-अपर्णा देशपांडे

आपण आजवर आपल्या अवतीभवती अशा अनेक स्त्रिया बघितल्या ज्यांनी एकटीने आपल्या मुलांचा सांभाळ केला, कष्टाने त्यांना वाढवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. त्या स्त्रियांना एकट्या असण्याची अनेक कारणं असतील. लग्नानंतर काही वर्षांतच पतीचे निधन झाले असेल किंवा घटस्फोट झाला असेल, किंवा पती दुसऱ्या स्त्रीसाठी आपला संसार सोडून निघून गेला असेल. कारण कुठलंही असलं तरी स्त्री एकटी पडली आणि मुलांची जबाबदारी तिनं एकटीनं पेलली. अशी अनेक उदाहरणं सापडतील.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

काही वर्षांपूर्वी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची संख्या तशी कमीच होती, पण आता ते चित्र अमुलाग्र बदललं आहे. पतीच्या माघारी मुलांना वाढवताना येणाऱ्या समस्या फार मोठ्या असल्या तरी एका कमावत्या स्त्रीला आर्थिक पाठबळ असल्यानं त्या मानानं जगणं सोपं होतं. रधिकाची आई एक सरकारी कर्मचारी होती. राधिका केवळ चार वर्षांची असताना तिचे वडील एका अपघातात गेले, आणि तिची सगळी जबाबदारी एकट्या आईवर आली. तिच्या घरच्यांनी दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं, पण राधिकापायी आईनं तो प्रस्ताव साफ नाकारला. तिनं आपली सगळी हौसमौज विसरून रधिकाच्या करिअरला प्राधान्य दिलं. मुलीला उच्चशिक्षित करणं हे एकमेव ध्येय ठेवून ती माऊली जगली.

आणखी वाचा-समुपदेशन : निर्णयाची घाई करताय?

राधिकाला आपल्या आईच्या त्यागाची पूर्ण कल्पना होती. आईनं राधिकाला तिच्या लग्नाविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली,
“ माझं वैवाहिक जीवन सुरू व्हावं आणि मला एक भक्कम साथीदार मिळावा असं तुला वाटतं ना? मग अगदी तसंच मला तुझ्याविषयीही वाटतं. तुझं अपूर्ण वैवाहिक आयुष्य तू आता पूर्ण करावंस असं मला मनापासून वाटतं. मी लग्न करून गेल्यावर तू अगदी एकटी पडशील. मी तुझ्या अडचणीत तुझ्यासाठी नेहमी असेल, पण रोजच्या दैनंदिन आयुष्यात तुझ्या सोबत नसेन. मला तुला मोकळं, आनंदानं, भरभरून जगताना बघायचंय. तसं जगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे आई.”
“ काहीतरीच काय राधिका? आता या वयात माझं नको ते नातं जुळवू बघतेस तू? कशासाठी?”
“ एकटीनं जगून बघितलं ना तू? तुझं ध्येय पूर्ण केलंस, मला इतकं सक्षम बनवलंस. मग आता स्वतःसाठी योग्य सहचर शोधला तर काय वाईट आहे?” राधिकानं आईचं मन वळवलं. आईच्याच ऑफिसमधील श्रीराम काका त्यांची पत्नी वारल्यावर गेल्या दहा वर्षांपासून एकटेच होते. मुलगा परदेशी असल्यानं भारतात फारच एकटे पडले होते. राधिकाची आई आणि त्या काकांची चांगली मैत्रीही होती. त्या मैत्रीचं रूपांतर नात्यात व्हावं म्हणून तिनं पुढाकार घेतला आणि आईच्या मनाची तयारी केली. आईचं लग्न झाल्यावर ती आनंदाने स्वतःच्या लग्नाला तयार झाली. आता तिला आई पूर्णपणे एकटी पडण्याची चिंता नव्हती, उलट ज्या संसारसुखापासून आई इतकी वर्षं वंचित होती, ते सुख तिला उशिरा का होईना प्राप्त झालं हे बघून मनोमन सुखावली होती.

आणखी वाचा-नातेसंबंध: परदेशी राहण्याचा हव्यास घातक?

तनायाच्या बाबतीत मात्र या उलट झालं. तिच्या वडिलांनी दुसऱ्या स्त्रीसाठी तिच्या आईला सोडलं आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हा तनया जेमतेम आठ वर्षांची होती. आईनं मोठ्या हिमतीनं तनयाला वाढवलं. छोटी मोठी कामं करत घर सांभाळलं. तनया साधारण वीस वर्षांची असताना आईच्या आयुष्यात एक पुरुष आला. आईला त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, हे तनयानं ओळखलं होतं, पण आईनं आता या अर्धवट वयात पुन्हा लग्न करणं तिला अजिबात मान्य नव्हतं. आतापर्यंत आईचं संपूर्ण लक्ष तिच्या मुलीकडे केंद्रित होतं. लग्नानंतर तिचं लक्ष तिच्या नवीन पतीकडे असेल, या विचाराने ती अस्वस्थ झाली. आईनं या वयात दुसरं लग्न केलं तर आपण आपल्या मित्र मैत्रिणींना कसं सामोरं जायचं या विचाराने ती ग्रासली. शिवाय हा दुसरा पतीही नीट नाही वागला तर ? या विचारानेही ती आईच्या लग्नाच्या ठाम विरोधात होती. आईनं त्या नवीन व्यक्तीच्या चांगुलपणाची कितीही ग्वाही दिली तरी तनयाला आपल्या आईचं प्रेम कुणासोबत वाटून घेणं मंजूर नव्हतं. तिनं खूप त्रागा केला, घरातून निघून जाण्याची धमकी दिली आणि आईनं मुलीसाठी तिचा निर्णय बदलला. आईला आपल्या मुलीला दुखावून नवीन संसार मांडणं मान्य नव्हतं. आईनं त्या मित्रास नकार कळवला. तनया उच्च पदवीधर झाली, तिला उत्तम नोकरी मिळाली, पोस्टिंग होती दुसऱ्या लांबच्या शहरात. नोकरीसाठी एकटं राहताना तिला आईच्या एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. त्यावेळी आपण साथ दिली असती तर आज आईचं एक सुंदर सहजीवन असलं असतं, पण आपण वेड्यासारखे वागलो. आपण तिच्यावर फार मोठा अन्याय केला याची बोच तिला लागली, पण आता वेळ निघून गेली होती.

आजही पतीच्या माघारी एकट्या स्त्रीनं मुलांना वाढवून मुलं मोठी झाल्यावर पुन्हा एकटं राहणं पसंत केलेली उदाहरणं खूपच जास्त आहेत. कारण आईला तिचा आनंद तिच्या अपत्यांमध्ये शोधायचा असतो. त्यांच्या पलीकडे आपलं वैयक्तिक सुख बघणं ती नाकारते. पण आपल्या आईच्या आयुष्यात पुन्हा सहजीवनाचा आनंद येण्याची शक्यता असेल तर तिला ते आयुष्य मिळवून देण्यात आपली म्हणजे मुलांची भूमिका फार फार महत्वाची नाही का? तुम्हाला काय वाटतं?

adaparnadeshpande@gmail.com