बीएसएफच्या महिला कॅमल राईडर्स 'कर्तव्य पथा'वर करणार संचलन | Republic Day 2023 Parade bsf women Camel riders to participate in rd parade on kartavya path | Loksatta

Republic Day 2023 Parade BSF च्या महिला कॅमल राईडर्स ‘कर्तव्य पथा’वर करणार संचलन

Republic Day 2023 Parade बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात BSF च्या महिला जवानांचं उंटांच गस्ती पथक यंदा राजस्थानी पारंपरिक पोशाखामध्ये प्रथमच प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे

India Republic Day 2023 bsf camel riders
बीएसएफच्या महिला जवान कॅमल रायडर्स (Photo : ANI)

Republic Day 2023 Parade: यंदा प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर संचलनात नारी शक्तीचा सहभाग लक्षणीय आहे. विविध तुकड्यांचं नेतृत्व तर महिला अधिकारी करणारच आहेत. पण यंदाचं विशेष आकर्षण आहे ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या महिला जवानांचं उंटांच पथक. ‘कॅमल राईडर्स बीएसएफ’ची ही तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत आहे. आपल्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर या महिला अधिकारी सीमा सुरक्षा दलाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. बीएसएफच्या वुमन कॅमल कॉन्टिजेन्टला राजस्थान फ्रंटियरच्या ट्रेनिंग सेंटर आणि बिकानेर सेक्टर यांनी प्रशिक्षण दिलं आहे. उंटावर स्वार असणारं हे जगातलं पहिलं महिला पथक आहे. हे महिला उंट पथक नुकतंच अमृतसर इथं झालेल्या बीएसएफ रेजिंग डे परेडमध्येही सहभागी झालं होतं. या उंटांनाही विशेष प्रशिक्षण दिलं जातं.

आणखी वाचा : Republic Day 2023 : “भविष्यासाठी मोठी ध्येयं आणि संकल्प अतिशय आवश्यक, मात्र…” पंतप्रधान मोदींचं विधान!

उंटावर बसलेल्या या बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यांचं संचलन नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल. याचं आणखी एक कारण म्हणजे या महिला पारंपरिक शाही पोशाखात संचलन करणार आहेत. डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी ४०० वर्षांपूर्वीच्या डंका तंत्रानुसार हे शाही पोशाख तयार केले आहेत. देशातील विविध प्रांतातील प्रचलित शिल्पकलांचा नमुनाही यात सादर होणार आहे. राजस्थानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांशी निगडीत गोष्टींचेही या पोशाखांवर अंकन करण्यात आले आहे. या पोशाखावर बनारसचं प्रसिध्द जर्दोसी वर्क हातानं करण्यात आलं आहे. तर मेवाड प्रांतातील सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या ‘पाघ’वरुन या तुकडीची पगडी तयार करण्यात आली आहे. पाघ हा राजस्थानी मंडळींच्या सांस्कृतिक पेहेरावातील अत्यंत महत्त्वाचा भाग समजला जातो. प्रतिष्ठा आणि सन्मानाचं प्रतिक म्हणून ‘पाघ’ची ओळख आहे. जोधपुरी बंद गळा पध्दतीने हा विशेष अंगरखा तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा : भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ब्लू हेल्मेट सूदानमध्ये तैनात | indian …

पहिल्यांदाच महिला जवानांची तुकडी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार आहे. एकूण १५ महिला जवानांना उंट स्वार पथक संचलनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सोनल, निशा, भगवती, अंबिका, कुसुम, प्रियांका, कौशल्या, काजल, भावना आणि हीना या संचलन पथकात सहभागी होणार आहेत. या सगळ्याजणी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून आलेल्या आहेत. भारताच्या विविधतेतील एकतेचं त्या प्रतिनिधीत्व करतात. हे पथक विजय चौक ते लाल किल्ला या कर्तव्य पथावर संचलन करणार आहे. या संचलनात उंटावरील बँड पथक आणि सैन्य पथक अशी दोन्ही पथकं सहभागी असतील.

आणखी वाचा : Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वर होणार संरक्षण दलातील स्त्री सामर्थ्याचं दर्शन!

१९८६ ते १९८९ पर्यंत अत्यंत कठोर प्रशिक्षणानंतर १९९० साली कॅमल माऊंटेड बॅण्ड सर्वप्रथम सहभागी झाला होता. सीमेवरील वाळवंटाच्या प्रदेशांमध्ये शत्रूवर नजर ठेवण्यासाठी, शत्रूला रोखण्यासाठी हे उंट पथक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. बीएसएफमध्ये जवळपास अडीच लाख जवान कार्यरत आहेत. त्यातील आठ हजार महिला जवान आहेत. यामध्ये १४० महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बीएसएफ मधील महिलांना आता पेट्रोलिंगपासून ते हाय ऑब्जर्वेशन पोस्ट ड्युटीजपर्यंत सर्वप्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. बीएसएफच्या डेअरडेव्हिल मोटारसायकल पथकात सीमा भवानी यांचं नावही आता सगळ्यांनाच माहिती आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी होणारं हे महिला उंट पथक म्हणजे बीएसएफमधील महिला जवानांवरील वाढत्या जबाबदारीचं प्रतीक मानलं जात आहे.

आणखी वाचा : घटनाकारांची दूरदृष्टी प्रजासत्ताकाची मार्गदर्शक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

प्रजासत्ताक दिनी अत्यंत शिस्तबधद्पणे, एका तालात चालणारी सैनिकांची पावलं, चित्तथरारकं प्रात्यक्षिकं, लढाऊ विमानांच्या डोळे दिपवणाऱ्या कसरती हे सगळं पाहून आपल्या देशाच्या या सामर्थ्याचा अभिमान वाटतो. आपल्या देशाचं संरक्षण करणारे या जवानांप्रति ऊर भरून येतो. त्यात असंख्य अडथळ्यांवर मात करत तिथपर्यंत पोहोचलेल्या महिला जवानांबद्दल तर आदर अधिक दुणावतो. यावेळेसही राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावरुन कर्तव्य बजावणाऱ्या नारी शक्तीचं सामर्थ्य संपूर्ण जगाला दिसणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि हवाई दलाच्या युवा अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट करमल रानी त्यांना मदतनीस असतील. तर आकाश या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या तुकडीचं लेफ्टनंट चेतना शर्मा या नेतृत्व करणार आहेत. लेफ्टनंट डिंपल भाटी या आर्मीच्या डेअरडेव्हील्स मोटरसायकल टीममध्ये बाईक राईडर म्हणून सहभागी असतील. डिंपल या या रेजिमेंटमध्ये आहेत. भारतीय नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत ( या परेडमध्ये १४४ नौसैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करतील. त्यातच देशाच्या विविध प्रांतातील कलांचे दर्शन घडवणाऱ्या पोशाखांमध्ये उंटावरून संचलन करणाऱ्या बीएसएफच्या या अग्निशलाका लक्ष वेधून घेतील यात शंकाच नाही.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 20:56 IST
Next Story
अपत्यं जन्माला घालावीत की नाही?