scorecardresearch

विवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं!

लग्नानंतर काही वर्षांनी अनेक गोष्टींची व्यवधानं पाळताना अनेकदा मतभेदांचं रुपांतर वादात होऊ लागतं आणि मग ते टाळण्यासाठी एकाच घरात राहूनही एकमेकांशी संवादच थांबतो, एकमेकांबद्दलचा ओलावा हरवून जातो, नात्यात कोरडेपणा येतो. हे टाळून एकमेकांच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडण्यासाठी नात्याचं सतत सर्व्हिसिंग करावंच लागतं…

विवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं!
नातं कधीच शीळं होणार नाही, जर…

दारावरची बेल वाजली आणि एका विशिष्ट पद्धतीने वाजली तेव्हाच लक्षात आलं, की नक्कीच ही वैशाली असणार. कारण ही अशीच वादळासारखी यायची आणि धो धो बोलत राहायची. हा तिचा अगदी लहानपणापासूनचा स्वभाव आणि लग्न झाल्यानंतरही तो बदलला नाही. पण जोडा परस्पर विरोधीच असतो, असं म्हणतात त्याप्रमाणे वैशालीचा नवरा विवेक मात्र अगदी अबोल होता. मोजकंच बोलायचा आणि हिची तोफ मात्र चालू राहायची. तिचा मुलगा तिच्या सारखाच बडबडा आणि मुलगी मात्र वडिलांसारखी शांत कमी बोलणारी. पुन्हा एकदा बेल वाजली आणि मी भानावर आले.

आणखी वाचा : “विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

“अगं हो वैशू ,आले मी. जरा दम धर की.”
मी दार उघडलं वैशाली आत आली आणि मला तिने चक्क मिठीच मारली.
“ थँक्यू थँक्यू थँक्यू… तुला खूप खूप धन्यवाद. अगदी मनापासून.” आज गाडी भलतीच खुशीत आहे हे मी ओळखलं.
“ अगं हो ,पण हे धन्यवाद कशासाठी, ते तरी सांग.”

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : सेक्स्च्युअल शेअरिंग म्हणजे काय गं?
“तुझ्या आग्रहाखातर आणि तू समजून सांगितल्यामुळे मी अगदी अनिच्छेने का होईना पण माझ्या नवऱ्याबरोबर चार दिवस बाहेेर फिरायला गेले. विवेकचा स्वभाव मोजकंच बोलणारा. अशा घुम्या माणसाबरोबर मुलं सोबत नसताना दहा दिवस काढणं माझ्यासाठी अवघडच होतं. तिथं टीव्ही नाही, मोबाईलची रेंज नाही, कोणताही ओळखीचा ग्रुप नाही, अशा ठिकाणी आम्ही दोघंच तिथं एकमेकांशी काय बोलणार? काय गप्पा मारणार? असं वाटलं होतं, पण आज मला कळतंय की तुझं ऐकलं नसतं तर कदाचित मी चांगल्या अनुभवाला मुकले असते. तिथं आम्हा दोघांना आमचा असा वेळ मिळाला, कोणतीही घाई, गडबड, ताणतणाव नाही, निसर्गाच्या सानिध्यात भरपूर वेळ घालवला, मनसोक्त गप्पा मारल्या. हळूहळू आम्ही दोघंही मोकळे होऊ लागलो. मागील कटू गोड अनुभवांची उजळणी झाली आणि विवेकला मी नव्यानं ओळखू लागले. घरातील सर्व साफसफाई झाल्यावर जसं खूप छान वाटतं तसंच मनातील जुन्या विचारांची सगळी जळमटं, रागलोभांचा केरकचरा काढून टाकल्यामुळे मनंही स्वच्छ आणि मोकळं होतं. मलाही आज तसंच वाटतंय आणि क्रेडिट गोज् टू यू.”
ती अगदी भरभरून सांगत होती.

आणखी वाचा : नातेसंबंध : सासू-सासरे सोबत नकोत?
“ वैशाली, तुला खरं सांगू का, अगं नात्यालाही सर्व्हिसिंगची गरज असते. पती पत्नीमध्ये लग्नानंतर सुरुवातीला एकमेकांबद्दलची असोशी, ओढ असते, पण ती नंतर कुठंतरी हरवून जाते कारण एकमेकांशी संवादच कमी होतो. होणारा संवाद फक्त व्यावहारिक पातळीवरचा असतो. कोणती बिलं भरायची राहिली? कर्जाचे हप्ते किती राहिले? मुलांसाठी कोणते क्लास लावायचे? गुंतवणूक कुठं करायची? इत्यादी आणि असेच संवाद पती- पत्नी मध्ये होतात. या सर्व गोष्टीत विचारांची भिन्नता असेल तर संवादाचं रूपांतर वादात होतं आणि वाद नको म्हणून पती-पत्नी एकमेकांशी बोलणंच टाळतात. एकाच घरात राहूनही एकमेकांशी संवादच थांबतो, क्षुल्लक गोष्टीवरून वाद होऊ लागतात. एकमेकांबद्दलचा ओलावा हरवून जातो, नात्यात कोरडेपणा आणि फक्त कर्तव्य एवढंच बाकी राहतं. एकमेकांबद्दलचा राग- उद्वेग मनात साठत राहतो. कधी कधी मनाचा कोंडमारा होतो. नकारात्मक भाव वाढत जातात आणि नाती कडवट होतात. आपल्या बोलण्याचा वागण्याचा आपल्या जोडीदारावर काय परिणाम होतोय याचं तारतम्य राहत नाही. कामाच्या ठिकाणी निघतानाच वाद झाले तर त्याचा आपल्या कामावरही परिणाम होतो आणि घरी आल्यानंतर घरात तक्रारींचा पाढा ऐकावा लागला तर जेवणही नकोसं वाटतं म्हणूनच वेळीच या गोष्टी लक्षात घेऊन पती पत्नीनं एकमेकांशी मनमोकळा संवाद साधणं गरजेचं आहे. एकमेकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आपल्या नात्यांना वेळ देणं महत्वाचं आहे. ती दोघांचीही गरज आहे. त्यासाठी कधीतरी आपल्या रुटीन मधून बाहेर येऊन एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारणं, बाहेर फिरायला जाणं गरजेचं आहे. नाती टिकवायची असतील तर नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं.”

आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?

“हो गं पटलं तुझं, या पर्यटनामुळं आमच्यातील नात्याचं खऱ्या अर्थानं सर्व्हिसिंग झालं. पुन्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय, असं वाटतंय. चल, आता गप्पा थांबवूया कारण विवेक आज लवकर घरी येणार आहे आणि मलाही लवकर जायचंय, फक्त तुझ्या हातचा आलं घालून केलेला फक्कड चहा हवा आहे.”
“ हो गं, चहा घेतल्याशिवाय मी तुला सोडणारच नाही.”
चहा करायला मी किचनमध्ये गेले, पण तिच्या आनंदानं आज माझंही मन भरून आलं.”

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या