scorecardresearch

नातेसंबंध: ‘वीकेण्ड कपल’ असंही सहजीवन?

आज शहरात राहाणारी तरुण जोडपी. दोघांनीही कमावण्यासाठी बाहेर पडणं ही काळाची गरज ओळखून वागणारी, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेळेत भरभरून जगून घेणारी. काय आहे आजची वीकेण्ड कपल कन्सेप्ट?

नातेसंबंध: ‘वीकेण्ड कपल’ असंही सहजीवन?
सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नवस बोलणारे, आजारपण आलंच तर शनिवारपर्यंत अंगावर काढणारे… ते ‘वीकेण्ड कपल.’

शीर्षक वाचून हे विवाहबाह्य संबंधाबद्दल काही आहे का, असं वाटत असेल, तर तुम्ही चुकताय. आपण अगदी व्यवस्थित रीतसर सर्वांसमक्ष लग्न लागलेल्या नवरा बायकोंबद्दल बोलत आहोत. दोघंही उच्चशिक्षित, उत्तम पगाराच्या नोकरीवर, आणि एकाच घरात रहाणारे असले, तरी ‘आपण दोघं नवरा नवरी, पण भेट नाही संसारी’ अशी गत असणाऱ्या जोडीबद्दल बोलतोय.
दोघंही घाईघाईत नाश्ता नावाखाली काहीतरी तोंडात कोंबून सकाळी घाईघाईत बाहेर पडणार. (घरून काम असलं तर प्रवासाचा वेळ वाचतो, बाकी फार काही फरक पडत नाही.) ऑफिसमध्ये मान मोडून काम करून थकूनभागून घरी आल्यावर चार घास पोटात ढकलल्यावर एकमेकांशी बोलण्याची फारशी ऊर्जा नसल्याने झोपेच्या अधीन होणार. चार शब्दांची देवाणघेवाण झाली तरी ते काहीतरी मीटिंग, एक्सेल शीट, ऑनशोअर, ऑफ शोअर’ असलं कामाबद्दल बोलणार, बस! ज्यांना निवांत एकमेकांच्या तब्येतीबद्दल किंवा चार शब्द प्रेमाचे बोलायचे असतील तर शनिवार रविवारची वाट बघावी लागते, ते असतं, ‘वीकेण्ड कपल’!

आणखी वाचा : ‘ लव्ह जिहाद ‘ ला कायद्याची जरब बसणार का?

यांचा निवांतपणा ‘जुम्मे के जुम्मा’ तेही संध्याकाळपासून सुरु होतो. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून नवस बोलणारे, आजारपण आलंच तर शनिवारपर्यंत अंगावर काढणारे, मध्ये कुणाकडे काही शुभकार्य असेल तर दोघांपैकी कुणी सुट्टी घ्यायची यावर घमासान चर्चा करणारे… ते ‘वीकेण्ड कपल.’. शनिवार, रविवार या दोन दिवसांत मात्र ते पूर्णपणे एकमेकांसाठी जगून घेतात. मित्रमंडळी, अधूनमधून नातेवाईक, क्वचित एखादा सिनेमा, बाहेर हॉटेलमध्ये जेवण, पार्ट्या हे सगळं सगळं त्या दोन दिवसात.

आणखी वाचा : Flashback 2022 : ‘या’ घटना ठरल्या महिलांसाठी लक्षणीय!

सोनल आणि शिवम हे एक असंच जोडपं. सोनमचं काम सकाळी नऊ ते सहा असल्याने ती सकाळी आठलाच बाहेर पडणार, तर शिवमची ड्युटी मात्र दुपारी बारा ते रात्री दहा. प्रचंड रहदारीतून घरी यायला अकरा वाजणार. तोपर्यंत सोनम घोरत पडायची. ( हिंदीत म्हणतात ना, ‘घोडे बेचके सोयी हुई’, तसं) एकमेकांची भेट घ्यायची तर कुण्या एकाला एकतर सकाळी लवकर उठणे किंवा रात्री जागणे भाग. मग शनिवार आला, की आता पूर्ण जगून घेऊया म्हणत दोघांचे प्लान्स ठरणार.

आणखी वाचा : उंचीनुसार महिलांचे वजन नेमके किती असावे? पाहा शासनाने जाहीर केलेला ‘हा’ सोपा तक्ता

“शनिवारी मावशीबाई नसतात, त्यामुळे आज किचन ड्युटी तुझ्याकडे.” इति सोनल
“ हॅलो! मागच्या शनिवारी मीच केला होता स्वयंपाक! आता तुझी ड्युटी! ” शिवम हसत म्हणाला.
“पण मशीनला पडदे चादरी मी लावल्या होत्या. शिवाय बाल्कनी आणि टॉयलेट मी साफ केलं होतं कीनई?”
“ए, सोनल, कुंड्यांना पाणी दिलंस? बघ ते पण मलाच करावं लागणार! रोपं जळून जातील ग! ”
“ चील! दिलं मी सकाळीच. तू आधी खायला काहीतरी कर न पटकन! ”
“ जाऊ दे ना यार! चल खाली टपरीवर जाऊ मोमो खाऊन येऊ! तू पण नको करुस! मी पण नाही! क्या बोलता पार्टनर ? “ म्हणत त्याने तिच्या गळ्याभवती प्रेमाने हात घातले, आणि दोघं आहे त्या अवतारात पायात स्लीपर अडकवून बाहेर पडले.”
ही आज शहरात राहाणारी तरुण जोडपी. दोघांनीही कमावण्यासाठी बाहेर पडणं ही काळाची गरज ओळखून वागणारी, त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेळेत भरभरून जगून घेणारी. घरात आणखी मंडळी असतील तर थोडासा वेळेचा चतकोर हिस्सा त्यांच्यासाठी ठेवून सोमवारी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणारी. अशात घरात पाळणा हलला तर यांच्याकडे त्यासाठी भक्कम प्लान ठरलेला असतो बरं का! त्याचे किंवा तिचे आई वडील येणार, बाळाची पूर्ण जबाबदारी घेणार, आणि बाळ तीनचार महिन्याचं झालं की हे दोघं पुन्हा ‘वीकेण्ड कपल’ नाही हो, चुकलं ‘वीकेण्ड पॅरेंट्स’ होणार!
adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 16:50 IST

संबंधित बातम्या