ज्ञानदेव बाबाराव नजान
६२ वर्षांच्या नम्रताताई नुकत्याच शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतरचा काळ शांततेत आणि कुटुंबासोबत घालवायचा एवढीच त्यांची इच्छा होती. पेन्शन, बँक व्यवहार आणि मोबाईलवर येणारे मेसेज यापुरताच त्यांचा डिजिटल वापर मर्यादित होता. परंतु एका दुपारी आलेल्या फोन कॉलने त्यांना सायबर फसवणुकीच्या दाराशी आणून उभे केले.
फोनवरील व्यक्तीने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. आवाज ठाम, बोलणे विश्वासार्ह. “आपल्या खात्यात संशयास्पद व्यवहार आढळले आहेत. तात्काळ पडताळणी केली नाही तर खाते गोठवले जाईल,” असे सांगत त्याने नम्रताताईंना घाई केली. हा प्रकार म्हणजेच ‘विशिंग’ (Vishing)- म्हणजे फोन कॉलद्वारे फसवणूक करण्याची पद्धत.
नम्रताताईंनी शांतपणे संवाद ऐकला. समोरची व्यक्ती त्यांना खाते क्रमांक, जन्मतारीख आणि एटीएम कार्डवरील क्रमांक विचारू लागली. “आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो त्वरित सांगा,” अशीही सूचना केली. क्षणभर त्या गोंधळल्या; पण त्यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली सायबर सुरक्षिततेची माहिती आठवली. बँक कधीही फोनवर ओटीपी किंवा गोपनीय माहिती विचारत नाही. त्यांनी तात्काळ ठामपणे उत्तर दिले, “मी कोणतीही माहिती फोनवर देणार नाही. मी स्वतः बँकेत जाऊन चौकशी करेन.” एवढे म्हणत त्यांनी फोन ठेवला.
काही मिनिटांतच दुसरा कॉल आला. यावेळी व्यक्तीने स्वतःला सायबर क्राईम विभागातील अधिकारी म्हणून सांगितले आणि धमकीचा सूर लावला. “आपल्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. सहकार्य केले नाही तर कायदेशीर कारवाई होईल.” नम्रता ताईंनी पुन्हा शांतता राखली. त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले आणि कोणतीही वैयक्तिक माहिती न देता संवाद संपवला.
यानंतर त्यांनी स्वतःहून बँकेच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. बँकेकडून स्पष्ट करण्यात आले की त्यांच्या खात्यात कोणताही संशयास्पद व्यवहार झालेला नाही. त्यांनी तत्काळ आपला एटीएम पिन बदलला, नेटबँकिंग पासवर्ड अपडेट केला आणि नोंद म्हणून जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
नम्रताताईंची जागरूकता आणि शांत निर्णयक्षमता यामुळे संभाव्य फसवणूक टळली. या घटनेतून काही महत्त्वाचे धडे समोर येतात:
१. कोणालाही ओटीपी, पिन, पासवर्ड कधीही शेअर करू नका- बँक, आरबीआय किंवा कोणतीही सरकारी संस्था फोनवर अशा प्रकारच्या माहितीची विचारणा करत नाही.
२. लोकांमध्ये घाई आणि भीती निर्माण करणे हा मुख्य उद्देश- खाते गोठवले जाईल, कायदेशीर कारवाई होईल, केवायसी रद्द होईल… अशा धमक्या देऊन व्यक्तीला विचार न करता निर्णय घ्यायला भाग पाडले जाते.
३. अधिकृत क्रमांकावरच संपर्क साधा- फोनवर आलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवरील किंवा पासबुकवरील क्रमांकावर स्वतः कॉल करा.
४. अनोळखी ॲप्स किंवा लिंक टाळा- कधी कधी पडताळणीच्या नावाखाली ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते, ज्यामुळे मोबाईलवरील माहितीला प्रवेश मिळू शकतो.
५. तक्रार करण्यास मागेपुढे पाहू नका- सायबर फसवणुकीचा प्रयत्न जरी झाला तरी जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधणे उपयुक्त ठरते.
निवृत्त नागरिकांना लक्ष्य करण्यामागे कारण म्हणजे त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाची सवय कमी असते, तसेच पेन्शन किंवा बचतीची रक्कम खात्यात असते. त्यामुळे सायबर गुन्हेगार त्यांच्या भीतीचा आणि विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु नम्रताताईंनी दाखवून दिले की वय नव्हे, तर जागरूकता महत्त्वाची असते. थोडी माहिती, थोडी सावधगिरी आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय यामुळे मोठा आर्थिक तोटा टाळता येतो.
सायबर सुरक्षितता ही केवळ तरुणांची गरज नाही. प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्या नागरिकासाठी ती अत्यावश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात सावध नागरिकच सुरक्षित नागरिक ठरतो आणि नम्रताताई त्याचे उत्तम उदाहरण आहेत.
सायबर फॉरेन्सिक विश्लेषक
dnyandev.najan@yahoo.in
