भाग्यश्री फडके धर्माधिकारी
निर्मला आजींची हाता-पायाची बोटे अगदी वाकडी झालेली होती. त्यांना हातांनी रोजची कामे करायला अगदी चालायलासुध्दा खूप त्रास होत होता. थंडीच्या दिवसात सांधे आखडतात, प्रचंड वेदना होत असतात ही त्यांची नेहमीची तक्रार असते. डॉक्टरांकडे गेल्यावर निदान झाले आमवात अर्थात रूमेटॉइड आर्थरायटिसचे. जाणून घेऊया त्याविषयी. भारतात ४२ लाख रूमेटॉइड आर्थरायटिसच्या रुग्णांपैकी ३५ लाख महिला आहेत. आणि ६५-६९ वयाला रोग होण्याची शक्यता अधिक असते.

रूमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय?

रूमेटॉइड आर्थरायटिस संधीवाताचाच एक प्रकार असून दीर्घकाळ चालणारा, असा रोग जो आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो, शरीरातील केवळ एखादा अवयवावर नाही तर एकाच वेळी शरीरातील अनेक यंत्रणांवर परिणाम करतो. आपल्या शरीरातील पेशी स्वतःला बाहेरील पेशी समजून नष्ट करतात. यात सांध्यांमधील सायनोवियल उतींचा दाह होतो, हाडांची आणि कुर्चाची (cartilage) हळूहळू झीज होत जाते त्यामुळे प्रचंड वेदना, व्यंग उत्पन्न, आयुष्याचा दर्जा खालावतो. प्रामुख्याने सांध्यांचा आजार सांधे कमकुवत होऊन खराब होतात, हळूहळू दाह वाढत जातो आणि हालचाली करण्यास मर्यादा येतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या त्वचेवर, डोळ्यांवर, फुफ्फुसांवर आणि तोंडावरदेखील होऊ शकतो. म्हणून आयुष्यभर त्याचे उपचार घ्यावे लागतात. अनुवांशिक घटक, धूम्रपान, जीवनशैलीतील घटक या सगळ्याचा मिळून आपली जन्मजात प्रतिकारशक्ती आणि नंतर प्राप्त झालेली प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

महिलांवर पुरुषांपेक्षा रूमेटॉइड आर्थरायटिसचा दोन ते तीन पट जास्त परिणाम जाणवतो. याचे कारण म्हणजे स्त्रियांमधील लैंगिक संप्रेरके. जनुकांमध्ये असलेली लैंगिक गुणसूत्रे ही महिलांमध्ये हा आजार होण्यास कारणीभूत ठरतात त्याचबरोबर लैंगिक संप्रेरक- इस्ट्रोजेन हे रोगप्रतिकारशक्ती नियंत्रणात ठेवत असते. विशेषतः इस्ट्रोजेन्स शरीराच्या स्वतःच्याच पेशींवर हल्ला करणाऱ्या पेशींना जिवंत राहण्यास मदत करून रोगप्रतिकारक शक्तीचे नियंत्रण करू शकते आणि शेवटी महिलांमध्ये स्वतःच्याच रोगप्रतिकारक शक्तीने शरीराला इजा करणे वाढवते.

रूमेटॉइड आर्थरायटिससाठी इस्ट्रोजेन निर्णायक ठरते. तसेच रूमेटॉइड आर्थरायटिस मध्ये गर्भधारणा ही सामान्य स्थिती आहे आणि बऱ्याच गर्भावस्थेतील रुग्णांमध्ये आजारात सूट मिळालेली दिसते. म्हणजे गर्भधारणा अशी गुंतागुंती ची रोगप्रतिकार स्थिती असते तेव्हा टी मदतनीस २ पेशी (T helper 2) अर्भकाचे संरक्षण करतात. तरीही अवास्तव गुंतागुंत टाळण्यासाठी गर्भधारणेचा विचारच केला पाहिजे. अन्यथा गर्भावस्थेत आणि स्तनपानाच्या वेळेस रूमेटॉइड आर्थरायटिसची औषधे घ्यायला लागतात.

रूमेटॉइड आर्थरायटिस होण्याची कारणे

जनुकीय कारणे- HLA-DRB1 जनुके, हे रोग प्रतिकार शक्तीचे प्रथिन तयार करण्यासाठी सूचना देते. हे जनुकांचे समूह प्रतिकार शक्तीला, शरीराच्या स्वतःची प्रथिने आणि बाहेरील जीवाणू, विषाणूंनी तयार केलेली प्रथिनं यातला फरक ओळखायला मदत करते. ही जनुकं; बीटा साखळी आणि अल्फा साखळी तयार करतात, त्या एकमेकांना जोडल्या जाऊन प्रथिनांची मोठी साखळी तयार होते. प्रतिकार शक्तीने ही बाहेरची प्रथिनांची साखळी आहे असे ओळखले की त्याविरोधात हल्ला करून घुसखोर विषाणू, जीवाणू विरुद्ध हल्ला करते. कधीतरी ह्यात गल्लत होते, ही जनुके कार्य करत नसतील तर ‘आपले कोण आणि परके कोण’ यातला फरक समजू शकत नाही आणि स्वतःच्या पेशी, बाहेरच्या पेशी समजून मारत सुटते. दुसरे जनुके म्हणजे, “प्रोटीन टायरोसिन फॉस्फटेज नॉन रिसेप्टर टाईप-२२” (PTPN22) हे ‘टी’ पेशींना उत्तेजित करणारे जनुकेसुध्दा रूमेटॉइड आर्थरायटिसला कारणीभूत ठरते. अजून एक जनुके म्हणजे, “सिग्नल ट्रान्सड्यूसर आणि अॅक्टिवेटर ऑफ ट्रान्सक्रिप्शन-४” (STAT4) हे रोग प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद नियंत्रित करते. ह्या STAT4 जनुकांमध्ये काही बदल झाले तरी रूमेटॉइड आर्थरायटिसचा धोका संभवतो. तसेच इतर जनुके, “ट्युमर नेक्रॉसिस फॅक्टर- रिसेप्टर असोसियेटेड फॅक्टर १-कॉंप्लीमेंट कम्पोनंट-५” (TRAF1-C5) रोग प्रतिकार प्रतिसाद आणि दाह नियंत्रणात ठेवत असते. ह्याही जनुकांच्या संघात काही बिघाड झाला तर आर्थरायटिसचा धोका संभवतो. तसेच “एफ सी रिसेप्टर सारखे-३” जनुके “बी” पेशींची क्रिया नियंत्रणात ठेवते आणि प्रतिपिंड निर्मितीत सहाय्य करते त्याही जनुकांत काही बदल झाले तर आर्थरायटिसचा धोका संभवतो.

रूमेटॉइड आर्थरायटिस ची लक्षणे

सांधे कडक होणे, सकाळी उठल्यानंतर किंवा जास्त वेळ विश्रांती घेतल्यानंतर सांधे ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ कडक होतात. सांधेदुखी आणि सूज, हाताची बोटे, मनगट, कोपर, गुडघे, घोटे आणि पायांच्या बोटांमध्ये वेदना आणि सूज येते. यामध्ये शरीराच्या दोन्ही बाजूंना (उदा. दोन्ही हातांची मनगटे किंवा दोन्ही गुडघे) एकाच वेळी सांधे प्रभाव पडतो. पुरेशी झोप किंवा विश्रांती घेतल्यानंतरही नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे. सांध्यातील जळजळ आणि सूज यामुळे अधूनमधून हलका ताप येऊ शकतो. आजारपणामुळे भूक मंदावते आणि वजन कमी होऊ शकते.

औषधोपचार

रोग-बदलणारी संधिवातविरोधी औषधे (डिमार्ड्स) दिली जातात. ही औषधे अतिसक्रिय झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला शांत किंवा नियंत्रित करतात. ही औषधे सांधे किंवा कूर्चाची झीज थांबवून सांध्यांचे दीर्घकालीन रक्षण करतात. सांध्यांच्या आतील अस्तराची (Synovium) सूज कमी करून, हे औषध वेदना आणि जडपणा (Stiffness) कायमस्वरूपी कमी करते. जेव्हा पारंपरिक गोळ्या काम करत नाहीत, तेव्हा प्रगत किंवा सुधारीत डिमार्ड्स औषधे वापरली जातात. ही थेट विशिष्ट सूज निर्माण करणाऱ्या प्रथिनांवर (उदा. TNF, JAK) नेम धरतात. इंजेक्शन / सलाईनद्वारे दिले जाणारे अ‍ॅडालिमुमॅब, इन्फ्लिक्सिमॅब आणि जॅनस-कायनेज प्रतिरोधक टोफासिटीनिब, अपॅडॅसिटिनिब, बॅरिसिटिनिब.

टोफासिटीनिब हे ‘जॅनस कायनेज इनहिबिटर’ या औषधांच्या वर्गात येते. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच सांध्यांवर हल्ला करते आणि सूज निर्माण करणारे ‘सायटोकाइन्स’ नावाचे प्रोटीन्स तयार करते. टोफासिटीनिब पेशींच्या आत जाऊन ‘JAK पाथवे’ (सिग्नल देणारा रस्ता) ब्लॉक करते. यामुळे सूज वाढवणारे संदेश मेंदूपर्यंत किंवा इतर पेशींपर्यंत पोहोचत नाहीत, आणि सांध्यांमधील सूज व वेदना थांबतात. ज्या रुग्णांना मॅथोट्रेक्झेट किंवा इतर DMARDs औषधांचा फायदा झालेला नाही, त्यांना हे औषध प्रामुख्याने दिले जाते. हे सांध्यांचे होणारे कायमचे नुकसान रोखण्यासाठी मदत करते.

दुष्परिणाम

यामुळे क्षयरोग, किंवा इतर गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच हे औषध सुरू करण्यापूर्वी डॉक्टर सहसा क्षयरोगाची चाचणी करून घेतात.

उपकरण-आधारित उपचारपद्धती

जेव्हा रुग्णांवर औषधांचा (DMARDs किंवा Biologics) परिणाम होत नाही, तेव्हा या उपकरणांचा वापर केला जातो. व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेटर ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी आणि क्रांतिकारक बायोइलेक्ट्रॉनिक उपकरण-आधारित उपचारपद्धती ठरली आहे. यात ‘जेली बीन’ आकाराचे एक लहान उपकरण शस्त्रक्रियेद्वारे गळ्यातील व्हेगस मज्जातंतूवर बसवले जाते. हे उपकरण दररोज फक्त १ मिनिटासाठी मज्जातंतूला सौम्य विद्युत पल्स देते. यामुळे मेंदूकडून प्लिहाकडे संदेश जातो, ज्यामुळे शरीरातील सूज वाढवणारे प्रोटीन्स (उदा. TNF) तयार होणे नैसर्गिकरित्या कमी होते. पारंपरिक औषधांप्रमाणे हे रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे दाबून टाकत नाही, त्यामुळे जंतूसंसर्गाचा धोका टळतो.

प्रगत जैविक औषधे- सारिलुमॅब

सारिलुमॅब हे रुमॅटॉइड आर्थरायटिस (आमवाता) च्या उपचारासाठी वापरले जाणारे एक अत्यंत प्रगत जैविक औषध आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस असलेल्या रुग्णांच्या शरीरात ‘इंटरलिक्विन-६’ नावाचे एक विशिष्ट प्रोटीन गरजेपेक्षा जास्त तयार होते. हे प्रोटीन सांध्यांमध्ये तीव्र सूज, वेदना आणि जडपणा निर्माण करण्यासाठी कारणीभूत असते.

हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी- धूम्रपान टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, दातांचे आरोग्य जपणे आणि वजन आटोक्यात ठेवणे हे आपण नक्की करू शकतो आणि आजाराला शक्य तितके दूर ठेवू शकतो.

(औषधनिर्माणशास्त्र आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्र) Bhagyashri1@zohomail.in