Removing Girls Clothes Is Not Rape: राजस्थान उच्च न्यायालयाने एका ३३ वर्ष जुन्या बलात्काराच्या खटल्यात निर्णय देताना केलेलं विधान सध्या प्रचंड चर्चेत आहे. “मुलीचे अंतर्वस्त्र काढणे, स्वतः नग्न होणे, या कृती ‘बलात्काराचा प्रयत्न’ म्हणून गृहीत धरता येणार नाहीत” असे न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ अंतर्गत हा प्रकार महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा मानला जाईल पण यास बलात्कार म्हणता येणार नाही असेही पुढे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

न्यायमूर्ती अनुप कुमार धांड यांच्या खंडपीठाने सुवालाल (Son Of Gopi By Caste Raigar) vs राज्य या खटल्यात निर्णय देताना नमूद केले की, मुलीची अंतर्वस्त्रे काढून स्वतः पूर्णपणे नग्न होणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ व कलम ५११ अंतर्गत येत नाही त्यामुळे त्यास बलात्काराचा प्रयत्न म्हणता येणार नाही. ‘प्रयत्न’ या शब्दावर जोर देऊन, एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरोपी ‘तयारी’च्या टप्प्याच्या पलीकडे गेला नसावा असेही अधोरेखित केले. अखेरीस न्यायालयाने निर्णय दिला की हे कृत्य आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत दंडनीय असून ‘स्त्रीचा विनयभंग’ म्हणून पाहिले जाईल.

न्यायाधीश धांड म्हणाले की, “माझ्या मते, या तथ्यांवरून, कलम 376/511 I.P.C. अंतर्गत गुन्ह्यासाठी कोणतेही प्रकरण नाही. आरोपी अपीलकर्त्याला बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरवता येणार नाही. आरोपीने विनयभंगाच्या उद्देशाने फिर्यादीवर प्राणघातक हल्ला किंवा बेकायदेशीर बळाचा वापर केल्याचा खटला दाखल केला जाऊ शकतो. हे प्रकरण कलम ३५४ चे स्पष्ट प्रकरण आहे. कारण सध्या आरोपीचे कृत्य ‘तयारी’च्या टप्प्याच्या पुढे गेलेले नाही,”

नेमकं प्रकरण काय?

९ मार्च १९९१ रोजी टोंक जिल्ह्यातील तोडारायसिंग यांनी पोलिसांशी संपर्क साधून सांगितले की त्यांची ६ वर्षांची नातं (प्याऊ) पाणपोईवर पाणी पिट असताना आरोपी सुवालालने रात्री ८ वाजताच्या सुमारास तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिला जवळच्या धर्मशाळेत नेले होते. मुलीने आरडाओरडा केल्यावर गावकऱ्यांनी तिथे येऊन तिची सुटका केली, गावकऱ्यांना उशीर झाला असता तर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला असता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी सुवालालने गुन्हा केला तेव्हा तो अवघा २५ वर्षांचा होता

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काय म्हणाले?

निकाल देताना, न्यायमूर्ती धांड यांनी दामोदर बेहेरा विरुद्ध ओडिशा आणि सित्तू विरुद्ध राजस्थान राज्य यासारख्या प्रकरणांचा संदर्भ दिला, जिथे आरोपीने एका मुलीला जबरदस्तीने विवस्त्र केले आणि तिच्या प्रतिकारानंतरही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणांमध्ये, हे कृत्य बलात्काराचा प्रयत्न मानले गेले.

बलात्काराच्या गुन्ह्याचे तीन टप्पे

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ‘बलात्काराचा प्रयत्न’ या गुन्ह्याखाली कोणत्याही कृत्याला शिक्षा होण्यासाठी तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. “जेव्हा अपराधी पहिल्यांदा गुन्हा करण्याच्या कल्पनेचा किंवा हेतूने पुढाकार घेतो तेव्हा पहिला टप्पा पूर्ण होतो. दुस-या टप्प्यात, तो ते करण्याची तयारी करतो. तिसऱ्या टप्प्यात गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी हेतुपुरस्सर पावले उचलतो. ” बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासाठी, फिर्यादीने हे सिद्ध केले पाहिजे की तो तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेला आहे.

हे ही वाचा<< Pune Porsche Accident Open Letter: लाडोबाची आई, डोळ्यातून टिपूसही न ढाळता रडण्याचं नाटक कशाला?

प्रकरणाच्या तपशिलानुसार, ६ वर्षीय फिर्यादीने आरोप केला आहे की आरोपीने दोघांचे कपडे काढले आणि तिने मदतीसाठी हाक मारली तेव्हा ते घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, आरोपींनी प्रत्यक्ष बलात्कार केलेला नाही. टोंकच्या जिल्हा न्यायालयाने सुवालालला बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. खटल्यादरम्यान तो अडीच महिने तुरुंगात राहिला होता पण आता कलम ३७६/५११ मध्ये बदल करून ट्रायल कोर्टाने कलम ३५४ साठी दोषी ठरवले आहे.