“का गं , एकटीच आलीस ? रोहित कुठाय ? ” पल्लवीनं वेणूला विचारलं .
“ सतत कशाला हवाय नवरोबा सोबत? त्याच्याही मित्रांचा छान ग्रुप आहे. तो तिकडे गेलाय… मी इकडे आले.” वेणू म्हणाली.
“ हे आवडलं बाई मला . नाहीतर आपली नंदिनी ! जिथे नवरा जाईल, तिथे तिला जायचं असतं. नशीब रोज त्याच्या ऑफिस मध्ये नाही जाऊन बसत. ” म्हणत दोघी हसल्या. “ तो किशोरही असाच आहे गं पल्लवी. जरा म्हणून काव्याला एकटं सोडत नाही. बाजारात, तिच्या माहेरी, मैत्रिणीकडे. इतकंच काय, ती टी. व्ही. बघायला बसली, तरी हा शेजारी येऊन बसतो. दोघांचं जिम सुद्धा एकच. मला नाही बाई आवडत असं सारखं चिकटून राहाणं. थोडी स्पेस द्या की एकमेकांना! ”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : तरुण पिढीला नाती टिकवणं अवघड का जातं?

“ काय सांगू रेणू , टाळेबंदीच्या काळात आम्ही सतत घरातच होतो ना, तेव्हा सुरुवातीचे सहा महिने खूप छान वाटलं. इतका सहवास कधीच नव्हता मिळाला गं… दोघंही सकाळपासून रात्री पर्यंत बाहेरच असायचो. भेटच व्हायची नाही आठवडाभर. पण टाळेबंदी काळात मात्र नंतर नंतर मला त्याच्या अनेक गोष्टींचा विनाकारण राग यायला लागला. सतत नजरे समोर राहाण्याची सवयच नव्हती. वाटायचं, एक तर त्यानं कुठेतरी बाहेर जावं किंवा थोडा वेळ का होईना मी तिथून गायब व्हावं. इतकं प्रेम करतो आम्ही एकमेकांवर, पण तरीही असं वाटलं याचं गील्ट आलंच गं मनात .”
पल्लवीला खरं तर अपराधी वाटण्याची काहीच गरज नव्हती. तिला जे वाटलं ते अत्यंत स्वाभाविक होतं. कायम स्वरुपी चोवीस तासांचा सहवास असेल तर दोघांनाही थोडा बदल आवश्यक असतो. याचं कारण म्हणजे…

आणखी वाचा : Work Spouse : नातेसंबंध : तुम्ही आहात ऑफिस स्पाउस?

आपल्या आयुष्यात फक्त पती- पत्नी हीच दोन नाती असतात का ? आणि दोघांच्या संसारापलीकडे जग नसतं का ? इतर अनेक नाती, मन रमवणारे छंद, समाजातील इतर कामं, आणि असंख्य गोष्टी असतात, ज्यामुळे जगण्यातील एकसुरीपणा कमी करता येतो. नात्यातील टवटवीतपणा राखण्यास मदत होते. एकमेकांबद्दल ओढ, जी असायला हवी, ती कायम रहाते. आपल्या वागण्याचं थोडं विश्लेषण करायला, जोडीदार असा का वागला हे समजून घ्यायला देखील तसा मोकळा वेळ हवाच की ! ही स्पेस म्हणजे अंतर राखण्यासाठी दोघांनी एकमेकांशी अतिशय मोकळेपणाने बोलणं आवश्यक आहे .

आणखी वाचा : नातेसंबंध : अटॅचमेंट आणि डीटॅचमेंट

‘मी विनाकारण चिडचिड करतेय, मला वाटतं मला थोड्या ‘ब्रेक’ ची गरज आहे .’
‘ तू थोडावेळ मैत्रिणीकडे किंवा बाजारात जाऊन ये, मी जरा एकटा शांत घरात बसतो.’
‘ मला आज थोडा वेळ एकटीला अंगणात पाय मोकळे करत फिरावं वाटतंय…चालेल ?’
असं प्रेमाने , मन न दुखवता एकमेकांना सांगता येईल . आजची जीवनशैली थकवणारी आणि तणावपूर्ण असताना या अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास नात्यातील खुमार टिकवण्यास नक्कीच मदत होईल !

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship husband wife what to do vp
First published on: 20-09-2022 at 19:39 IST