आयुष्यात आपल्याला काही भन्नाट करून दाखवायचे असेल तर आपल्याजवळ बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती खरोखरीच चुकीची कल्पना आहे. त्यासाठी गरज असते ती आत्मविश्वासाची आणि काहीतरी चांगले करून दाखविण्याची. समाजसेविका आणि गोकुळ आश्रमाच्या संस्थापिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या गुंजन गोळे यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या आणि चिकाटीच्या जोरावर जगातील सर्वात उंच समजला जाणारा व मोटारयोग्य रस्ता म्हणून ओळखला जाणारा ‘उमलिंग ला पास (लडाख) ते कन्याकुमारी हा सुमारे ३,८५० किमी चा रस्ता अवघ्या १३९ तास ८ मिनिटांत पार करून ऐतिहासिक विक्रम केला आहे. या प्रकारचा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे. त्यांनी स्तनपान जागृतीचा संदेश देत ही मोहिम राबविली. १३ जून २०२६ रोजी अमरावतीवरून सुरू झालेली ही मोहीम २५ जून २०२६ रोजी उमलिंग ला पास येथे समाप्त झाली.
गुंजन यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेतला तर एक गोष्ट सहज लक्षात येते की, सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत असताना अशा काही घटना घडल्या नि त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला. अमरावतीमधील एका सर्वसामान्य कुटुंबात गुंजन यांचा जन्म झाला. मानसशास्त्रात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळालं. पण नोकरीपेक्षा ही काहीतरी वेगळं करायचं हाच विचार मनात असायचा.
एके दिवशी रस्त्यावरून चालत जात असताना एक अर्ध नग्न मनोरुग्ण महिला रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. तिची दया येऊन त्यांनी तिला आपल्या घरी आणले. तिला खाऊ-पिऊ घालून, कपडे देऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले. तेव्हा ती महिला सात महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आले. पुढे या महिलेची योग्य ती व्यवस्था लावून सुरक्षित ठिकाणी ठेवले. आणि इथूनच त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले. त्यांनी निराधार लोकांसाठी काम करण्याचे ठरविले.
यात गरीब मुलामुलींना मार्गदर्शन करणे, सैनिक भरतीसाठी त्यांना तयार करणे, एड्स विषयक गावोगावी जाऊन जागृती करणे, महिला-मुलींना स्व-रक्षणाचे धडे देणे, ढोल पथक चालविणे, स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना मार्गदर्शन करणे, रस्त्यावरील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे अशा अनेक माध्यमातून त्यांचा सामाजिक प्रवास कार्यरत झाला.
या सामाजिक कार्याच्या प्रवासात मुलांसाठी काम करीत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, आजही समाजात स्तनपानाविषयी अनेक गैरसमज आहेत. तेव्हा या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्तनपान विषयक जागृती आणि दूधदान चळवळ सुरू केली. ज्यात ज्या मातांकडे अतिरिक्त स्तनदूध उपलब्ध असते, ते त्यांनी दान करावे. जेणेकरून गरजू नवजात बालकांपर्यंत ते पोहचविता येईल.
याच योजनेचा प्रचार आणि प्रसार देशभरात व्हावा याच उद्देशाने त्यांनी उमलिंग ला पास (लडाख) ते कन्याकुमारी ही खास मोटरसायकल स्वारांसाठी असलेल्या मोहिमेत सहभागी व्हायचे ठरविले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे एकतर हा रस्ता जगातील सर्वात उंच रस्ता म्हणून ओळखला जातो.याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १९,०२४ फूट इतकी आहे. विरळ हवामान, ऑक्सिजनची कमतरता, कधी अत्यंत कडाक्याची थंडी तर कधी वेगाने वाहणारे वारे, सतत बदलणारे हवामान अशा वातावरणात हा रस्ता पार करणे म्हणजे साहसी व्यक्तीसाठी खूप मोठे आव्हान असते. त्यासाठी तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता कणखर असण्याची जास्त गरज असते. ‘रायडर मॉम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंजन गोळे यांनी हे आव्हान पेलायचे ठरविले.
कधी प्रतिकूल तर कधी अनुकूल अशा आव्हानांचा सामना करीत अमरावतीपासून सुरू केलेला हा प्रवास २५ जून रोजी या ऐतिहासिक मार्गावर पोहचून, भारतीय लष्कराला मानवंदना देत यशस्वीरित्या पार पाडला. या स्वरुपाची मोहीम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्याच बरोबर ही मोहिम पार पाडण्यासाठी त्यांनी जो वेळ घेतला, १३९ तास ८ मिनिटे, या स्वरुपाची वेळ यापूर्वी कुणीच दिली नाही. त्यामुळेच त्यांचा हा विक्रम ऐतिहासिक ठरतो. त्यामुळेच गुंजन गोळे यांची कामगिरी फक्त अमरावती, महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आज त्या खऱ्या अर्थाने ‘देशाची शान’ बनल्या आहेत.
