताना एकदा तिला कुत्रं चावलं होतं. रडारड, मलमपट्टी तर झालीच, पण कुत्रं पिसाळलेलं तर नव्हतं ना? याबद्दल घरचे चिंतेत, पुढे लांब सुईची चौदा इंजेक्शनं. पहिल्या एक-दोन इंजेक्शनच्या वेळी बाबा सोबत आले होते, पण डॉक्टरकाका ओळखीचे असल्यामुळे, शाळा सुटल्यावर येता येता दवाखान्यात थांबून इंजेक्शन घेऊन यायचं ठरलं. त्या भीतीने सकाळपासूनच वर्गात दुर्लक्ष व्हायचं, ओरडा बसायचा. संध्याकाळी पोटात भूक असायची, भरीला दवाखान्याला ॲम्ब्युलन्सचा सायरन, सिरियस पेशंट, डॉक्टरांची धावपळ पाहून अनावर भीती. मैत्रीण सोबत असेल तर ठीक, नाहीतर खूप एकटं वाटायचं.

आणखी वाचा : विश्लेषण: सॅनिटरी पॅड, टॅम्पॉनस किंवा पिरियड कपने होऊ शकतो कॅन्सर? दाव्यामध्ये कितपत तथ्य? काय काळजी घ्यायला हवी?

कुत्र्याशी जोडलेल्या त्या सगळ्या त्रासदायक आठवणी इतक्या पक्क्या होत्या, की आज तिशीतही तिच्या मनातली कुत्र्याची भीती, दडपण, अस्वस्थता तशीच होती. आपण जीवाच्या आकांताने पळतोय आणि कुत्र्याने जबड्यात पाय कचकन पकडलाय, अशी स्वप्न तिला अनेकदा पडायची. रस्त्याने जाताना अचानक जवळपास कुत्रं दिसलं, की क्षणार्धात मनात यायचं, “कुत्रं चावणार, पुन्हा एकदा तेच त्रासाचं चक्र… नको… पळ, पळ!!” पुढच्या अर्ध्या क्षणात ती पळत सुटलेली असायची. या अविचारी पळण्यामुळे कुत्र्याचं नसलेलं लक्ष ओढवून घेणं, वाहनाला धडकून दवाखान्याच्या वाऱ्या, एका आजोबांवर आदळल्यामुळे त्यांच्यावरच उपचार करण्याची वेळ असे अनेक एपिसोड झाले होते. थोडी मोठी झाल्यावर ‘कुत्रं चावणार, पळ’ ची जागा, ‘कुत्रं आडवं आलं की हुकतंच सगळं’ या समजाने घेतली. कुत्रं दिसलं, की परत फिरायला लागली. त्यामुळे ‘कुत्रं = दवाखाना’ ऐवजी, ‘कुत्रं = काम होत नाही’ असं समीकरण झालं. त्यावरून कुणी छेडल्यावर ती म्हणायची, “मला भीती वाटतेच. तुम्हाला काय?”

आणखी वाचा : नातेसंबंध : बायको पडतेय तोंडघशी?

आजही ती एका कामासाठी निघालेली. खुशीत, गाणं गुणगुणत होती आणि अचानक कोपऱ्यावर एक कुत्रं दिसलं. नेहमीप्रमाणेच ती भयंकर घाबरली, तरीही आजचं काम फारच महत्वाचं असल्याने, परत फिरण्याचे विचार तिनं निग्रहानं रोखले. तिला पूर्वीचे एपिसोड आठवले आणि ‘आता फार झालं’ असं वाटून तिनं स्वत:ला पहिल्यांदा प्रश्न विचारला, “वीस वर्षं झाली, आणखी किती काळ तू कुत्र्याला घाबरत राहणार आहेस? इतके एपिसोड झाले असले, तरी एवढ्या वर्षांत प्रत्यक्ष कुत्रं किती वेळा चावलं? लहानपणी एकदाच. तेव्हा भीती वाटली ते समजू शकतं, पण अजूनही एवढी पॅनिकी कशासाठी? आजवरचं नुकसान कुत्र्यांनी नाही, तुझ्या पॅनिक रिॲक्शनने केलंय, कळतंय का?”

आणखी वाचा : तुमच्यासाठी ‘महिला’ म्हणजे प्रसिद्धीचं खेळणं आहेत का?

स्वत:च्याच मनाने घेतलेल्या या उलटतपासणीमुळे दीपिका एकदम भानावर आली. भीती अजूनही होती, पण पॅनिकी थांबली. ‘आजचं काम व्हायलाच पाहिजे. काय बरं करता येईल? कुत्रा जाईपर्यंत बाजूला थांबावं किंवा मागच्या गल्लीतून जावं किंवा शांतपणे रस्ता ओलांडून पलीकडेही जाता येईल. त्याप्रमाणे तिने भीत भीत पण शांतपणे रस्ता ओलांडला. भीतीला सामोरं जाऊन, ठरवून आटोक्यात ठेवणं जमल्यावर तिला एकदम मोकळं वाटलं. “अरे, असा शांतपणे पर्यायांचा विचार आपण यापूर्वीही करू शकलो असतो, पण लहानपणीच्या धसक्याने घाबरण्याच्या ‘पॅटर्न’मध्ये अडकलो. मोठेपणी तरी त्या भीतीला सामोरं जाऊन तारतम्याने प्रश्न विचारूच शकलो असतो, पण ‘….मग भीती वाटणारच ना?’ असं समर्थन वीस वर्षं देत राहिलो, त्यावर कधी नव्यानं विचारच केला नाही आपण.
कुत्र्याची भीती खोल रुजलेली असली, तरी कशाकशाच्या भीतीने पॅनिक होऊन विचित्र वागण्याचा पॅटर्न आपला नेहमीचा आहे. त्यामध्येच वर्षानुवर्षं अडकून पडायचं? की भीतीला सामोरं जाऊन, तारतम्याने प्रश्न विचारून, वेगळे मार्ग शोधायचे? हा चॉइस तर आपल्याच हातात आहे की!” दीपिकासाठी जसा काही साक्षात्कारच झाला.
(नीलिमा किराणे रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship counselling overcome the fear of dogs choice is ours love your pet vp
First published on: 30-11-2022 at 11:44 IST