जेव्हा एखादया तरुणीवर ॲसिड हल्ला होतो, तेव्हा त्या तरुणीचं आयुष्यच पार उद्ध्वस्त होऊन जातं. विद्रूप चेहरा घेऊन आयुष्यभर वावरणं, लोकांच्या नजरेत कायम दिसणारी सहानुभूती आणि या निमित्ताने सतत होणारे मानसिक खच्चीकरण यँसारख्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. पण या सगळ्या गोष्टींवर मात करीत उपजत हुशारी आणि शिक्षणाच्या जोरावर रेशम फातमा या तरुणीनं आपलं आयुष्य ध्येयपूर्ण तर बनविलच, पण इतरांसाठीदेखील एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.
युके सरकारचा चेव्हनिंग शिष्यवृत्ती हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत जगभरातील गुणवान आणि तरुण होतकरू विद्यार्थ्यांना युकेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये मास्टर्स करण्याची संधी प्राप्त होते. यात संपूर्ण शिक्षणासह राहण्या-खाण्याचा खर्च युके सरकार मार्फत केला जातो. अशा या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी रेशम फातमाची निवड झाली आहे. ही खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे.
जमशेदपूरयेथील एका सामान्य मुस्लिम कुटुंबात रेशमचा जन्म झाला. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ती आपल्या आजोळी लखनऊ येथे रहात होती. तिथेच आईचा एक चुलतभाऊदेखील रहात होता. जो तिच्यापेक्षा सुमारे वीस वर्षांनी मोठा होता. त्याने अवघ्या १७ वर्षाच्या रेशमला लग्नाची मागणी घातली. पण आपल्याला इतक्यात लग्न करावयाचे नसून पुढे शिकायचे आहे, असे सांगून तिनं आपला नकार कळविला.
पण त्याला हा नकार त्याला सहन झाला नाही आणि त्याचा सूड म्हणून महाविद्यालयात तिला सोडायचा बहाणा करून घेऊन गेला. नि भर रस्त्यात तिच्या डोक्यावर ॲसिडची बाटली ओतली आणि चाकूने गळ्यावर वार करणार इतक्यात रेशमने त्याही अवस्थेत त्याला जोराँ ढकलून पळ काढला. यावेळी एक रिक्षावाला तिच्या मदतीला धावून आला. त्यानं तिला तडक पोलिस स्टेशनला नेलं आणि तिथून तिला ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनं रेशमचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालं. विद्रूप चेहरा घेऊन स्वप्नहीन आयुष्य जगावे लागणार हाच विचार सतत तिच्या मनात असायचा. या हल्ल्यानंतर तऱ्हेतऱ्हेच्या शस्त्रक्रिया, रुग्णालय आणि घर यामध्येच तिचं आयुष्य जाऊ लागलं. सार्वजनिक समारंभात भाग घेणं तर अवघड होऊन बसलं. कारण लोकांच्या सहानभूतीपूर्वक नजरा तिच्या यातनाना आणखीनच अवघड करीत असत.
मग एक दिवस तिनं स्वत:च मनाशी ठरवलं की, स्वत:ची ओळख निर्माण होईल असं चांगलं आयुष्य आपण जगायचे नि ॲसिड हल्ला करणाऱ्यांना दाखवून द्यायचे की, तुमचे ॲसिड चेहरा उद्ध्वस्त करू शकँ, आयुष्य नाही. त्यानंतर तिनं अभ्यासावर आपले पूर्ण लक्ष केंद्रीत केलं. याचा परिणाम असा झाला की, तिला बारावीला विज्ञान शाखेत ८७% गुण मिळाले. पुढे भौतिकशास्त्र विषय घेऊन आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
नंतर २०२३ मध्ये दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून तिनं पॉलिटिक्स ॲण्ड इंटरनॅशनल रिलेशन या विषयात मास्टर्स करण्याचं ठरवलं. तिथे तिनं ई-बर्थ फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली. ज्यात प्रामुख्यानं मुस्लिम तरुणीना शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वातंत्र्य याबाबत मार्गदर्शन केले जात असे. दरम्यानच्या काळात तिला २०१५ साली प्रजास्ताक दिनी मुलांसाठी देण्यात येणारा सर्वोच्च असा ‘भारत पुरस्कार’ मिळाला. कारण ॲसिड टाकलेल्या अवस्थेतदेखील तिनं स्वत:चा जीव वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले, ते निश्चितच दखलपात्र होते.
हा पुरस्कार मिळण्याच्या काही दिवस आगोदरच ज्या व्यक्तीनं तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता, त्याँ तुरुंगात आत्महत्या केली. ही बातमी कळताच काहीशा निराश स्वरात ती म्हणाली की, इतकं सारं घडूनदेखील मी यशस्वी होत आहे, हे पाहण्यासाठी तरी तो जिवंत रहायला पाहिजे होता. यावरूनच समजून येते की, शिक्षणानं तिच्यात किती आमूलाग्र बदल घडवून आणला.
आयुष्याच्या शैक्षणिक टप्प्यांवर यशाची चव चाखत असताना, २०२४ साली तिचं असगर नावाच्या तरुणाबरोबर लग्न झालं. तिच्यातली शिकण्याची उर्मी पाहून नवऱ्यानं तिला कायमच पाठिंबा दिला. त्यानंच तिला चेव्हनिंग शिष्यवृत्तीसाठी नाव देण्यासाठी प्रवृत्त केलं. नवऱ्याचा आणि कुटुंबजनांचा प्रेमळ पाठिंबा आणि तिची अथक मेहनत या जोरावर तिनं ही शिष्यवृत्ती मिळविली. या प्रकारची शिष्यवृत्ती मिळविणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
ॲसिड ह्ल्ल्यापायी स्वत:चं आयुष्य काळोखात दडपवून टाकणाऱ्या अनेक तरुणींसाठी रेशम फातमानं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक उर्जेचा किरण दाखविला आहे. ॲसिड चेहरा विद्रूप करू शकतो, आयुष्य नाही, हे तिनं आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे.
