जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे ६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नेहमीप्रमाणे पुलाच्या श्रेयाचा छोटासा का होईना राजकीय वादही झाला. श्रेय घेण्यासाठी धडपडणे हे राजकीय नेत्यांच्या असंख्य कामांपैकी सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक असते. पण खरी मेहनत असते ती अशा अवघड प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची. त्यापैकी एक नाव आहे बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (आयआयएससी) स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापक जी. माधवी लता. त्यांच्या कामाचा आणि कारकि‍र्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

प्रा. लता ‘आयआयएससी’मध्ये रुजू झाल्यानंतर थोड्याच अवधीत त्यांच्यावर या प्रकल्पाची महत्त्वाची जबाबदारी आली. २००५ ते २०२२ अशी तब्बल १७ वर्षे त्यांनी या प्रकल्पावर काम केले. या प्रकल्पावर काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव असल्याचे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. मूळच्या आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथील असलेल्या लता यांनी हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू तंत्रविद्या विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर एनआयटी वारंगलमधून एमटेक पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी मद्रासमधून पीएचडी केली. उच्च विद्या संपादित केल्यानंतर त्यांनी २००३मध्ये आयआयटी गुवाहाटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे २००४मध्ये त्या ‘आयआयएससी’मध्ये रुजू झाल्या आणि वर्षभरातच त्यांच्यावर चिनाब पुलाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.

लता यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. २०२१ मध्ये, ‘इंडियन जिओटेक्निकल सोसायटी’ने त्यांना भू-तंत्रज्ञान अभियांत्रिकीमधील सर्वोत्कृष्ट महिला संशोधक म्हणून मान्यता दिली. त्यांना ‘आयआयएससी’चा प्रा. एस के चॅटर्जी सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार, ‘कर्नाटक बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून ‘वुमन अचीव्हर’ पुरस्कारही मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी २०१६ ते २०२२ पर्यंत ‘इंडियन जिओटेक्निकल जर्नल’च्या मुख्य संपादक म्हणून काम केले असून अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्ससाठी सहाय्यक संपादकपदाची जबाबदारी निभावली आहे.

चिनाब पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उद्योगपती आनंद महिंद्रा इत्यादींनी जी माधवी लता यांना आवर्जून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. या पुलाच्या डिझाइनमध्ये लता यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी अभियंते आणि वास्तुविशारदांच्या टीमचे नेतृत्व करत पुलाच्या प्रत्येक पैलूचे बिनचूक आणि बारकाईने नियोजन केले. पुलाची स्थिरता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता या सर्वात महत्त्वाच्या बाबींची खातरजमा केली. जम्मू आणि काश्मीरचा आव्हानात्मक भूगोल आणि कठोर हवामान परिस्थिती लक्षात घेऊन या प्रकल्पाला विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे भान लता यांनी अखेरपर्यंत राखले. त्यासाठी एकाच वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिरकालीन टिकतील अशा शाश्वत पद्धतींचा वापर करण्यात आला.

चिनाब नदीच्या खोऱ्यावर पोलाद आणि काँक्रिटचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे. त्याची एकूण लांबी १,३१५ मीटर आहे; त्यापैकी ५३० मीटर लांबीचा पूल तर ७८५ मीटर लांबीची पुलाखालील कमान आहे. पोलादी बांधकामामुळे हा पूल उणे २० अंश सेल्सियस तापमान आणि ताशी २२० किमी वेगाने वाहणारे वारे अशा अत्यंत प्रतिकूल हवामानालाही तोंड देऊ शकेल. पूल बांधलेला भाग भूकंपीय क्षेत्र चार म्हणजेच उच्च जोखमीचे क्षेत्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पुलाची रचना केली असून तो रिश्टर स्केलवर ८ इतक्या उच्च तीव्रतेच्या भूकंपातही टिकून राहू शकतो. हिमालयाचे खडकाळ आणि तीव्र उतार, भंजन आणि सांधे यामुळे पुलाच्या मजबूत पायासाठी जमीन तयार करण्याचे अवघड आव्हान लता यांच्या नेतृत्वातील टीमच्या अभियंत्यांनी लीलया पेलले. एक वेळ अशी होती की लता यांना त्यांची सर्व व्यावसायिक कौशल्ये पणाला लावून दिवसाचे २४ तास काम करावे लागत होते. त्यांना विश्रांती किंवा झोप यासाठीही वेळ काढता आला येत नव्हता.

पुलाचे काम पूर्णत्वाला येत असताना, २०२२मध्ये लता यांनी या पुलाला अखेरची भेट दिली तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबरोबर होते. पुलाची फक्त छायाचित्रे पाहून त्याची थोरवी कळणार नाही, तो प्रत्यक्षातच पाहायला हवा अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nima.patil@expressindia.com