‘सॉफ्ट स्किल्स वर्कशॉप’ला एचआर विभागाकडून आपल्याला ‘पाठवलं’ गेलंय असं वाटल्याने नीता मनातून खूप वैतागली होती. ती खूप जबाबदार आणि कमिटेड होती, पण सहकाऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, बॉसची मतं पटली नाहीत की ती वाद घालायची. ती वर्कशॉपला पोहोचली. विविध वयांच्या, विविध क्षेत्रांतल्या अनोळखी दहा-बारा स्त्री-पुरुषांचा तो गट होता. चर्चेला विषयाचं बंधन नव्हतं. एकेकाने आपल्या मनाला छळणाऱ्या एखाद्या अनुभवाबद्दल बोलायचं आणि ते ऐकून त्या प्रसंगाबद्दल, सांगणाऱ्याबद्दल आपल्याला काय वाटलं याबद्दल बाकीच्यांनी विनासंकोच मतं व्यक्त करायची होती. फॅसिलिटेटर- गाइडने मध्येच विचारलेल्या एखाद्या प्रश्नामुळे लोकांना स्वत:च्या मनात डोकवायला दिशा मिळत होती. एकाच वेळी ऐकलेल्या एखाद्या अनुभवाबद्दल प्रत्येकाची प्रतिक्रिया किती वेगवेगळी असू शकते हे जाणवून तिला गंमत वाटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : महिला वैमानिकाची सर्वाधिक टक्केवारी भारतातच का?

एक चाळिशीच्या ताई, त्यांचा नवरा आणि सासरच्या लोकांबद्दल जोरजोराने काही तरी सांगू लागल्या. त्या टिपेतल्या स्वरामुळे आणि विषयात रस न वाटल्यामुळे तिचं नकळत दुर्लक्ष झालं आणि नेमकं तेव्हाच, ‘यावर तुला काय वाटलं?’ असं गाइडनं तिला विचारलं. लक्ष नसल्यामुळे तिनं काही तरी थातुरमातूर उत्तर दिलं तसा गाइड भडकलाच. “तुझं लक्षच नाहीये, आधीच्या लोकांसाठी तू कॉन्ट्रिब्यूट केलंस, पण हिचं बोलणं मात्र तू ‘बातम्या ऐकल्यासारखं’ अर्धवट ऐकतेयस. कुणी तरी तुमच्यासमोर आपलं मन उघडं करतंय आणि तुम्ही नीट ऐकून घेण्याएवढीही किंमत त्याला देऊ शकत नाही?” “मला बोअर होतात घरगुती तक्रारी.” ती शरमली तरी सर्वांसमोर लाज काढल्याचा फणकारा आलाच.

आणखी वाचा : नातेसंबंध: बॉयफ्रेण्डनं ‘डीच’ केलं तर?

“याचा अर्थ, तुझ्या मनात गृहिणींबद्दल आदर नाहीये. तू स्वत:ला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतेस.” “तसं नाही, मला असले विषय आवडत नाहीत.” “माणसं समजून घ्यायची असतील तर सर्वांचं ‘ऐकता’ यायला हवं. आवडनिवड कसली? शब्दांच्या पलीकडच्या ‘भावना’ ऐकता यायला हव्यात.”
अपमानित वाटल्यामुळे नीता मख्ख चेहऱ्याने, संवादात भाग न घेता, पण लक्ष देऊन ऐकायला लागली. “मी घरासाठी कितीही केलं तरी सासू कधीच खूश नसते, तिच्या तक्रारींमुळे नवरा नाराज आणि आमच्यात भांडणं.” त्या ताईंच्या तक्रारीमागच्या भावना आता तिला ‘ऐकू’ आल्या. सासूच्या वयामुळे, स्वभावामुळे घर, नवरा तिच्याच मर्जीने चालणार, आपण ते कधीच बदलू शकणार नाही याबद्दल ‘निराशा’ आणि ‘दुखावलेपण’ या शब्दात न बोललेल्या भावना तिला ‘ऐकू’ आल्या.

आणखी वाचा : U19 Women T20 WC: कर्करोगाने पतीला तर सर्पदंशाने मुलाला गमावले; जगाने दुर्लक्षित केलेल्या आईच्या लेकीने टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन 

आपला योग्य मुद्दा जेव्हा बॉसला पटत नाही, तेव्हा आपल्यालाही अस्संच वाटतं की आणि आपण ज्युनियर्सवर रागावल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरही अशीच भावना असते. त्या ताईंसारख्या टिपेच्या स्वरात आपणही मैत्रिणीपाशी चिडचिड करतोच की. संदर्भ वेगळे, पण मनातल्या दुखऱ्या भावनांमध्ये किती सारखेपणा. ती आता गुंतलीच त्या ग्रुप प्रोसेसमध्ये. “माझे जुन्या वळणाचे वडील मला आवडलेल्या मुलीशी लग्न करू देत नाहीयेत,” असं डोळ्यात पाणी न येऊ देता सांगणाऱ्या त्या तरुणाच्या मनातली ‘असहायता’ तिला दिसली. “मला लहान बाळ असूनही माझी बॉस जराही सवलत देत नाही,” असं ‘अगतिकपणे’ सांगणारी तर आपल्याबद्दलच तक्रार करतेय असं तिला वाटलं.

आणखी वाचा : शांत झोप हवी आहे ? ताबडतोब बंद करा ‘या’ सवयी

सासू-सून, जोडीदार, बॉस-साहाय्यक, पालक-मुलं किंवा मैत्री कुठल्याही नात्यात, अन्याय झाल्याचं, गृहीत धरल्याचं, जवळची व्यक्ती समजून घेत नसल्याचं ‘दुखावलेपण’ आणि हे आपण बदलू शकत नाही याची ‘असहायता’ सर्वांची सारखीच आहे हे तिला जाणवलं. आता बायकी-पुरुषी, सासू-सून, ऑफिसचं-घरगुती असा काही फरकच वाटेना. घरगुती तक्रारी न करणाऱ्या आपण स्वत:ला त्यांच्यापेक्षा ‘वेगळं’ म्हणजे ‘भारी’ समजत होतो हे तिला आता पटलं. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं’ हा आपल्याला आपला हक्कच वाटत होता. म्हणूनच, सहकारी आपल्या अपेक्षेएवढी जबाबदारी घेत नाहीत असं वाटतं तेव्हा आपण त्यांच्याशी हक्काने अनादराने वागतो, मात्र आपल्या कल्पकतेची आणि कष्टांची बॉसला कदर नाही असं वाटतं तेव्हा वाद घालतो. हा एक प्रकारचा ‘पॉवरगेम’च की. त्यातून मनं दुखावतात आणि संबंध कसे बिघडतात हे तिचं तिलाच शोध लागल्यासारखं आतून उलगडलं. यापुढे लोकांचं बोलणं ‘बातम्या ऐकल्यासारखं’ वरवर ऐकायचं की शब्दांमागच्या भावनाही ‘ऐकायला’ शिकायचं याचा ‘चॉइस आपलाच आहे.’ हे मनात येऊन ती स्वत:शीच हसली आणि पुढच्या माणसाचं सांगणं ‘ऐकायला’ लागली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.) neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship with boss and colleagues and at home how one should look at it vp
First published on: 01-02-2023 at 12:46 IST